--------------------------------- ======================================

खुरुड:

खुरुड:

विनायक कदम: ९६६५६५६७२३

खुरुड्यात काय आंडी घालतुयस काय? जरा भायर य की! गावात येकान घराफुड हुब हुन पल्लदार हाळी दिली. तशी बाजूची माणसं ख्या ख्या करून हासाय लागली. आंडी घालायचं तर काय सोप आसतंय वी. आता गावाकडं दिशी कुमडी आणि खुरुड बी दिसत न्हाय.

दिशी कुमडीची जात लय तिकाट आणि काटक. केस फूगवून क्वार केलं की माणसाला मुताय याला पायजी. जवळ कुठलं जायाला आलाय माणूस. कोंबड तर लय कडू. कितीबी दगाड घाला परत फिरून तितच येणार. कोंबड्यांची खुरुडी यिकायला आमच्या गावात चिचणीचा कैकाड्याचा योक माणूस याचा आजूनबी यितुय.

कळकाच्या फोका, काड्या, चुयट्या पासन गडी हारं, डालग, खुरुडी, यिकाय आणायचा. गड्याच्या आंगात दांडगी कला. वस्तू दिखणी आसली करायचा बगूनच बायका घ्याला पालत पडायच्या. गावाकडं सारयांच्या घरातनी कमीत कमी धा पंधरा तर कोंबड्या आसायच्या. खाऊन पिऊन दणदणीत. कायसनी कितीबी खायला घाला कळाखावं खुरप्याच्या मुटीपेक्षा मोट नाय झालं. काळी, तपकिरी, पांढरी,तांबडी,भुरी,राखाडी आसल्या कोंबड्या आणि करडा कोंबडा आशी तिज्या कलर वरन नाव आसायची. मालकान बोलवलं की खायाला पळून याच्या.

आंडी दिऊन कुमडी खुडून झाली की तिला बायका पिल्ल्यांसाठी बसवायच्या. गादी केल्यागत डालग्यात उसाच्या पाल्याच चगाळ घालायच आणि त्याव आंडी घालून मग कुमडी ठेवायची. बायका कुमडी खुडून किती टक्के हाय हेजी परीक्षा घ्याच्या. दोन तीन दिवस नुसती टोक टोकाय लागत पळाय लागली तर ती कुमडी आंडी येवस्थित घोळणार न्हाय आसा तर्क आसायचा. आणि जी दुसऱ्याची आंडी पोटाखाली वडून घित्या आणि फिकून दिल तर आणि यिउन बसत्या आशी कुमडी चांगली आसली पारख आस्त्या.

कुमडी डालग्यात बसवली की कुत्रं, मांजार,साप आसल काय जाणार न्हाय आश्या सुरक्षित जाग्याला डालगा ठेवायचा. घोळाय कुमडीला झेपल यिवडीच आंडी ठेवायची. रात्रीच कुमडी घोळाय लागल्याला आवाज याचा. दुपारचं कुमडीला खायाला जुंधळ आणि पाणी प्याला सोडाय लागायचं. पायाला दुरी बांधून सोडाय लागायचं नायतर कोंबडयान तांनलीच म्हणून समजा. हाळवी कुमडी जुंधळयापेक्षा पाणीच लय प्याची. या दरम्यान त्या कुमडीच वजन कमी झाल्यामुळं ती नेटानं घुळत्या. घुळून घुळून तिज्या पोटाखालची पक पाक निगुण जायाची. दिवस भरलं की तयार झाल्याल पिल्लू आतन टोच्या मारून भायर याला बगायचं. किती आकल्यात बगून मग रात्रीच कुमडीला त्या आंड्यासनी दिवा दावायचा.

आकल्यावर येक दोन दिसान सारी पिल्ली टोरपाल काढून भायर याची. काय जनासनी भायर याला मदत करायला लागायची. लय दिवसाची साठवल्याली आसल्याली काय नासकी आंडी निगायची. ती फोडताना ती आतन कसलच झाल्याल आसायचा. या काळात त्या कुकडीच्या पोटाची लय आबळ झाल्याली आसायची. मग फूड यील ती कुमडी गाब गाब आधाशा गत खायाची. बारीक आवाज काडून लेकरासनी खायाला पाणी प्यायला शिकवायची, आपुन खात खात घार, भैरया, कुत्र,मांजार, साप आसल्यावनी तिज ध्यान आसायच.

लेकरा बाळांसकट सकाळच्या पारी ती उकरडयावं हिंडाय जायाची. पण तिजा जागता पारा आसायचा. येकादी घार न्हायतर भैरया आला तर ती तेला माराय त्येज्या बरोबरीनं उडायची. दिस मावळताना खुरुड्याकड टायमिंगला येत पकाखाली पिल्लं घिऊन बसायची भारी वाटायचं. सकाळ सकाळच सारी भुक्याजल्याली आसायची सोडायसाठी कालवा योट करायची. खुरुड्यावला डालगा काढला की पिल्ली उडया घिऊन भायर येत रानुमाळ पळायची. म्हयन्या दीड महिन्यांत पिल्ल मुठी व्हायची. त्यासनी कळतापणा याचा. कुंमडीचाबी खुडूकपणा जाऊन ती आंड घालायला तयार व्हायची आणि मग पिल्ल सुडून दयायची.

तवर तंलगा ,कोंबड हेजी वळक व्हायची. वयात आल्याल कोंबड पाटच भांग दयाच. आंडी घालाय आल्याल्या कोंबड्या करर्करायच्या. खुरुड्यात आंड घालायला बसल्याली कुंमडी बगाय भारी वाटायचं. जवानीत तेंच रूप देखणपान दिसायचं. भांग देणार कोंबडा, पय पावण, जत्रा, देव ह्यासनी राखून ठेवल्याला आसायचा. त्यासनी धरायच मजी दोन चार पळाव पोर लागायची. आंडी, मटण चवदार आसायच. मुबलक अंडी आणि कोंबड्या गावाकडं आसायचा. तेंच खुरुड बायका शेणाण सारवून चकचकीत ठेवायच्या. आता गावाकडं बी वार येगळ वाहतय. नव्या सुना आणि तरण्या पोरासनी कोंबड्याचा गु कोंबड्या नगु वाटत्यात. आकाड आणि कुणालातर डॉकटर न सांगितलं की दिशी आंड आणि कुमडीच ध्यान हुतय. कोंबड्या मजी कधीकाळी गावाकडचा आर्थिक कणा हुता. आंडी वाला आणि कोंबड गोळा कराय माणसं याची. खाऊन पिऊन समृद्ध आणि तंदुरुस्त असणारी माणसं आता गावातंनी बी दिसत न्हायत.

5 thoughts on “खुरुड:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *