कचऱ्याशी संसार करणारी : जगूताय
कचऱ्याशी संसार करणारी : जगूताय
विनायक कदम:९६६५६५६७२३
सावर्डे तासगाव तालुक्यातील गाव. तासगाव शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर सुखी, समाधानी, समृध्द, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक वारसा असणारं, पैलवानांच, उत्कृष्ट द्राक्षबागायतदारांच व प्रयोगशील शेतकऱ्यांच आणि आयुष्य गावचा कचरा व घाण साफ करण्यात घालवलेल्या जगुताईच गाव. जगुताई आप्पा माने (वय कुठलं म्हाइत.. व ? पण ६० धरा की) , टवाळ पोरांनी नाव पाडलेली (जगणी). स्वताच हात घाण करुण गाव चकचकित दिसाव यासाठी गेली ३० वर्ष राबणार व्यक्तिमत्व.
डोसक्याला कुरळ केस, डोळ्याला चसमा, गळ्यात काळा दोरा, आंगभरून ब्लाउज, मळकटल्याली साडी, येका हातात कारल बांधल्याल तर दुसऱ्या हातात काळा दोरा, जुनी येकादी बेंटेक्स ची बांगडी कधी हातात आसली तर आसली, बोटात 8भिकारी अंगठी, डाव्या पायात काळा दोरा ,भारदस्त कातडी चप्पल आणि उन्हाळा पावसाळा व हिवाळा १२ महिणं डोसक्याला टूपी , आणि तोंडात पुरुष बोलणारी भाषा. जगुताय बद्दल मला लय येळा उत्सुकता हूती. मी सावरड्याला तमाशा बघायला गेल्यावर जगुताय तिथ ग्रामपंचायतीत कधी दिसली न्हाय आस कधी झालं न्हाय. तमाशाचा नारळ सोलण्यापासन, आगरबत्ती लावून दगुड आणत सारी जबाबदारी अंगावर घेणारी जगुताय. तमाशा चालू झाल्यावर गावच्या नेत मंडळीना काय हवं ,नको ही तमाशा संपोस्तर अगदी काळजीनं जगुताय बघायची. मला वाटायचं आयला ही बाय तमाशाच्या ठिकाणी का म्हणून गड्यागत वावरत्या.
न राहून आमच्या रानात कामाला आलेल्या नायकाच्या सम्याला मी ४ वर्षांपूर्वी ईचारलं आर ती बाय कोण हुती तुमच्या ग्रामपंचायतीत राती? सम्या म्हणला “जगनी” त्यानं ज्या पद्धतीन तीच नाव घेटलं त्यावर मला हासू आलं. कारण आमिर खानचा गजनी पिच्चर आणि ही जगणी. अनेकदा सावरड्याला गेल्यावर जगुताय हातात खराटा व खोर घिऊन चौक , एसटी स्त्यांन्ड ,मुताऱ्या ,ग्रामपंचायत हीत, लोटत गटारी साफ करत नायतर कागद पेटवत आसल्यानी दिसायची. तिच्या कामाचं अनेकदा कुतूहल आणि कौतुक पण वाटायचं. मंगळवारी सावरड्यात कामासाठी गेलो आणि बोल..बोलत ग्रामपंचायतीत शिरलो. सरपंचाच्या केबिनला बसलो आणि जगुतायचा ग्रामपंचायतीत प्रवेश झाला. एवढी वर्ष आसल्याली उत्सुकता संपली आता फाड फाड जगुताय वर प्रश्नांचा मारा करून पायजी आसल्याली उत्तर घ्यायची या बेतात असतानाच गावच युवा नेत स्वप्नील भैय्या ग्रामपंचायतीत शिरलं. आता जगुतायला हेंच्या म्होर बोलायचं, मिबी आवगाडलु आणि सांगायचं म्हणलं तर जगुताय बी आवघडल. म्हणून मी व्हटाव आलेल बोलणं परत आत वडल. कसं, काय हिकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि त्यांनी च्या… चा आग्रह धरला. त्वांड आल्याचं कारण देत च्या टाळायचा अयशस्वी प्रयत्न केला. आणि ब्यांकेतन आलो म्हणून त्यांनी वाट धरली आणि हायस वाटलं.
शिपाय च्या आणायला गेला आणि मला घावल्यागत झालं. काय जगुताय बरं हाय का म्हणून बोलायला म्याच जुपी किली. व्हय बरच हाय की बाबा, तू कुठला र…. मी माजी वळख सांगिटली आणि कोण न्हाय तवर आपलं बोलणं उरकाव म्हणून जगुतायच्या आयुष्याला हात घातला. आप्पा मान्याच्या जगुतायला ४ भणी, भाव न्हवताच, त्यात एक भन लहानपणीच वारली. कामाला जाऊन जगणार व न सांगण्यासारखं घरात दारिद्र्य. बालपणीच काय कळायच्या आधी लगीन झालेलं. न्हवरा जगुतायला मूल हुईनात म्हणून सोडून निघून गेला आणि सुरू झाली जगुतायच्या आयुष्याची फरपट. कामाला गेल्याशिवाय चूल पेटायची न्हाय आणि त्यात खाणारी तोंड जास्त. तीस वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीत झाडू नोकर म्हणून यिजू म्हेरबान, मारुती दादा, आणि दिलीप दादानी कामाला लावलं. आणि खराटा ,पाटी, खोर आणि काड्याची पिटी हेज्यासंग दुसरं लगीन जगुतायच लागलं.
तरणी पुरगी जवानीत लाज,बीज आसल प्रकार सुडून ग्रामपंचायत,गाव व गटारी साफ लागली. बायकात काय गड्यातनीबी कुजबुज व्हायची बाय बगाकी गड्यावानी गटार उपासत्या. कसलीबी काम करत्या. लाजत न्हाय का काय न्हाय द्वाड. पोटाच्या आगीन सगळी लाज सोडायला भाग पाडल हुत. त्यावेळी २ रुपय पगार ठरला आणि गावाची घाण उचलायलाय ,साफसफाईच काम चालू केल. जगुताय म्हणली सुरवातीला घाण काढायला नकु वाटायचं. वास यायचा. घाण बघून आन जायचं न्हाय. वंगाळ वाटायचं. लोक टिंगल करायची. पण सगळ्याकड दुर्लक्ष केलं आणि कांन बंद ठेवत कामात गाडून घेतलं. हळूहळू सवय होत गिली. लोकासनी कचऱ्याच्या बाबतीत कितीबी सांगितलं तरी त्यासनी फरक पडत न्हाय. बायासनी राख, अंड्याची टरफल गटारीत टाकू नका म्हणलं तरी त्या टाकायच्या. कधी खोऱ्यान निघणा की हातांन काढायचं. घाणीची घाण म्हणून वाटणाऱ्या भावना मेल्या. सकाळी दिवस उगवल्यापासन दिवस मावळन्यापर्यंत जगुताय प्रामाणिकपनी आपलं काम करत्या. हे कर म्हणून तिला कधी सांगावं लागलं न्हाय, सार काही पुरुषांप्रमान लाजन न्हाय आणि काय न्हाय. दिवसभर आपल्याच कामात,नादात, सावर्ड ग्रामपंचायतीची जणू मालकीणच.! गावात कुठं काय झालं याची सारी खबर जगुताय जवळ आसत्या.
कचरा व घाणीशी संसार गेल्या ३० वर्षांपासून सुरुय पण कधी तीन राग.. राग केला न्हाय. २ रुपय पासून आज तिला ३ हजार रुपय पगार हाय. निवृत्ती हुनही सरपंच प्रदीप काकांनी तिला कामावर ठेवलंय. डोळ्याला दिसणा म्हणून एक चसमा पण आणून दिलाय. म्हातार पनात तिज्या पोटाची काळजी सरपंच व गावानं केल्याचं तिच्या तोंडून ऐकलं आणि बरं वाटलं. उतार वयात सोबत म्हणून आपल्या भणीच एक पोरगं दत्तक घेतलय.! तासगावला ती आयटीयाला कॉलेजला हाय. जगुतायच्या कामाचं व प्रामाणिक पणाच बरच किस्स हायती. नुकताच गावात वसंतदादा कॉलेजचा क्याम्प झाला. मुक्कामी असलेल्या पोरींची पाच दिवस जबाबदारी जगुतायवर सरपंचानी दिली. जगुतायन स्वताच्या पोरी असल्यागत त्या पोरींची काळजी घितली, काय हवं, नको, दुकल ,खुपल, हे बघितल. पोरीनी जाताना जगुतायला साडी चोळी दिऊन सत्कार केला. आशी ही जगुताय. आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी नुकताच सफाई कामगारांचा पाय धुन सत्कार केला. त्यो सत्कार फक्त त्या चौघांचा न्हवता तर जगुताय सारख्या आपलं हात घाण करून आमचा परिसर स्वछय ठेवणाऱ्या, राबणाऱ्या असंख्य सफाई कामगारांचा त्यांच्या अनेक कुळांचा, खानदानांचा त्यो सत्कार हूता.