--------------------------------- ======================================

घरातनं पाटा वरुटा झाला गायब:

घरातनं पाटा वरुटा झाला गायब:

विनायक कदम:९६६५६५६७२३

बारकं आस्ताना आय आनी बा ची कवातर तर भांडनं लागायची. आयला बा यिचीव शिव्या दयाचा. भांडांन लैच वाडल्याव बा म्हनायचा तुज्या डोस्क्यात पाटा घालून मारून टाकीन. रागाच्या तावात बा नं पाटा आयच्या डोसक्यात घाटला तर ह्या यीचारान भ्या वाटायचं. पेपरला तवा बातम्या याच्या डोक्यात दगडी पाटा घालून महिलेचा खून. आसंल वाचल्याव तर आंगाव काटा याचा. तवापासन पाटा माझ्या लैच डोस्क्यात बसून बदनाम झालावता. ओमनी गाडीगत ओ. पिक्चर मधी ह्या गाडीचा कायम आपहरण करायलाच वापर केल्यानं लोकांच्यात ह्या गाडीत बसाय धाकधूक आसायची.

आमच्या घरात ३० वर्ष जुना दगडी पाटा, वरुटा हाय. रोजच्या वापरात तवा खोबरं, लसून, मिरच्या , जिरं, खोबरं ,कुतमीर कायबी मसाला आसुदी पाटा व वरुट्यान बारीक बारीक बायका तेजा खीस पाडायच्या. मटन बिटन आसंल तर काय ईचारू नगा. बायका चाक,चाक हालायच्या. खोबरं, कुतमीर, जिरं वरुट्यान बारीक बारीक करून ढीग करायच्या. पानी घालून आशी रबडी करायच्या नुसता घमघमाट. नुसत्या वासान तोंडाला पानी सुटायच. पाटा वरुट्यान बारीक केल्याल्या आमटीसनी चव काय ईचारता. किती खाऊ आनी किती ठिऊ आस व्हायचं.

चटनीचा मसाला तर पन्नास तरचा बारीक करायचा मजी बायका पाकाळून जायाच्या. तवा काय चटन्या तर काय हालक्या हूत्या वी, धा धा कीलूच्या चटन्या तवा बायका उनाळ्यात करून ठेवायच्या. सना, वाराला पोळ्याच्या कार्यक्रमाला पुरान वाटायचं पाट्यावच की.? आताच्यागत तवा काय मिक्सर हूता वी. सनाच आमची आज्जी धुतल्याल पोत हातरून त्याव पाटा धून ठेवायची. पुरनाच भगुल उजव्या हाताला घ्यायची. क्यास पडूनिती म्हनून डोस्क्याव पदुर घ्यायची. डावा पाय दुमडून पाट्याला तेजी तरप लावायची. उजवा पाय लांबवून बसायची.

शेनानं सारवल्याल्या भुईचा क्योर वाऱ्यानं उडून पूरनात यिऊनी म्हनून काळजी घ्यायची. पुरनाचा बारीक गोळा घिऊंन वरूट्यान बारीक वाटायची. पाटाच्या येका बाजून वाटत आल्याल पुरानं बारीक हून फुडल्या बाजूला खाली पडायचं. डाळ लै चिकाट आसंल तर पान्याचा शितुडा मारायची. आर्धा, पाऊन तासात ती धा पंधरा गडी पोळ्या खात्याल येवढं पुरान वाटायची. वाटताना जात्यवली गानी गुंनगुनायची. वाटल्याल पुरान आमी पळवून खायाच. काय चव हुती तेला आनी पोळ्यासनी बी. वाटून झाल्याला पाटा वरुटा धून भिताडाला लाऊन ठेवायची. वरुट्याला पाल चाटाय, मुंग्या लागाय नगुत्या म्हनून कापडात गुंडाळून ठेवायची.

ही ठेवायला बी रोजची फिक्स जागा आसायची. पा, वरुटा वापरणारी, त्याव बारीक करनाऱ्या बायका व तेंच मनगाट बी कनखर हुत. मिक्सर आला पन ती चव पाट्यासंग निगून गिली. लोकांचं शरीर स्वास्थ बी आता सरळ राहील न्हाय. जिबला चव देनारा आनी बायकांचं मनगाट दनकट ठेवनारा पाटा आता दुर्मिळ होत आडगळीत पडलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *