सुवर्णनगरीला तमाशा फडाची १०० वर्षांची परंपरा
सुवर्णनगरीला तमाशा फडाची १०० वर्षांची परंपरा
विनायक कदम:९६६५६५६७२३
सुवर्ण नगरी म्हणून सारया देशात सांगलीच्या विट्याची ओळख आहे. नावाप्रमाणच इथली माणसही सोन्यासारखी आहेत. पैसापाणी हातात आसला तरीही तो द्यायची मोठी दानत या भागातल्या माणसांजवळ हाय. म्हणून तर ग्रामीण भागात कुस्ती, तमाशा व बैलगाड्या शर्यती, यात्रा,जत्रा आजून तरी जिवंत हायत. अनेक कलांना राजाश्रय इथल्या माणसांनी दिलाय. गलाई व्यावसायानिमित्त देशभरात विखुरलेला मात्र उन्हाळ्यात जत्रच्या निमतांन गावं माणसानं फुलायची.

विट्यात गेले १०० वर्ष ७ एप्रिल ते ७ मे या काळात तमाशाच फड येण्याची परंपरा हाय. राज्यातील नामांकित तमाशांचं फड इथं लागत्यात अशी माहिती होती. पण फड कसलं आस्त्यात याची उत्सुकता होती. भर उन्हात एक दिवस विटा गाठलं. संपादक आदरणीय दत्तकुमार खंडागळे सरांसोबत तमाशा फडाच्या ठिकानांव गिलू. ऊन फुडून काढत हुतं आणि आसल्या उनात मंडप घालून आपल्या आपल्या पार्टीची डिजिटल लावून फड मालक जाहिरात करत हुतं. येका वळीतच आखीव रेखीव मांडव घातलं हुतं. काय जणांनी मंडप न घालता ट्रकलाच डिजिटल लावूनच आपली जाहिरात सुरू किलती.
उनांन तलकिली झालती. लाईटची सोय नसल्यानं काय जणांनी वारवशी खाटा टाकल्यावत्या. कुणी पान तंबाखू खात हुतं. कुणी गाणी ऐकत हुतं. कोण चेष्टा मस्करीत ,तर कुणी पत्ते खेळण्यात तल्लीन हुतं. गाडी थांबवली म्हणलं हेंच्या झोपच्या येळा आणि आपणाला माहितीची तलप. नवीन कोणतर आलंय म्हणल्यावर कायजण बावरली. आनी सरांच्या वळखीचा संतोष बाळू भिंगारदिवे हा केंद्रचालक निघाला आणि बरं वाटलं. संतोषन सांगायला सुरुवात किली. राज्यात ४५० तमाशाच फड हायती. आणि ९० हजार लोकांचा उदरनिर्वाह हेज्याव अवलंबून हाय.

राज्यात नारायणगाव ,विटा व काळज या तीनच ठिकाणी तमाशाच फड उभारण्याची परंपरा आहे. पूर्वीच्या काळी तमासगीर डोक्यावर पेट्या आणून फड लावत. शिमगा ते अक्षय तृतीया या कालावधीत फड लावले जातात. कोल्हाट्याच्या ,डोंबाऱ्याच्या व आलीकडं फासेपारधी पोरी तमाशात आल्यात. चांगलं जीवन जगाव म्हणून या पोरी तमाशाकड आल्याच संतोषन सांगितलं. पण गेली २ वर्ष कोरोनाचा मोठा फटका या तमाशा कलावंतांना बसला.
कोरोनामुळ यात्रा व कार्यक्रमांना परवानगी नसल्यान राज्यातल्या ४५० तमाशांच लाखोंच नुकसान झालं. ९० हजार लोकांच्या पोटाचा प्रश्न दोन वर्ष निर्माण झालता. ब्यांक दारात उभी करत न्हाय मग सावकाराकडून अव्वाच्या सव्वा दरानं पैस उचलायच. कधी संपायचा आमचा वनवास संतोष म्हणला आणि काळजात चर्रर्रर्र झालं. शासन मोठ्याच तमाशाना प्याकेज देत बारक्या तमाशांचं काय? अण्णा भाऊंच्या माकडीचा माळ या कथेची तिथं मला आठवण झाली. लाखो लोकांची करमणूक करून कला जपणारया या मंडळींची फडाची जागा लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीत. तमाशाला कधीच आमच्या समाजानं चांगलं म्हणून स्वीकारलं न्हाय. तमाशातली बाय आंगभर लुगडं निसून फडात नाचली तरी ती अश्लीलता आणि चित्रपटात ईतभर कापडात त्या नाचल्या तरीही ती कला. आमच्या डोक्यातली ही मानसिकता कधी जायची. तमाशा खालच्या जातींच्या लोकांचा म्हणून बदनाम, आणि वरच्या जातीच्या लोकांनी उघड नाचत तर काय फरक पडत न्हाय हे बदलायची गरज हाय. नटरंग चित्रपटानंतर तमाशाकड बघण्याचा दृष्टिकोन बदलला.

तमाशांन समाज कधी बिघडला न्हाय आणि भजनांन कधी सुधारला न्हाय. सध्या विट्यात सारिकाबाई हिवरे पुरुनदावडेकर, प्रियांका शिंदे मांडवेकर, संजय हिवरे पुरुनदावडेकर, पायल सावंत गोवंडेकर, शीतल बारामतीकर, शांतालता पंढरपूरकर, चंद्रकांत विरळीकर, प्रणाली बने पडळकर, प्यारनबाई कराडकर, कमल ढालेवाडीकर, निवृत्ती बगाडे गोजुबिकर, चैत्राली पाटील, शारदा नागजकर, बच्चूराम घाटनांदरे, ज्योती स्वाती पुरुनदावडेकर व कृष्णा पुष्पा पुरुनदावडेकर यांच्यासह बरच फड येत्यात. ही नुसतं तमाशाच फड न्हायत तर राज्यातल्या ९० हजार लोकासनी रोजगार देणाऱ्या संस्था हायत..
फोटो सौजन्य: गुगल
मीही या तमाशा फडातील लोकांना रोज संध्याकाळी फड लावलेल्या ठिकाणाहून दिड दोन किलोमीटर पायपीट करून विटा गावात ढोलकी, सुरपेटी असं सामान घेऊन काही स्री कलाकारांना घेऊन सर्वांसमोर मोफत कला सादर करताना पाहिले आहे.
त्यातील लोकांना मी विचारले असता, त्यांनी सांगितले, की आम्हाला इथं येऊन किती पैसे मिळतात हे महत्त्वाचे नाही, आमचा सराव होत असतोय हे महत्त्वाचे आहे. रोज यात्रेनिमित्त आमचा खेळ होईल याची शक्यता नसते. आणि रोज असंच बसून राहण्यापेक्षा पब्लिक समोर कला सादर केलेली बरी. तेवढाच सराव..!
विनायक कदम सर,
आपण गावाकडची मातीतली मानसं आपल्या लिखाणातून मांडत आहात, ही खरोखरच एक अतिशय अभिमानाची गोष्ट आहे…
असंच लिहित रहा, म्हणजे आमची गावच्या मातीशी नाळ जोडलेली राहील… खूप धन्यवाद. 🙏
मीही या तमाशा फडातील लोकांना रोज संध्याकाळी फड लावलेल्या ठिकाणाहून दिड दोन किलोमीटर पायपीट करून विटा गावात ढोलकी, सुरपेटी असं सामान घेऊन काही स्री कलाकारांना घेऊन सर्वांसमोर मोफत कला सादर करताना पाहिले आहे.
त्यातील लोकांना मी विचारले असता, त्यांनी सांगितले, की आम्हाला इथं येऊन किती पैसे मिळतात हे महत्त्वाचे नाही, आमचा सराव होत असतोय हे महत्त्वाचे आहे. रोज यात्रेनिमित्त आमचा खेळ होईल याची शक्यता नसते. आणि रोज असंच बसून राहण्यापेक्षा पब्लिक समोर कला सादर केलेली बरी. तेवढाच सराव..!
विनायक कदम सर,
आपण गावाकडची मातीतली मानसं आपल्या लिखाणातून मांडत आहात, ही खरोखरच एक अतिशय अभिमानाची गोष्ट आहे…
असंच लिहित रहा, म्हणजे आमची गावच्या मातीशी नाळ जोडलेली राहील… खूप धन्यवाद. 🙏
मनापासून धन्यवाद🌿🙏
मनापासून धन्यवाद🌿🙏