--------------------------------- ======================================

रोळ:

रोळ

विनायक कदम:९६६५६५६७२३

तुज्या घरा दाराव रोळ फिरवीन. गावाकडं शिवी म्हणून आजूनबी ही भाषा वापरत्यात. थांबा…थांबा.. थांबा…तुमी रस्त्याच्या कामाच्या रोळ बद्दल ईचार करत आसाल पण मी सांगतोय दगडी रोळ. जेला बैल जुपून वडला जायाचा. दगडाला आकार दिऊन तेला रोळ केला जायाचा.

तवा काय यंत्र हुती वी. सगळी शिती बैलांच्या जिवावर. बक्कळ पाऊसपाणी. उन्हाळा ,पावसाळ वड्यासनी पाण्याच्या धारा. तवा , धनधान्या ठेवायला घरं पुरायची न्हायत. रानातली पीक पाच, पाच ,सहा महिन्यांची दमदार. तेला चव हुती. वैरणी, भुईमुगाच, कडधान्याची काड पावसाळ्यात जनावरांसाठी येवस्तीत माणसं रचून ठेवायची. मळायला मिशनी न्हवत्या मग रोळानच धान्य काढायला लागायचं.

पिरणीच्या वक्ताला रानातनी बांधावर खोपाट आसायच. रानात काम करणारी माणस ऊन पावसात खोपटाचा आसरा घ्यायची. रानातल सामान सुमान, बी बेवळा, मुसकी, चाबूक, वटी, जेवाण, पाण्याची घागर, बारकी पोर ,अवजारच काय कुत्रीबी याची खोपटात बसायची. साऱ्यांच्या हक्काची जागा मजी खोपाट. पीक गर्भार बायवानी भरलं की पाखर तुटून पडायची. आणि गुफणी घिऊन सकाळी सकाळी हाळ्या दिऊन श
शिवार जागा व्हायचा. भल्या पाटच उठून माणसं राखणीला जायाची. सुट्टीच मचाणावर पोर तेलाचं, पत्र्याच डब वाजवून पाखर हानायची. पाखरांचं थव मधाच पोळ लागल्यागत कणसाला चिटकायची. आणि बगळ टोळ, तुडतुड, आणि आळ्या खायाला पिकातन फिरायची.

दिवाळीला पीक कापणीच्या आधी शेतात खळ करायचं. जित करायचाय तिथली ताट काढून पाणी टाकून त्यावर बैलांचा रोळ फिरवून फिरवून रान कठीण करायची. कठीण झाल की बायका खळ शेनांन सारवायच्या.

शस्त्रपूजन झालं की हत्यार यीळ, खुरपी लाऊन दिवाळीत पीक कापणीच्या कामाचं तलाल उटायच. शेनान रान रंगल्याली असायची आणि पिकाच ताट उसागत याक याक याच. मानसबी जनावरांच्या ताकतीची. पाटच पालथी पडायची ती आकरा बाराच्या दरम्यान हिरीवर आंगुळा करायलाच सुट्टी. बैल बांदावर बांधून तिथलीच ताट कापुन घालायची. घरातन डालगा भरून आलेल्या जेवणाव भुक्याजल्याली माणसं पालथी पडून बुक्का उठवायची. खाऊन डुलका काढायचा आणि ऊन खाली झालं की परत भिडायच. आसा दिनक्रम. कापून चांगली ऊन बसली की खुडणी व खळ चालू व्हायचं. दान तापल्यावरच भाईर येत आसल्याण बैल व रोळ दिवसभर फिरायचा.

रोळ कंनसातन बी काढून पिशा करून सोडायचा. त्या पिशातनबी बाया बडावण्यांन बडवून काढायच्या. वाऱ्याला उपनायला माणसं आसायची. ऊनापासन बचावासाठी एरंडाच पान टकुरीवर घ्यायचं. खळ्यावर वरीसबरच बईतकरी ,भिकारी, आकारी, रुयली, दरवेशी, वासुदेव, कडकलक्ष्मी, नंदीबैल ना ना तरची मानस याची. शेतकरी न्हेणारा वाकोसतर वज हुईल एवढ धान्य दयाचा. दानत लय मुठी हुती. लाकडी गाड्याच साठ भरून पुती घराकडं याची. घरातनी ठेवाय जागा पुरायची न्हाय , तीन तीन वरीस पूरल येवढ धान्य पिकायच. पूर्वीचा त्यो ताल आता गेला. बायकासनी आता पाकडाय ईना आणि गड्यासनी जनावरांच दाव बांधाय ईना. ट्रॅक्टर आला आणि बैल कापायला गिली. त्यांच्या घुंगराचा नाद ,गोठ्यातल हांबारण ,चाबकाचा कडाडणारा आवाज, शिवारात बैलक्यांन बैलामाग म्हणल्याली ववी आणि नांगरामाग दिल्याली पल्लदार हाळी आता कानाव येत न्हाय.

बैलांची आवजार गायब झाल्यात.रोळ कुटतर अडचणीत पडल्यात. खळ्याव उपणणारी बाय काय गड्याच जेवाण न्हेणारी बायबी काय नांगर धरणाराबी गडी आता दिसत न्हाय. पीक बदलली , रासायनिक शेतीन शेतीच वाटोळं झालं. पाखर शेताकड कमी झाल्यात कारण त्यासनी खायाला लागणारी पिकच न्हायती. खळ बंद झालं ,यंत्र एका तासात मळू लागली. पीक पद्धती बदलली रान काम दिनात ,खळ्याव येणारा बारा बलुतेदार गायब झाला. प्रत्येक नक्षत्रातनी हाळी दिउन येणारा पाऊस आता पावसाळ्यातबी पडणा. ग्रामीण भागाच वैभव नष्ट झालंय. दोन दिवसापूर्वी लोढ्याच्या तळ्यावन आरवड्याला जाताना रस्तात योक रोळ रस्त्यात जुन्या दिवसांच्या आठवणी काढत शोक करताना दिसला. त्याला हातानं स्पर्श करताच जुन्या आठवणींन अंग शहारल.फुटू काढला आणि त्यावर ही येडवाकड खळबर लिवल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *