--------------------------------- ======================================

आयुष्य उजळवनारा “खंदील”

आयुष्य उजळवनारा “खंदील”

विनायक कदम:९६६५६५६६७२३

खंदील….! रस्ता चुकल्याल्या वाटसरूला वाट दाकवनारा, आंधाऱ्या रात्री रानात काम करणाऱ्या शेतकऱयाचा सोबती, रानातन पिक पाण्याचं आल्याल पैसे मोजाय ऊजीड दावनारा, तमाशाच्या फडाच्या ताफ्याला वाट दाकवनारा, पिंगळ्याला भिक्षा
मागायसाठी भल्या पाटच आंधारात रस्ता दावनारा, पावन आलं की उजीडासाठी शेजा पाजाऱ्यांच्या येकमेकांच्या घरी देवान घेवान हुनारा, येकादया सासुरवाशिणीला आंधाऱ्या रात्री चुरून पत्र वाचाय मदत करनारा, तर त्याच्या उजेडाव आभ्यास करून आनेकांची आयुष्य उजळवून टाकनारा व ग्रामीण भाग प्रकाशमान करनारा खंदील आज लायटीच्या डोळ दिपवनाऱ्या प्रकाशामुळ आंधाऱ्या काळोखात लुप्त झालाय…..!

पत्र्याचा बुड आसनारा खंदील व काळा धूर वकनारा दिवा मजी ग्रामीन भागाचा येक काळचा जनरेटरच..! खंदील ह्यो ग्रामीण भागाचा एक स्वतंत्र विषयच हुता. मजी त्यात राकील घालायचं, सुती वात ,राख टाकून तेजी काच पुसायची, नाळक लाऊन त्यात राकील वतायचं, काजळी काडायची ही जबाबदारीच व शांत माणसानच कराव आस काम. खंदीलाची घरातनी खूट्टीला शेपरेट जागा आसायची. दिस मावळतीला खंदीलाची साफ करायची काम उरकल जायाच. आंधार पडला की गावं च्या गावं खंदील उजळून टाकायचा. मातीच्या चुलीवर ढनाढना जळनारा दिवा तव्यात भाकरी टाकायला ,कालवण तयार कराय मदत करायचा. पोर खंदिलाच्या ऊजीडात ऊजीड यील तितवर बसून भुईला गुडग टिकवून ,गालाला हात लावत कोपार पुस्तकावर टिकवून आभ्यास चालायचा.

ह्याच खंदिलाच्या उजेडात रानातन हिंडून आल्याली जनावर गोठ्यात बांधायची. खंदील मदी ठेऊन सार घर तेज्या उजीडात जेवायला बसायचं. जेवान खान झालं की रानात राकनीला, पानी पाजाय, वस्तीला पारा दयाय जानाऱ्या शेतकऱयासाठी खंदील मजी साथीदारच ! येका हातात काटी व दुसऱ्या हातात खंदील घिऊन काळोकाची वाट तुडवनारयाला आपली सावली बघूनच भ्या वाटावं..! मग लांबन रस्त्यावल साप किरडू जावावं म्हणून गडी खाकरायचं. हाळी दिऊन कोण हाय? पलीकडन खंदील आला तर त्यो तोंडाव ऊजीड पाडून आपली वळख पटवून दयाचा. रानाला पाटांन पानी देनारा पानक्या माणूस भुंड्याव खंदील ठीऊन दुनी हातानी दार धरायचा. पाटाच्या पान्यात कधी किरडु दार धरनाराच्या हातावर चढायचं. हाताला झिंजाडा मारून उजीडात काय हाय बगाय लागायचं.?

तमाशाच फड गावातनी बैल गाडीतन याचं. गाडीवान दुनी बैलांच्या मदी गाडीच्या दांड्याला खंदील आडकवायचा. त्या उजीडातच गावोगावचा मैलो न मैल प्रवास चालायचा. भल्या पाटच भिक्षा मागनाऱ्या पिंगळ्याला तर खंदील मजी दोस्तच ! पावन आलं की घरा घरातनी या खंदीलाची देवान घेवान व्हायची. लग्नात तर हामकास देवान घेवान व्हायची. पूर्वी रेशनकार्डवर मुबलक राकील मिळायचं. खंदिलाच्या ऊजीडान लय जनासनी घडवलं. ती मोठ्या पदावर गेलं. आयुष्यच काय तेंच संसार बी उजळल. पन चांदण पेरनारा खंदील काळाच्या वोघात गायब होत भंगारात गेलाय. आता तेज्या काचचा वापर देवाच्या खुलीत दिवा ईझू नये म्हनून लावाय केला जातूय. मोठमोठ्या सिमेंटच्या घरात आताही कंदील दिसतुय.? पन त्यात राकील व वात नसत्या. सरकारी कृपेन आता गावातनी लाईट आल्या. जनरेटर इन्हवरटर, सौर खंदील आल्यान गावं उजळल्यात. पन लाखो जनांच्या आंधारातल्या वाटा प्रकाशमान करनारा खंदील आंधारात लुप्त झालाय…!

फोटो सौजन्य:गुगल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *