भाकरीच्या बुट्टीच शिकाळं :
भाकरीच्या बुट्टीच शिकाळं :
विनायक कदम: ९६६५६५६७२३
आता शिकाळां मजी ही कायतर भानगड हाय आसं आलीकडच्या पोरासनी वाटलं. पन ग्रामीन भागाचा समृद्धी सुवर्णकाळ बघितल्या मानसं आनी भाकरीच्या बुट्टीच शिकाळीं ते पडत्या काळाची दुखरी आठवतं. वीस वर्षापूर्वी कालचा मजी अनुभवीनी माळवताची, रानात छपराची.कुंतरी कौलारू आसली घरं. मानसांची परिस्थिती बेताचीच. पोटाला खायाची मारामार.
त्यालं हाय तर चटणी न्हाय, चटनी हाय तर त्याल न्हाय असल्या परिस्थिती. छपरात ढनांना पेटल्याल्या चुली आनी त्यावर भाजल्याल्या भाकरीला आसल्याली चव कशाला न्हवती. बाजरी, सातू, मका, शाळू , कार जुन्धळ आसलं सा सा म्हयन पिकल्याला धान्य. तेज्या भाकरी बायका दोन हाताव फिरवून आशा कागदागत करायच्या. नव्या पूरी आसल्या तर लाकडाच्या काटवतीत करायच्या.
भाकरी आताच्यागत स्टीलच्या डब्यात , प्लॅस्टिकच्या डब्यात बायका ठेवत न्हवत्या. तर तेला कळकाची बुट्टी हुती. घरात ढीगभर खानारी तोंड आसायची. बायकासनी बुट्टीत शिग लाऊन भाकरी करायला लागायच्या. सकाळच, संध्याकाळच खाऊन झालं की भाकरीची बुट्टी शिकाळ्यात ठेवायची. शिकाळं मजी भाकरीची बुट्टी. बारकी पोरं, कुत्र, मांजार, मुंग्या हेंच्या पासन भाकरी सुरक्षित, हावशीर चांगल्या राहाव्यात म्हणून केल्याल साधन.
दांगडीच्या येलापासन शिकाळं पूर्वीच्या काळी मानस करायची. कसाबी वळनारा दांगडीचा येल लै कटीन. तेला खाली गोलाकार चुंबळ करायची आनी तीनी बाजूला तीन त्या येलाच्या दोऱ्या. माळवतीच्या घरात तुळया, छपराच्या आड्याला बांधल जायचं. खानारी तोंड जास्त आसली की टोपलं कायम मोकळं पडायचं.
शाळा सुटली की पोटात आग पडायची. घरात जाऊन बुट्टीत किती भाकरी हायत बगाय लागायचं. कवा भाकरी आसायची तर कवा पुरती नसायची. भूक व अन्नाची किंमत तवा कळायची. घरच्या बुट्टीत भाकरी नसल्याव उपाशी राहिल्याली आनी शेजारच्या घरातल्या बुट्टीतली भाकरी चुरून आनून खाल्याल्या भाकरीची त्या काळातल्या पोरासनी आज बी तेजी जानीव हाय.
आज्जीचा चुलीवला सयपाक, आयच्या काळात काळात स्टोव्ह आला. आता गॅस आला पन हाताची चव गिली.
काळं बदलला मातीची घर, उसाच्या पाल्याची घरं जाऊंन काँक्रीटची घर आली आनी भाकरीची बुट्टी व शिकाळं घरातन कायमचं हद्दपार झालं.