चिचनीच्या बाळूनानाची पल्लदार हाळी:
चिचनीच्या बाळूनानाची पल्लदार हाळी:
विनायक कदम:९६६५६५६७२३
‘हाळी’ हयो प्रकार शहरात तसा दुर्मिळच. पन गावाकडं बी हाळी आता बंद झाल्या. कारन मोबाईल आला, मानस मुकी झाली. मोटारसायकल आली, मानस चालायची इसरली.आनी माव्या घुटक्यानं पोरांची तोंड उघडनात. मग कुनाच्या तोंडात आलय हाळीला बळ. नुसतं बोलायला कोन कुनाला तयार न्हाय. मोबाईमुळं पारावर, देवळात, शेतात, बांधाव, झाडाखाली, हिरीव बसल्याली मानसं मुकी झाली. ज्यो त्यो तोंडात कायतर टाकून आपल्याच गुंगीत व तंद्रीत. मानसं त्यातन भायर याला तयार न्हायत. पूर्वीच्या मानसाची हाळी भल्या पाटच सका.. सकाळी सुरू व्हायची. बैल मोटला जुपल्याव, गाडीला जुपल्याव, खांद्याव जू घ्यायला रामपाऱ्यात बैल आडयेड घ्यायची. मग बैलक्या व मोटक्याची तोंडातन हाळी दिऊन सापकीरना शिवी याची.
त्या भारदस्त आवाजातल्या शिवीत दहशत, दरारा व राग व्यक्त व्हायचा. बैल झटक्यात जू खांद्याव घ्याचा. शेतातल्या कामाला सकाळी जुपल्याव बैलांची बाराच्या टायमाला रानातल्या कामासन सुट्टी व्हायची. सुट्टीच्या टायमाला वैतागल्याली बैल आडयेड घ्यायची. मग मालक पल्लदार हाळी दिऊन नांगरटीतला ढिकूळ शिंगटात नायतर शिवळव मारायचा. बैल चराचरा लांबत आवत वडायची. इतकी हाळीत ताकत हुती. बैलांच्या शिरती, वैरन भरल्याली गाडी चडाला लागायच्या आदी मालक हाळी दयाचा. बैल आतराळी हुन चड काढायची. आमच्या गावात इन्कू आबाचा दाजी, बाळू चवान, सुबराव आण्णा, लकसू दाढी, काका आण्णा, म्हवन सरगर, दगडू चरमण, बुध्याचा लक्ष्मण आण्णा, साधू नाना, भारदस्त व पल्लदार आवाज लाभल्याली मानसं. यंकू आबाचा दाजी जर कूट आराडला तर शिवारात कुणाचाबी बैल आसुदी हागून घ्याला पायजी.
मी बारका आसताना आमचा आण्णा बेरडकीत कुनाकड काम आसल, पैशाची मोड पायजी आसली की हाळी दयाचा., ये…….शिवा…. दोन हाळ्यानंतर आवाजाला उत्तर याच न्हाय पण तिसऱ्या हाळीला ओ….. म्हणून प्रतिसाद याचा. कमीत कमी किलोमीटरवर चेष्टवारी आवाज जायाचा. आनी रोज आयकाय येणारी शिवान शिवाला मारल्याली हाळी आता कमी झाल्या. तवा मोबाईल ह्यो प्रकार न्हवताच. इष्टी आली…य पळ आसली हाळी बस स्टँड वरन याची. शेताला मोटार चालू आसायची लायट आल्या, गेल्या, पानी संपलय ही आसल सांगावं हाळीवरच दयावं लागायचं.
चालत जाऊन मोटार चालू करायची म्हनला की पानक्या मरून जायाचा. आवाज पोचाय साठी हाळी मारनाऱ्या मानसाला कुतून आवाज काढाय लागायचा. नायतर आडचनीतल्या वाटा तुडवत बोंबलत जायाला लागायचं. कोन पावना आला, तर हाळी दिऊन कळवायला लागायचं. उनाचं तान लागल्या पानी घिऊन य म्हणून सांगाय हाळी दयाय लागायची. हाळी मजी पुरशीपनाची परीक्षाच. कुणी हाळी दयाय सांगिटलं आनी आवाज बारीक काढला की थूरली मानसं म्हणायची आर… पादाय लागलाय का… हाळी मारतुयस?. गडी हायस का न्हाय. गड्यागत आवाज काड की जरा. मग बिंबिच्या देटाला वड दिउन हाळी माराय लागायची. हाळीची परीक्षा उसाच्या टॉल्या, वैरनीची गाडी आवळताना वडनीला हिसका मारताना हुत्या.
जुन्या काळात मानस रानात हाब्रेट, ज्वारी, शाळू आसली पीक मोठ्या प्रमानात घ्याचा. उंचवटा करून नायतर येकाद्या झाडावर काठ्या बांधून बसाय काय झोपाय बी यील आसला माळा बांधायचा. त्याव दगाड गोळा करून ठेवायचं. आनी गुपनीतन दगाड भिरकवायच. पिकाव पडल्याल्या पाकरांचा थवा आकाशात चिरमुर यिस्कटावा तसा उडायचा. कधी कधी पत्र्याचा तेलाचा डबा आसायचा. त्यो वाजवाय भारी मजा वाटायची. शेताच्या बांधावर हातात गोफन घिऊन सकाळच्या पाऱ्यात राकनीला आसल्याला गडी पाखरासनी धुडकवाय पल्लदार हाळी मारायचा. दोन दोन किलोमीटर वर शिवारात कुणीतरी धाऊन आल्यागत आवाज याचा. आवाजानं शंभर दोनशे एकऱ्यातल रान जिवंत व्हायचं. आयकनाऱ्या कानासनी बरं वाटायचं. कोन काय राखतुय, कुटलं पीक हाय, कुटला शेतकरी हाय हेजी गावात, शिवारात चर्चा व्हायची.
द्राक्षी पिकायचं टाईम हुतं. पाटच चुलीफूड शेकत बसलूवतू. तोंडात त्वांड दिसत हुतं. पाकरांचा किलबिलाट सुरू हुता. गारठ मी म्हनत हुत. शुद्ध हवा हुती. आनी वातावरण एवढं प्रसन्न हुतं की येकादा मेल्याला मुडदा जिवंत व्हावा. भारी वाटत हुतं. तवर हे….हे..हे… हे…हे… हु …. आसा भारदस्त आवाज कानाव आला. पयल्यानदा वाटलं कोन गडी हाय? काय राकाय आलंय. ईचार करत हुतु तवर परत हाळी कानाव आली. परत धेनात आलं लगा ही चिचणीच बाळू नाना हाय. नाना आमचं आर्धा किलोमीटर वर आसल्याल्या शेताच शेजारी. पिकल्याली द्राक्षबागा काढाय आल्या आनी पाकर मनी फोडत्यात म्हनून गडी हाळ्या देत हुता. रान तेंच्या हाळीन जिवंत आनी प्रसन्न झालत. तसं बाळूनाना मजी भारदस्त आवाज लाभल्याला रांगडा गडी. बाग लागन केल्याव पाटान पानी पाजत आसायचा. सकाळच्या वातावरनात पानी सुरू आसायच. आनी स्वतःला आवडनारी गानी मनसोक्त पल्लदार आवाजात म्हनत कोलांट्या उड्या मारायचा. शिवारातल्या सगळ्यासनी म्हायती हाय. पन कोन काय म्हनलं म्हनून कधी लाजला न्हाय. मानसानं आसच जगावं मनसोक्त. शनवारी ठरवलं हाळी कानाव आली की जायाचं पळत आनी व्हिडीओ रेकॉर्ड करायच. त्या आवाजानं मला याड लावलवत. माझं कान जीव आनून मी तिकडं ध्यान लावलावत.
आवाज आयकाय कान आसुसल हुतं. पन आवाजच आला न्हाय. मला वाटलं नाना आलं न्हायत वाटत आज. डोसक्यात दिवसभर आनी रात्री झोपुस्तर हाळी घुमत हुती. रविवारी सकाळी झुं झुरकाच हाळी आली आनी मी बाळू नानाच्या बागकड बिन आंघुळीचाच पळालू. नानाला हिकडं पाखर आली म्हनत म्या साद घातली. जवळ जाऊन बगीटल. हातात गोपन घिऊन दगाड भिरकावत हुतं. मी सांगिटलं मला तूमची हाळी रेकॉर्ड करायच्याय? बाळूकाका व्हय म्हणलं, मातीतन दगुड हुडकून गुपनीत घाटला आनी पल्लदार हाळी दिली. कान तृप्त हुन पॉट भरल्यागत झालं.
आलीकडं सैराट पिच्चर मधी लंगड्या नदीच्या दुसऱ्या काठाला उभं हुन राहून हाळी देतो. त्यासनी आयकाय जात न्हाय. ही म्हनत्यात आर ही का आरडाय लागलंय. हेला काय चावल बिवल का काय. आनी लंगड्या शेवटची कुतून हाक देतो…ये……परश्या…… आररर………आर्ची…. आली…आर्ची. आता आमच्या पोरांची तोंड मावा, घुटका, तंबाकू खाऊन बारीक झाली. मानसासंग बोलायला बी ती उघडनात मग हाळी कुटली देत्याल….
जाम आवडलं, एवढं बारकाईने निरीक्षण करून खूप छान लिहिले आहे ही खरी बाळू नाना च्या हाळी ला दाद आहे आणि हा लोप होत आलेला प्रकार पुन्हा जिवंत केला आणि ऐकवला…धन्यवाद विनायकराव
👌👌👌👌👌👌👌👌