बापाची ३३ वर्ष जुनी बैलगाडी पोरांनी जपल्या:
गर्दीतला आवाज:
बापाची ३३ वर्ष जुनी बैलगाडी पोरांनी जपल्या:
विनायक कदम:९६६५६५६७२३

आलीकडं कुनाला घरातनी जुन्या काळातल्या कूट तर शिल्लक आसल्याल्या काय वस्तू बिस्तू खपना झाल्यात. लाकडाच्या आसल्या तर त्या आमी जाळून टाकल्या. उदारन म्हनला तर लाकडाच मुसाळ, ताकाच्या रव्या, शेवाळ्याचं पाट ,उलतान, टिकाव, फावडं, खोऱ्यांचं दांड, मातीच्या वाड्यातन काडल्याल्या आकीव रिकीव तुळया, लाकडी फन ,कुळव, दांड्या, कुळपी, लाकडी बैलगाड्या. ही कितीबी चांगलं आसलं तर आमी तेजा जाळून कोळसा केला. बाकीचं म्हनला तर पत्र्याच्या पेट्या, बैलगाड्यांच कंन, हात्यारं, कुराडी, कोयत, यिळ भंगारात घालून आमी मोकळं झालू. दुसरं दगडी म्हनला तर उकाळ, जातं ,पाटा, वरुटा कवाच आमी घरातन भायर भिरकाटून दिलायं. ती कुटल्याच कामाचं न्हाय म्हनून आमी तेला आडगळीत टाकलं. तर काय आवलादिनी घराच्या बांधकामाच्या पायात घालून तेजा निकाल लावला. आता तुमी म्हनचीला आर फुकनीच्या हितं म्हातारी मानस वृद्धाश्रमात पडाय लागल्यात आनी तू वस्तूच काय कवतुक सांगायलायस.

ही खराय रावं. पन आता मानसासानी भावना, संवेदना, जिव्हाळा आसल काय राह्यलं नाय. बोकडागत मानस वागाय लागल्यात. रक्ताची नाती आसून बी मानस जिवंतपनी क्रूर वागायला लागल्यात. पन तासगावात चंद्रकांत पवार नावाच्या येका उद्योजक पोरानं आपल्या बापाची ३३ वर्ष जुनी, सागवानाची, बंदा रुपाया लाकडी बैलगाडी जिवापाड जपल्या. नुसती जपली न्हाय तर तिला स्वताच्या लाखो रुपयांच्या चारचाकी गाडीपेक्षा जास्त जपल्या. हिंदुराव कृष्णा पवार तसं मूळ शिगावच. १९५०,५५ च्या दरम्यान तासगावला आलं.भूमिहीन हुतं. येका बामनाची १६ येकर रानं बा नं करायला घेटलं. प्रामानिकपनी ती रानं पिकवायचं. हुलग, मूग, मटकी, भुयमुगाच्या शेंगा, जुंधळ, घव, खपली, बाजरी, शाळू, हारबर, मक्क, हाळद बक्कळ पिकायचं.
रान करायला तवा बामनाची दांडगी चार बैल हुती. १६ येकर शिती ती वटवायची. खाऊन खाऊन डिरकायची. आज्जा माळकरी हुता. प्रामानीकपनी बांद राकला म्हनून ४ येकर शिती चिचनी रोडला बामनांन ह्यासनी दान म्हनून दिली १९६०ला. तवाची मानस प्रामानिक बी लै. आनी दानत आसनारं गडी बी लै हुतं. भूमिहीन मानसाला स्वताची शिती झाल्याव तेज्यासारखं सुख काय आसलं. शिती करायला हिंदुरावांन दोन बैल घिटली. लगीन हून प्रपंचा सुरू झाला. विजय,भागवत, अशोक व चंद्रकांत चार पोरं झाली. खानारी तोंड वाडली.
तवा सारी मातीची, दगडी माळवताची घरं. कवातर दरजा भराय वाळू लागायची. तवा बैलगाडी शिवाय पानं हालत न्हवत. मग लोकासनी घरं बांदाय बैलगाडीन दगाड, माती, वाळू वडाय जुपी किली. इंदिरानगर झोपडपट्टी जवळच्या खानीतन तेंनी दगाडं वडल्यात. आताच्या येवडा तासगावचा ईस्तार न्हवता. चंपाबेन शाळा, भारती शाळा, शासकीय गोडाऊन, आनी निम्म्या तासगावला तेंनी घरं बांदाय माती ,वाळू, दगाड टाकल्यात. ही काम करत आसतानाबी तेंच काम येवस्थित आसायचं. झुंझुरकाच बैल जुपली की १२ जू सोडायचं. परत कुनी लाक रुपय दितू म्हनला तरी जू बैलांच्या खांद्याव याचं न्हाय. येगदा शेजारचा योक मानूस मेलावता. जळान न्ह्याय लोकानी मिनत्या केल्या तर बा…नं गाडी जुपली न्हाय.

तवा गाडीला खेपचा दर २ रुपय हुता. आनी मजुरी २० पैशे हुती. बैल नेटाच काम करत्यात म्हनून बा पोटच्या पोरांच्यापेक्षा बैलासनी जपायचा. खपलीच घव, मक्याच्या किरळ्या, तुरी, भुयमुगाच्या शेंगाच बुस्काट खाऊन बैल डिरकायची. हात्तीगत बैलाची जोड बगून मन गार व्हायचं. नुसती लाकडी बैलगाडीच न्हवं तर कसलबी आवत बैल दुमत करायची. लय ताव हुता. दिवस जात हुतं. पोरं शाळा शिकत मुठी होतं हुती. हिंदुराव बैल आनी बैलगाडीच्या जिवावर सारा खर्च ,प्रपंचा रेटत हुतं. पोरांनी चांगलं शिकून बापाच्या कष्टाला सलाम केला. योक ईष्टीत, दुसरा लष्करात आनी बाकीच्या दोगांनी कष्टांन हामाली करत बेदाना धंद्यात जम बसवला. दिवस चांगलं याय लागलं. वय झालं. बापाचं म्हेनतीच काम पोरांनी कमी केलं.
बैल निवांत हुती. आनी कोल्ड स्टोरेज जवळच्या छपरात ही लाकडी बैलगाडी ईसावा घेत हुती. १९९१ ची गोष्ट आसलं. आपल्या माग पोरं काय करणार न्हायत म्हणून बा बैलगाडी ७ हजाराला यिकाय लागला. चंद्रकांतन १० हजार बा ला दिलं. बा म्हनला आरं मला पैस कशाला. ह्यो म्हनला तुजी गाडी माज्यापशी कायम राह्यलं. हिला कवा इकायच नाय. ती मूक आसली तरी तिला भावना न्हायत का..? बा च्या डोळ्यात पानी आलं. चार वर्षांपूर्वी बापाचं निधन झालं. आनी बा ची आठवन आनी ज्या गाडीच्या जिवावर आपुन जगलो. ती गाडी आपुन आयुष्यभर जपायची ही तेंनी ठरवलं. चंद्रकांतन भाळवनीतल्या एका मानसाकडंन दुरुस्त करून घिटली. बावकाड, दांड्या, येटाक, जू नवीन घाटलं. लाकडी काट्याच घोडं तयार केलं. बाकीचं सारं येवस्थित हुतं. गाडी कलर मारल्याव दिकनी पानं किली.

गाडीच कामं झालं. चंद्रकांतन चिंचनी तासगाव रोडला रानात बापाच्या लाकडी बैलगाडीसाठी सिमेंटच्या पत्र्याच शेड मारलं. शेडला तोरानं बांधलं. शेड च्या फूड बसायला सिमेंटच बाकड टाकलं. प्लॅस्टीकच्या क्रेट मदी फुलांची झाड लावल्यात. बापाच्या गाडीच्या बाजूला तेंची धा, वीस लाखाची चारचाकी गाडी हाय. पन ते तिज्यापेक्षा बैलगाडीची काळजी घेत्यात. रस्त्यावन येणाऱ्या जानाऱ्या मानसासनी तेज कुतूहल वाटतंय. काय मानस येत्यात फोटू काडत्यात. सकाळचं फिरायला येनारी मानस तीत बसायला येत्यात. ती बैलगाडी आख्या तासगावात चर्चेत हाय. यिकीकड म्हातारं आय बासनी पोरं घरातंन भायर काढत वृद्धाश्रम दावायल्यात. आनी यिकीकड बापाची आठवन बैलगाडीतन जपनाऱ्या या मूलखायेगळया मानसांकडन आमी भावना बोथट झाल्याल्या भावनाशून्य मानसानी काय शिकावं….?