--------------------------------- ======================================

मसरं हिंडवायला:

मसरं हिंडवायला:

विनायक कदम:९६६५६५६७२३

दिवाळीची सुट्टी, उनाळची सुट्टी आनी शनवार, रववार आसला की माजी मसराकड दुटी आसायची. मसरं हिंडवायची मजी लै भारी काम. आमच्या दावनीला शंकर आप्पाची थुरली म्हस, तिजी येक, येक नांत, दिशी गय, तिजा देकना खोंड, आनी तिनी मशीची तीन रेडकं. आट, धा जनावराचा सारा खटाला. साऱ्या आवलादी येगळ्याच तरच्या. कायनी त्वांड वर केलं की तिकडचं टोंगाळा करायच्या. पायात खाली कुटलं पीक हाय, नुकसान हुईल् आसंल काय न्हाय.
सकाळचं धारा पिळून झाल्या की बिरडं फुटायच्या टायमा आगुदर आपून तनकाटून खायाचं, पानी प्याच. आनी दूनी किशात भरून खायाला शेंगा घ्याच्या.

दोन जाती जरा लैच दमवायच्या. रस्ता दिसला की भिंगरी ऊटवायच्या. भूयला त्वांड लावायच्या न्हायत. मग त्यासनी लोडना घालायचा. येक मस लोडन्यालाबी जुमानायची न्हाय. मग जांबळीच्या झाडाचा योक दचक्या ठाळा पडलवता. चांगला सा फूट तोडला. मशीच्या गळ्यातल दावं लांबत केलं. मशीच्या दुनी पायातन भायर दोन फूट लोडना आला. पळाय लागली की लोडन्याव पाय पडायचा. पळायलाच यांचं न्हाय. आबदा व्हाय लागल्या मग जरा सुराला लागली.

बिरडी फुटली की मसरं पाय मोकळ करायला उड्या घ्यायची. काय जन निवांत मुतत रस्ता चालायची. रस्त्यात झाडं दिसल की मसरं आंग घासायची. आंगातली मस्ती घालवाय काय जनी दोन पायाव यिऊन शिंगान माती उक्रायची, नायतर दुसऱ्या मशीसंग झुज खेळायची. आस्ल्या तेंच्या तरा. टकुरी यिवडी निरगुडीची फोक म्या मसरं सोडायच्या आदीच वड्यातन आनून घुळून ठिवलीवती. काल हिंडवाय न्हेल्याल्या रानांतच मसरं वाट काडत जायाची.

मसरासंग मी येकटाचं न्हवतू?. माशा, गोचड्या खायाला काळा कोतवाल, पांडरा बगळा तेंच्यां शिंगाव, पाटीव बसून डुलत.. डुलत वरात निगायची. मशीच्या कनाट्याव हागल्याल्या बगळा तेजा वगुळ नक्षी काढल्यागत मशीच्या बिंबी पातूर जायाचा. मसरासनीबी तेंच्या चोच्यामुळ मालीश केल्यागत वाटायचं. जुंधळ, हाब्रेट, शेंगा, मक्क, सोयाबीन काढल्याल्या रानातनी खायाला ढीगभर आसायचं. कडब्याच्या पेंड्या बांदताना पडल्याला पाला, शेंगाच यालं, गवताचं यालं खायाला आसायचं.

थूरली मस मन लाऊन खायाची. कुटल्या पिकात शेंड नायतर, वल्ल खायाला घुसायची नाय. शाज धरून गप गार हिंडायची. दुसरी झवनी त्वांड वर केलं की तिकडचं जायची. मग शिंगात धपका बसलं आसा धोंडा नेम धरून घालायचा. मग त्वांड मागं करायची. क्यानल, यिंकु आबाच माळ, दयानू पाटलाचं पडाक, बाराभाय ह्या आमच्या फिक्स जागा. संज्या बकरा परत शेरड घिऊंन याचा. दोगांच टायमिंग येकच. त्यो पान्याची बाटली, आकडी, कुराड,वायरच्या पिशवीत जेवान आनी काज्या बिड्याचा बंडल घिऊंन याचा.

रानातनी भर उनाचं बिड्या वडायच्या आनी मस्तीत धूर सोडायचा. खेकड, मास , चितार, लाव्हार धरायचं. माळाला दगाड उलट करून यीच्चू मारायचं, नांगरल्याल्या रानात शेंगा चाळायच्या. दांडगी चव तेला. उनाचा चपाटा लागला की मसरं दम काडायची न्हायत. मग पानी पाजाय त्यासनी वडा दावायचा. मसरं पॉट फुटूस्तर पानी प्यायची, मेल्यागत पान्यात पडायची. चिकलात लोळायची. शिट्टी घालून पानी पाजायची, त्यासनी कुचीचा धोंडा घिऊंन घासाय बरं वाटायचं. मसरं शेपाट वर करून प्रतिसाद दयायची. तेंचा घासल्याला मळ खायाला माशाच्या झुंडीच्या झुण्डी पान्यात गोळा व्हायच्या.

खाली पायाला तोंड लावाय लागल्या की गुदगुल्या व्हायच्या. दिवसभर तरं तरचं पालं ,गवात मसरं खायाची. तुडुंब पॉट व्हायचं. रस्त्यानं चालताना पाय फाकुन हागत मसरं घराची वाट दीस मावळताना धरायची. घरात आसल्याली तानपी रेडंक तवर टोंगाळा करायची. दावनीला गेल्या गेल्या आय चाटून मया करायची.

दाव्याला धुसन्या मारून प्याय बागायची. तटाटल्याल्या मशीच्या कासंला रेडाक दमगीर हुस्तोर प्यायचं. घागरीन दूध निगायचं. दिवसभर रानात मुलकातानी हिंडून भेंडाळून आल्याली जनावर राच्च पाय पसरून मनसोक्त झोपायची. रवत करून करून तोंडाला पांढरा धोट फ्योस याचा. सकाळचं पाटी बरं येक येक मस हागायची. रानात बारा तरंचा झाडपाला, वैरन जनांवर खायाची. येळला माजाव यायची, गाब जायची. हिंडून आल्याल्या जनावरांच्या त्या दुधाला चव हुती. चुलीवर लाल भडक हुस्तर दूध भगुन्यात तापायचं. आता गोठ्यात मसर बंदीस्त झाली. येकच वैरण खाऊन खाऊन जनावरांच्या मागं बी आता पन्नास तरच्या व्याधी लागल्यात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *