पर्यटकांना खुणावतोय आटपाडी तालुका:
पर्यटकांना खुणावतोय आटपाडी तालुका
विनायक कदम: ९६६५६५६७२३
आटपाडी तालुका म्हनलं की डोळ्याफूड ऊबा राहतो तितला पाचवीला पुजल्याला दुष्काळ. भुतासारखा पिढ्यान पिढ्या ह्या लोकांची कधी पाट न सोडणारा. पावसाळ्यात पान्याच टँकर मागनारी तिथली मानसं बी भारी चिवाट.

आपल्या गरजा कमी ठेऊन कायम आनंदी आसनारी, शांत, प्रेमळ व सगळ्यांच्या मदतीला धावणारी. पोटासाठी आपला मुलुख सुडून पुन्या, मुंबईची आनेकांनी वाट धरली. पन कायनी जिद्द सुडली न्हाय. हितल्या मेंड्या, डाळिंब, शाळू, व देशी खिलार जात जगाच्या पाठीव कूट सापडायची न्हाय. बगल तवा फट मुकळी रान, मधीच येकाद झाड व त्याखाली रनरनत्या उन्हात कोनतर शेरडवाला आपली शेरड घिऊन सावलीत थांबल्याला.

कमी चाऱ्यान पॉट आत गेल्याली जनावरं. आनी काळजीनं बारीक झालेली मानसं. हेनी जगायचं कसं?.का पानी दिल जात न्हाय ह्या लोकासनी? कायम माझ्या मनात ह्यो प्रश्न घोळायचा. कदाचीत आमच्या भागात ऊस तोडायला हितली मानसं यावीत म्हनून यासनी जानीवपूर्वक शापीत ठेवलं नसावं. आधुनिक वाल्मिकी ग. दी.माडगूळकर …. शेती परिवार कल्याण संस्थेचे नारायणराव देशपांडे ते एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर इथपर्यंत अनेकांनी या दुष्काळी पट्ट्याचा नावलौकिक वाढवला. अशा या दुष्काळी भागात म्हनलं काय हाय बगावं. विक्रांत पाटील, अमोल गणेशवाडे, अमोल पाटील व भिकू शिरतोडे हेंच्यासंग मोटारसायकल वरन इंग्रजानी बांधलेला राजेवाडीचा तलाव बघायला सकाळी सकाळी किक मारली.

पावसानं रस्त काय सरळं हुतं वी. ठिकठिकानी सुरू आसल्याल्या रस्त्याच्या कामांमुळ बेजार व्हायची येळ आली. भिवघाटच्या फूड गेल्याव जरा मोकळं वाटाय लागलं. मुकळी हवा. रस्त्यावर गर्दी कमी हुती, बाजूला शाळूची शेत हिरवीगार हुन नाचत हुती. परतेकाच्या घराफूड दिशी गाय, बैल, कोंबड्या, मेंढरं, रचून ठेवल्याली वैरन, धोतार, टुपी व डोसक्याला टापर बांधल्याली प्रेमळ मानसं. निसर्गाच्या सानिध्यात मनमुराद राहनारी, जगनारी मानसं. दुष्काळात बघितलेला हा तालुका बगून त्यादिवशी कोकनात आलूय आस वाटलं. वडं, वगळी, हिरी तुडुंब हुत्या. रानातनी पानी आजून व्हात हुतं. रानंबी पानी पिऊन तृप्त झाल्यागत दिसली. करगनी, दिघंची मार्गे राजेवाडीचा तलाव गाटला. आनी समोरच चित्र बगून त्वांड आं केल्याल आं व्हायची येळ आली. समुद्रासारखं अथांग … निळशारं पानी. नजर पोचत न्हाय येवढं लांब पानीच पानी.

ह्या तलावाची कीर्ती आयकून पान्याजवळ उभा आसूनबी घाम फुटला. शंभर वर्षांपूर्वी हा तीन टी एम सी क्षमतेचा तलाव इंग्रजानी बांधला . सांगली ,सातारा व सोलापूर अशा तीन जिल्ह्यात ह्यो तलाव हाय. ४० ते ५० हजार हेकटर क्षेत्र हा तलावावर हिरवंगार हुतंय. व्हीकटोरिया रानीनं १८७६ ला ह्यो तलाव बांधाय सुरवात किलीवती व १९०१ ला ह्यो तयार झाला. सारा मातीचा बंधारा. बगितल्यावर १०० वर्षांपूर्वी बांदलाय ह्याव ईसवास बसना. १० वर्षातन आत्ता पूर्न भरलाय. पन चिलारीच्या झाडांनी बांध व सांडव्यात नुकसान हुतय तरीबी यंत्रणा लक्ष देत न्हाय ही दुर्दैव. किती दूरदृष्टी ठिऊन इंग्रजानी ही काम केलंय. बगून त्यासनी दाद द्यावी वाटली. मोत्याच्या माळेगत सांडव्यातन धाड.. धाड धबधब्यागत पानी कोसाळतंय. आनी ती पानी आंगाव घ्यायला पर्यटकांच्या उड्या पडल्यात. रम्य आसं ती ठिकान त्याच चित्र डोळ्यात साटवत आमची गाडी फुपाटा उडवत आटपाडीत आली. हालगीचा आवाज कानाव पडला. जागच्या जाग्याला रस्त्या कडला गाड्या लाऊन बाजारात घुसलू. मेंडरांचा बाजार हुता. देकन्यापान, कलर केल्याली मेंडर व मालकाला घिऊन मानसं नाचत हुती. १० हजारापासन चार पाच लाखांच्या वर किमती आसल्याली ती दिकनी जनावरं व हालगीच वाजाप आयकून भुल्ल्यागत झालं. कोन वळकीच न्हाय नाचाव वाटाय लागलं आशी हालगी वाजत हुती.

छला येळ हुतुय म्हनत आटपाडीतन माडगूळचा रस्ता धरला. ग.दी.माडगूळकर ही नाव माहीत नसनारा मानूस क्वचितच. कवी, कथाकार, लेखक, गीत लेखक, राज्यातलं अग्रगण्य साहित्यिक, गीत रामायण व त्यांच्या गाण्यांवर आक्खा महाराष्ट डुलतूय ती आधुनिक वाल्मिकी मजी ग. दि .मा. बनगरवाडी लिहली ते व्यंकटेश माडगूळकर हे त्यांचे भाऊ. माडगूळ मधी गदिमा यांनी ज्या ठिकाणी बसून लेखन केल तो बामनाचा पत्रा व त्यांचं निवासस्थान बघून त्या मातीला हात जोडलं.

बामनाचा पत्रा आसल्याल्या ठिकानी त्या खुलीला घरघर लागलीय. पन आतल्या भितीवर आसल्याला गदिमांचा फोटो आजबी जिवंत वाटतुय. त्यांचं घर आता एक एक दगड पडत साथ सोडाय लागलंय. पन ग.दि.मां बद्दल भरभरून व आपुलकीनं माहिती गावातल्या मानसांनी सांगिटली. १४ डिसेंम्बरला हीत मोटा कार्यक्रम आसतो ही बी सांगिटलं.

भर उन्हात गाडी परत आटपाडीत आली. पोटात आग पडलीवती पन एक दोन ठिकानचं चित्र बगून खायाची इच्छा झाली न्हाय. मग तासगाव रोडला आसल्याला स्वतंत्रपूरला आमी मोर्चा वळवला. हितला खुला तुरुंग. हित कैद्यासनी बेड्या घालत नायत. कैदी मोकळंच आस्त्यात. आशिया खंडात आस कारागृह नाय म्हनत्यात. लय कुतूहल हुतं. गाड्या थेट आताच घाटल्या. भयान शांतता. बारक्या… बारक्या खोल्यांच्या चाळी दिसल्या.

कोळसा डब्यात भरनारा योक गडी दिसला. म्हनलं म्हायती ईचारावी म्हनून गेलो. हितली म्हायती कोन सांगलं दादा म्हनलं तर म्हनला पी आय , एसपी च पत्र आनलंय का..? आशी म्हायती देता येत न्हाय. तेवड्यात फोन आला. बोलायला मी साईडला गिलू. ३० हेक्टरचा त्यो परिसर लय भारी हुता. कुटल्यातरी जमीनदाराची शिती आसावी आसं वाटलं. खुल्या तुरुंगाची ही संकल्पना ८० वर्षांपूर्वीची ती बी इंग्रजांचीच बरं का?.

गुन्हेगार ह्यो कुनी जन्मजात नसतोय. त्यायेळची परिस्थिती त्याला गुन्हेगार बनवते. पन गुन्हेगार असला म्हणून त्याला माणूस म्हणून जगायचा हक्क हाय. कुटुंबासह ते बी बेड्या न घालता. खुल्या वातावरणात. इथलं कैदी शेतात काम करतात. त्यासनी पगार मिळतुय. कुठल्या अंगान ते कैदी आहेत हे वाटत न्हाय. इंग्रजांची ही संकल्पना प्रत्यक्षात औंध संस्थानच्या प्रतिनिधींनी मूर्त रुपात आनली. चांगली वर्तनूक आसल्याल कैदी ह्या खुल्या कारागृहात आनून सोडत्यात. ज्याला आमी माहिती विचारली त्यो कैदीच हुता ही समजल्याव हादरलो. सायकलवरन योक भोपळा घिऊन त्यो कुटतरी निगालावता. त्यो आमच्यामुळ आवगडल्याच लक्षात येताच आमी काडता पाय घेटला. ह्यो परिसर एका कैदयाच्या विश्वासावर होता. आमी त्या परिसराच्या भायर आल्याव त्यो सायकलवरन निघून गेला.

कैदयांचा खुला तुरुंग ह्यो विषयावन “दो आँखे बारा हात” ह्यो पिच्चरबी निगला. साडेतीनशेच्या वर कैदी ह्या ठिकानापासन मानूस बनून पुन्हा नवं आयुष्य जगायला गेल्यात. स्वातंत्र्य पूर्व काळात तयार केलेलं ही स्वतंत्रपूर व हा ठेवा आमी तयार केला न्हाय मात्र हाय म्हनून तर त्यो आमी जपायला पायजी. दुष्काळी तालुक्यात काय हाय असा प्रश्न विचारणाऱ्यानी बगावा येगदा जाऊन आटपाडी तालुका. मी येका दिवसात बघिटलं ते लिहल.. आजून बरच काय हाय. सांगली जिल्ह्यातील पर्यटनासाठी ह्यो तालुका येत्या काळात ठळकपनी दिसलं. तुमीबी येगदा चक्कर माराच. दिस मावळतीकड झुकला हुता आनी आमची गाडी तासगावच्या दिशेनं धावत हुती.
१४नोव्हेंबर २०१९
आपल्या लिखाणातून खरोखर ह्यो तलाव बघितल्यासारखा झाला 😍