--------------------------------- ======================================
गावाकडचा निसर्ग

जंगल उभारनारा शिवदास:

जंगल उभारनारा शिवदास:

विनायक कदम: ९६६५६५६७२३

दोन दिसापूर्वी चांदोलीच जंगल बगाय गिलतू. वनविभागाच्या गाडीत बसून जंगल बगाय हरेक तरची, तलपची मानस संग हुती. मानसांचा डोळा चुकवून योक तरनाबांड गडी शिगरेट वडत हुता. चिचनीचा रव्या म्हनला आरं काय जंगल पेटवायचाय काय तुला..? गड्यांन सिगरेट ईजवली. पन हिकडं शिग्रेट वडून जंगल पेटवनाऱ्या गड्याला बगून बोडक्या माळावर जंगल उभारनाऱ्या तीस वर्षाच्या अग्रनी धुळगावच्या शिवदास भोसलेच ध्यान झालं. बिहारच्या डोंगर फोडणाऱ्या मांझी गत त्यो जंगल उभारायला झपाटल्यागत काम करतूय. का उभारतुय जंगल तर आमच्या येनाऱ्या पिढीला ऑक्सिजन मिळावा म्हनून.

अग्रनी धुळगाव ही नाव कसं पडलं तर गावाच्या बाजूला अग्रनी नदी. आनी धूळोजी भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात सरदार हुते. त्यावन अग्रनी धुळगाव आस नाव पडलं.६ हजार लोकसंख्येचा गावं. कोरडवाहू पावसाच्या पान्याव आसल्याली पिकं. नदी उशाला आनी कोरड घशाला. नदी आसून काय उपयोग.? तेज्याव ढीगभर आतीक्रमन. वाळूऊपसा. झाडं तोडायच प्रमान हाताच्या भायर गेलवत. बीएस्सी बीएड शिकल्याल आनी हाताला कामं नसल्यालं पोरगं गावात सार्वजनिक ठिकानी झाडं लावायचं. तंड माळाला पारंन डबरी काढताना हाताला फॉड याचं. तरीबी डबरी पाडायचं. त्यात झाडं लावायचं. लावल्याल्या झाडासनी घागरीन पानी घालायचं. मानस म्हनायची हेला याडं लागलंय काय बगा. हाय ती झाडं जळून निगाल्याती आनी ह्यो झाडं लावाय लागलाय. पोटा पान्याचं ,कामधंद्याच बगायचं सुडून ह्यो दळींद्रीपना कुटन सुचला हेला.?

गावात चर्चा व्हायच्या.चांगलं वाईट तेज्या कानाव याचं. ह्या चर्चा घरापातूर आल्या. आय म्हनायची तुला आवडतंय तर तू कर कोन काय म्हनतंय ध्यान दिऊ नगो. घरातल्या आई नावाच्या विद्यापीठानं शिवदासला परवानगी दिली. आता शिवदासला कुनी आपनाला चांगलं म्हनायचं सर्तीफिकेट द्यावं आस वाटलं नाय. त्यो झाडं लावायचा. पानी घालायचा. का ?झाडं लावाय पायजिती गावाला सांगायचा. काय आयकायची, कायजन सुडून दयायची. त्यो झाडं लावतुय पन तेजा फायदा साऱ्या गावाला हुनाराय ही हाळू हाळू काय लोकांच्या धेनात आलं. त्या मानसांनी तेला मदत करायला सुरुवात किली. कोन डबरी काडाय, कोन झाडं लावाय, कोन पानी घालाय, तर कोन लावल्याल्या झाडांची काळजी घ्याय लागला.

ही काम चालू आसताना क्रांतीवनाचे संपतराव पवार यांनी लुप्त झाल्याल्या आग्राणी नदीला परत वाहती करायचं ठरवलं. तेंनी काम सुरू केलं. तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर गायवाड हेंनीबी मनाव घिऊन नदीकाटच्या लोकांचं प्रबोधन करायला सुरुवात किली. नदी वाहती किली तर तुमचं दैन्य, दुःख संपल. विकासाची गंगा तुमच्या दारात यील. कलेक्टरन डोसक्यात घुसलं आस सांगीटल्याव ती साऱ्यासनी पटलं. लोकसहभागातून काम सुरु झालं. गावात या कामात पुढाकार शिवदासन घेटला. तेंच निस्वार्थी काम बगून गावात शिकल्या सवरल्याल्या ,नुकरी करनाऱ्या मानसांनी ह्या कामाला पैस दिलं. पैस नसनारी मानस प्रत्यक्ष कामाच्या ठिकानी राबाय लागली. पात्रातल आतीक्रमन निगाली. नदी मुकळी झाली. नदीवर बंधार घाटलं. पान्यानं पात्र खचू नये म्हनून बाजूला बांबूची लागवड किली. नदीतला वाळू उपसा गावानं बंद केला. लोकासनी चांगलं वाईट कळाय लागलं.

हेंच कष्ट बगून निसर्ग बेभान हून पडला. आनी कुरडी पडल्याली नदी जिवंत झाली. नदीला पानी आलं. सारा गाव ,शिवार हिरवागार झाला. लोकं बागायती पिकं घ्याय लागली. तवर आमीर खानच्या पानी फौंडेशनच्या स्पर्धेस सुरवात झाली. दुष्काळानं पिचल्याली गावं झपाटल्यागत कामाला लागली. अग्रणी धुळगावात शिवदास लोकासनी ही सारं काय चाललंय सांगत हुता. हेजा गावाला फायदा काय सांगत त्यो साऱ्यासनी सहभागी व्हाय सांगत झटत हुता. पण ठराविक मानस सुडली तर कोन लय याची न्हायत. लांबनच अष्टपुत्र सौभाग्यवती म्हनत चौकात बसायची. गावाला वन विभागाची ढीगभर जमीन. गावं व वनविभाग हेंच्या सहकार्यान त्यावर जलसंधारनाच काम मशीनच्या साहाय्यान सुरू झालं.

आडव्या चऱ्या मारून पळनांर पानी तेंनी आडवलं. बांध बंदिस्ती करून लाखो ,करोडो लिटर पानी तेंनी गावाच्या शिवारात आडवलं. पडल्याल पानी गावाच्या शिवारातनं भायर गेलं नाय. केल्याया कामाचा परिनाम गावाला दिसला. भर उन्हाळ्यात हिरी तोंडाला आलत्या. काटावं बसून तांब्यान पानी घ्यावं आशी परिस्थिती झाली. पानी आडल.? आता फूड काय? सह्याद्री देवराईच्या माध्यमातून झाडं, निसर्ग पर्यावरण ह्यावर झपाटून काम करनारा संवेदशील अभिनेता सयाजी शिंदे सरांचं काम बगून महाराष्ट्रातील झाडाव प्रेम करणारी लाखो मानसं झाडं लावाय लागली. काय जन फोटो काडाय, सोशल मीडियावर मिरवाय झाडं लावाय लागली. पन शिवदास व गावातल्या मानसांनी अग्रनी फौंडेशनची स्थापना करून जलसंधारनांच काम केल्याल्या चरीत झाड लावाय सुरू केलं. गावात रेल्वे लाईनच्या कडला झाड लावली. नुसती लावली न्हायत तर उनाळयात गोविंराव भोसले,अशोक आप्पा भोसले,सदाशिव कनप, चंद्रकांत भोसले,हिम्मत भोसले,महेश कदम व गावातल्या पोरांनी रक्ताचं पानी करून उनाळंबर पानी घालून झाडं जपली. त्यांच्या या प्रामाणिक कष्टाला शेकडो हातानी आर्थिक मदत दिऊन पाठबळ दिल.

शिवदासनच जंगल वनविभागाच्या जागेत २५ एकर जागेत ही जंगल उभं आहे. त्यात१४३ प्रकारची २४ हजार ७५० झाड हायत. काय झाड तीन वर्षांची तर काय पाच वर्षांची हायत. तेंनी लावलेली झाडं आज नजरेत भरण्यासारखी हायत. शिवदासच्या गावात २८०० सैनिक हायत. लोकासनी झाडांची आवड लागावी म्हणून तेंन लय प्रयोग केलं. एक फौजी एक वृक्ष ही संकल्पना राबवली. तसाच लेकीचं झाड, स्मृतीवन ह्या गुष्टी केल्या.

लावलेल्या झाडाला नेमप्लेट लाऊन त्यावर तेंच नाव लिहलं. लोकं आत्मीयतेन झाड जपायला लागली. वृक्षभेट, झाड लावून वाढदिवस साजरा करण्यासाठी पोरांचं प्रबोधन करनं आसलं भन्नाट प्रयोग तेंन केलं. प्लॅस्टिक मुक्ती ,पर्यावरण पूरक गणेशोत्सव आस अनेक उपक्रम तेंन करून तेंन पर्यावरन जपलंय. जंगल उभारल्यानं अग्रनी धुळगाव गावाची जैव विविधता वाढल्या. राज्यातलं दोन नंबरच जैवविविधता उद्यान तेंनी उभारलंय. आता जमिनीत पाणी मुरतंय. शेकडो प्राणी, पक्षी कीटक या मातीला सुपीक करायला त्या झाडांचा आसरा घेत्यात. लावल्याल्या झाडांमधून गावाला इत्याकाय वर्षात लाखो रुपयांचं उत्पन्न मिळनाराय.

आनी शुद्ध ऑक्सिजन व सावलीची तर काय किंमत करणार..? शिवदासच्या व गावच्या कामाची राज्यांन दखल घितल्या. राज्यातली नामांकित मानस, अभ्यासक,पर्यावरण प्रेमी, विविध संस्था, शाळा,कॉलेजची मुलं, प्रशासकीय अधिकारी भेट दिऊन तेंन उभारलेल्या हिरव्यागार निसर्गाचा ही कसं केलं म्हनून अभ्यास करत्यात. जाताना निसर्ग जपन्याच आश्वासन दिऊन जात्यात. शिवदासच्या निस्वार्थी कामाला विविध पुरस्कारांनी बळ दिलंय. शिवदासचं कामं पुस्तकात लिहून संपन्यासारख न्हाय. प्रत्यक्ष जाऊन तेज काम बघिटल्याव कळलं की ह्यो आधुनिक जंगलमॅन हाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *