आड्याला बांधल्याला लसून:
आड्याला बांधल्याला लसून:
विनायक कदम:९६६५६५६७२३
गावाकडचा शेतकरी वरीसभर रानात पिकल्याल्या पिकाच्या काडनीच्या टायमाला चांगली डालगाबर कन्स काढून बाजूला ठेवायचा. त्यातली निम्मी कन्स रानात नायतर देवळात पाखारांसाठी बांदायचा व निम्मी छपराच्या आड्याला बांदायचा. छपराच्या आड्याला नुसती कन्सच नसायची तर लसून, कांद, हाब्रेट, बाजरी, शाळू, जुंधळं, रानात पिकल ती ढीगभर कन्स छपराच्या आड्याला लोंबकळत आसायची.
छपराच्या आड्याला कन्स बांधायचं मजी वर उसाचा पाला आसायचा. नुसता गारवाच की. नासायची, बी बाद व्हायची न्हायत. वरीसभर टीगायची. त्या लोंबकळणाऱ्या कनसासनी उनांळच चिलट चीटकून बसायची. कुट डोस्क्याला थटल की डोस्क्यात म्हव पडल्यागत वाटायचं. पिरनीच्या आदी उनाळ्यात बायका बी बेवळा राकत घालून ठेवायच्या. आताच्यागत कवाबी जाऊन दुकानातन पिशवी आनायचं आस न्हवत.
मिर्गाचा हावा सुटली पावसाची चिन्ह लागली की राकातला बी बेवळा राकातन काढून ठेवायचा. पन्नास तरच बी. हुलगा, घेवडा, पावटा, सूर्यफूल, तीळ, काऱ्याळं, मूग, मटकी, माडग्याच हुलग, तुरी, हारभर, मक्क, जुंधळ, मोगनाच सारं बायका काढून ठेवायच्या. कमी पडल तर छपराच्या आड्याला बांधल्याली कन्स चुरकाळून बी काढायची. बांधून ठेवल्याली कन्स अस्सल असायची. कीड लागली, बी खराब झालं आसली काय भानगड नसायची.
वरीसभर साऱ्या हंगामात ही बी काढून राकत घालून ठेवायचं काम चालायचं. ही काम घरची कारभारीन जबाबदारीनं करायची. म्हाताऱ्या मानसांचं तेज्याव ध्यान आसायचं. कमी जास्त सांगायची. पिरनीच्या टायमाला कुनाच्यात काय बी नसलं आनी वैरी जरी मागाय आला तर शेतकरी तेला नडवत न्हवता. मानस मातीशी बेइमानी करत न्हवती. आसस्ल दिशी माल तेज्याकड आसायचा. खाऊन पिऊन मानस सुखी हुती. आता छपराच्या आड्याला बांधल्याली कन्स दिसायला छपरं राहिली न्हायत. सारीकड सिमेंट क्रोक्रेटची घर झाली. घरात कन्स बांधायला शेतात आता पिकतं न्हाय. आनी पिकलं तरी घरात त्यांना आता थारा न्हाय. यीकताच्या हायब्रीड बियाण्याव आता शिती सुरुय. तेला चव न्हाय… आनी डाक्टर सांगतुय दिशी खावा… आरं पन आनायचं कुठल रं…?