--------------------------------- ======================================

म्हव

🐝म्हव…….🐝

विनायक कदम. 9665656723*

म्हव आता गावाकडं बी दुर्मिळ झालंय. शाळला आसताना म्हव हुडकायच आणि ती काढायच लय याड. भारी वाटायचं. म्हव काढणं मजी काय सोपं काम आसतंय वी. गावाकडं तसल्यासाठी धाडशी माणसं आस्त्यात. धा, बारा वर्षांपूर्वी सुट्टीच्या दिवशी वड्याकडला बोंबलत फिरायचं. संग आपल्याच मापच गडी घ्याच. तवा चिक्कार झाड. फुलाची, फळाची, हाब्रेट, शाळू, मका, पेरवाच्या बागा, मधमाशासनी साऱ्या हंगामात उन्हाळा पावसाळा, हिवाळा चिक्कार मध मिळायचा. आणि म्हव तर कुटबी आसायची. आंब्याचं, चिचाच, तरवाड, करंजाला, शिसवाला, जळणाच्या ढिगात. जळणाच्या ढिगात तर म्हव दांडगी बसायची. काय बारकी आसायची काय मुटी आसायची. मधमशाची संख्या, आकार बगून त्यात मध कितीय, चावर हाय का हेजा अंदाज बांधला जायाचा. तुर्कांटी सारखी एकादी काटकी घिऊन गच्यात हाळूच खुपसायची. माशा हालणार न्हायत हेजी काळजी घ्याय लागायची. नाय एकाद्या माशीला कळलं तर ताणलाच म्हणून समजायचं.

काटी काडून त्यात मध कितीय बगायचा, तेजी चव बगायची. आणि तोंडाव मोटा टावेल घिऊन त्वांड झाकायच, आंगात फुल शर्ट घालायचा. झाडाव आसल तर वर चढायचं. जळणात आसल तर ती बसल्याली ठापी धरायची आणि पळ काढायचा. अचानक झाल्याला हल्ला आणि हिसका दिल्यानं माशा खाली पडायच्या. ठापा घिऊन लांब पळायचं. पण चावर म्हव आसल तर माशा लय लांब ताणल्या शिवाय सोडत न्हायत्या. मग डोळ, हाताला, गळ्याला, पायाला घावल तीत चावल्या शिवाय सुट्टी दयायच्या न्हायत. सुजायचं वाईट ,आरशात आपलं त्वांड बगून भ्या वाटायचं. पण म्हव काढलं मजी लय पुरशीपणा व गडी झाल्यागत वाटायचं.

*पोळ्याचा मध काढून घ्याचा. खायाचा, बाकीच्या पोळ्यात एकतर अंडी नायतर जन्माला येणारी पिल्ल आसायची. मध काढून घेटल्याव पोळ तितच कुटतरी टाकून द्यायचं. पोळ्याच्या वास घेत काय माशा दूरवर याच्या. पोळ्यावर बसायच्या, पोळ्यातल्या अंडी पिल्लासनी कायतर बोलायच्या. दिवसभर ते चालायचं. म्हव काढल्याल्या जाग्याला तितच कुटतर माशा गोळा व्हायच्या. दुसऱ्या दिवशी नवी जागा शोधायला निघून जायच्या. पण उन्हात पडल्याला पोळ्यावर बसल्याली मधमाशी आपल्या पिल्लासनी काय बोलत आसल. मध घ्यारे काढून पण आमच्या लेकरांचा जीव का घेताय तुमी आस बी माशा सांगत असतील पण त्यांच्याविषयी कधी विचार करावा एवढी आक्कल न्हवती. मधमाशांमुळ शेतकऱ्याचं उत्पन्न वाढतंय. तेला जपलं पायजी आस कधी वाटलं न्हाय. आग्या म्हव तर आमच्या रानात आंब्याला व जाम्बळीला फिक्स बसायची. सुपागत दांडगी च्या दांडगी. कोण काढायच धाडस करायचं न्हाय. कधी कधी त्यो आंबा तसाच सुडून दयाचा , पडल्याल पाड खाऊनच आंब संपवायचा. एकादा शेतकरी दिस मावळल्या व पोळ्याखाली जाळं करून माशा मारायचा. हजारो मेलेल्या माशांचा कोळसा हुन खाली खच पडायचा. कित्येक जीव आणि संसार हेजी राखरांगोळी त्यात व्हायची.

बऱ्याच ठिकाणी म्हव आसायच. माशासनी बी मुबलक मध मिळायचा त्यामुळं लय काय फरक पडत न्हवता. पण गेली दोन वर्ष ग्रामीण भागात असून बी पयल्यासारखी म्हव दिसत न्हवती. तर तेला कारण बी तितकीच हुती. द्राक्षबागांचं वाढलेलं क्षेत्र व इतर पिकांची कमी झाल्याली संख्या मधमाशा कमी व्हायला कारण हाय. पयल बागासनी लोक साळूत्यांन आवशीद मारायची, आता ट्रॅकटर आलाय. त्या बागतच काय बागच्या वरण बी उडायचं धाडस कुठल्या किटकाला होत न्हाय. प्रचंड विषारी औषध आल्यान त्याचा बेसुमार वापर सर्वच पिकावर्णी हुतुय. त्यामुळं मध तर सोडाच जीव वाचवणं कठीण झालंय. आमच्याच आंब्याच्या झाडावर म्हव बसल्याल समजलं आणि उत्सुकता लागली. कसलं आसल म्हणून उत्सुकतेपोटी शेंडा गाठला. शेंड्याव आडचणीत तांब्या एवढं म्हव हुतं. माशा गपचीप बसल्या हुत्या. जुन्या आठवणी जाग्या झाल्या पण आता म्हव काढायच आणि उगाचंच दगाड मारायचं धाडस आता माझ्यात राहील न्हवत. आता झाड तुटली, त्यासनी बसायच्या जागा बी कमी झाल्या. पीक बदललं.

तसा माशा मजी आमच्या दृष्टीनं छुल्लक विषय. कारण माणूस प्राणी पृथ्वीवर फक्त आपलाच अधिकार सांगतुय. पृथ्वी आपल्याबरोबर साऱ्या जीवांची हाय त्यासनी बी जगायचा अधिकार हाय हे मान्य करायला आमी तयार न्हाय. पावण म्हणून जगाय त्यासर न्हाय. कोरोनाच्या कहाण्या गेली दोन महिने ऐकतोय लॉक डाऊन मूळ हेज एवढं नुकसान तेज तेवढं नुकसान. पण भाड्यानो तुमी निसर्गाचं नुकसान किती केलंय तेजा कवा हिशोब चर्चा करणार हायसा का. निसर्गावर आळीपाळीन बलात्कार आमी केलाय. निसर्गाची वाट लावून टाकल्या. पण निसर्ग फुकट देतोय म्हणून आमी सिरीयस न्हाय. कितीबी झाड तोडा. आणि फोटोसाठी नुसतं झाड लावायचं नाटक करायचं. परत ती हाय का मेलय कवा बगायला जाणार न्हाय. पृथ्वी व निसर्गावर आमी लय भार दिलाय. पण निसर्ग येका तडाख्यात साऱ्यासनी झोपवतोय. त्यो का कोपतोय कोण ईचार करायला तयार न्हाय. विनाशाचा रस्ता आमी साऱ्यांनी धरलाय कारण निसर्ग या विषयावर आमी कधीच सिरीयस न्हाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *