धाडसी, निडर आणि बेधडक……’शांता रामुशीन’
गर्दीतला आवाज ….
धाडसी, निडर आणि बेधडक……’शांता रामुशीन’
विनायक कदम.९६६५६५६७२३
शांताबाई,शांताबाई,शांताबाई
रूपाची खाण, दिसती छान,
लाखात छान, नजरेचा बाण,
तिरकमान मारीती चकरा तुझा ग नखरा,
इकडून तिकडं मारीती चकरा,
चकरा-नखरा, चकरा-नखरा,चकरा-नखरा
शांताबाई,शांताबाई,शांताबाई……
ह्या गाण्यानं तरण्याच काय म्हाताऱ्या माणसासनीबी नुसतं डुलाय न्हाय तर नाचायबी लावलं.! वराती, गावदेव, लगीन, पूजा, तमाशा, ब्यांजू, बेंड, ऑर्केस्ट्रा, डॉल्बी... साऱ्यासनीच या शांताबायनं याड लावलं हुतं. गाणं लिवणाऱ्यानं गाण्यातल्या शांताबायचं रूप, तिचं चालणं, बोलणं आसं मांडलंय की तिनं साऱ्यासनी ताल धराय लावला. त्या काळात 'शांताबाय' नाव असणाऱ्या बायांची लय गुची झाली. "शांता... बाय...!" आसं तालासूरात नाव घिऊन पोरं चिडवायची. आता मी लिवणाराय ती शांता दिखणी न्हाय; पण धाडशी हाय.! प्रामाणिक हाय, गड्यागत शिव्या दित्या; पण त्या शिव्यातबी प्रेम हाय. अंगात कष्ट करायची धमक हाय. चार गावात तिला जोड न्हाय. साप धरण्यापासनं दारू इकण्यापातूर सगळं करायचं धाडस तिच्यात हाय.! म्हणूनच आमची शांताबाय सगळ्या पोरींनी तिच्या धाडसाचा आदर्श घ्यावा आशी हाय..!
तासगावात आमच्या अमोल पाटलांच्या मोबाईल शॉपीत बोलत बसलुवतू. तवर ईज कडाडल्या आवाज कानावर आला..."आयघाल्यानु, लाडू चुरून खाल्लंसा वी..?" त्या नुसत्या आवाजानंच मला धडकी भरली. त्यात भर म्हंजी... तासगाव इष्टी स्टॅंडवर आसल्या शिव्या ऐकून घाम फुटायची बारी आली..! बाजूच्या येक-दोन पुरींनी 'आव्वा' म्हणून तोंडाला हात लावला. घसा कोरडा पडाय लागल्यागत झालं. बळंच हासत म्या, "काय शांताबाय?" आसं म्हणत विषय थांबवला. "आमचं म्हाताऱ्या माणसाचं 'पास' कवा काडून दीतूयस?" दम दिउनच भाषा.! "तू कोण बी सायब आसशील; सुट्टी नाय देणार.!" "उद्या घरला यिउन कागदं काय काय लागत्यात सांगतु." आसं नरमाईन घिऊन कशीतरी शांतीला मार्गी लावली. पण ही 'शांता' दिवसभर माज्या डोसक्यात घोळाय लागली. बऱ्याच दिवसापासून मी तिला बगत हुतो. तिचं एकाहून एक किस्सं माज्या नजरेसमोर येत हुतं. आता शांता कागदाव उतरायचीच, आसं ठरवलं. ल्यायला आसली कडक व्यक्ती भेटलीवती; मी बी हाराकलू..! तिचाच इचार करत रातभर झोपी गेलो.
दुसऱ्या दिवशी तिच्या घरला गेलो. गेली ५ वरीस झालं शांता रानात ऱ्हायाला हाय. जै बाबा, मसरांचं शान काढत हुता. शर्ट आणि इतभर चड्डी तेज्या आंगात हुती. "काय बाबा..?"म्या म्हणलं. बाबाला दिसलं न्हाय आणि वळकलं बी न्हाय. फूडं आलू तर शांताबाय घराच्या भायर पत्र्याच्या शेडात भाकरी थापत हुती. बाजूला शेर्डाचा गोटा हुता. कोंबड्या घिरट्या घालत हुत्या. नगु म्हणत असताना शांताबायनं खूर्ची आणून दिली. तवर बाबा आला. कोण हाय? म्हणला. "सुबासआप्पाचा ईनू हाय वळकना वी..?" म्हणत शांताबायनं बाबाला दमात घेतला. च्या करायची गडबड चालू केल्याव म्हणलं, "नगु, मी जिऊन आलूय." मग बाबासाठी तिनं च्या ठेवला आणि म्हायती घ्याचं सुरू झालं.
तासगाव तालुक्यातील लोढ्याची शांता रामुशीन ही मूळची बस्तुडची. तिला पाच भणी आणि २ भाव. शांता शाळा कायच शिकली न्हाय. ही बया अंगठाबहाद्दूर; पर लय बडबडी हाय. १९७१ ला जयवा बाबाशी तिजं लोढ्यात लगीन लागलं. बाबाला आर्धा एकर रान हुतं. त्यो गवाणपर्यंत सायकलीनं सोपान काका, शिवा आण्णा, भाऊ शिरसट यांच्याबरूबर अनेकांची दूधं भरायला रोजगारानं आसायचा. शांता रामुसवाड्यात छपरात ऱ्हायाला. परिस्थिती लय बेताची आसल्यानं कामाला गेल्याशिवाय खायाला मिळायचं न्हाय. रोजगाराला जाता जाता तिनं ७० रुपयला एक शिर्डी घिटली. तिला दोन कोकरं झाली. सस्ताईत १५० रुपयाला गय घिटली. तिचा खोंड ३ हजाराला ईकला आणि त्या साऱ्या पैशाची शेरडं भरली. शेरडांचा कळप झाला. लाली आणि ईज्या ही दोन पोर त्यासनी झाली. काम, प्रपंचा चालूच हुता. शांताबाय कामाला लय ताठ.! बाबा आणि शांताबाय आमच्यातबी कामाला याची. येगदा आमच्या आप्पानं हाबरेट केल्यालं. पिकलवतबी चांगलं. रातभर मळणी चालली. २० पुती झाली. बाय गड्यागत पुती वडत हुती. पेंड्या बांधत हुती. साऱ्या शेतावर आपलाच आधिकार गाजवत हुती.
धा-पंधरा वर्षांपूर्वी हातभट्टीच्या दारूचा धंदा सगळीकडं आगदी हाळी दिऊन जोमात हुता. वड्यावगळींनी दारूची ब्यारल माणसं धडधडीत काढायची. बेरडकीतला शिवामामा तर आमच्या रानात सगळीकडं वड्याच्या झाडकांडात ब्यारल टाकायचा. पाणी भरून ब्यारेलात टाकलेलं गूळ, नवसागर मन लावून तवा बगू वाटायचं. उसात जाऊन त्यो फसफणारा फ्योस व गुळाच्या आशेनं आल्यालं मुंगळं, काढल्याली दारू, प्यायला आल्याली माणसं, हापत्याला आल्यालं पुलीस.... हे सारं डोळं भरून म्या बगिटलंय. शिताराम आण्णा तर एमएटी गाडीवरनं टुब भरून दारू भायरगावातल्या लोकासनी पोचवायचा.
ही हातभट्टी तवा १०० रुपयाला पाच लिटरचा कॅन भरून मिळायची. आता दारूचा धंदा बाइनं करायचा मजी लैच आवगड.! दुनियेतलं रगील गिराईक तितं.! फुकट दी, उदार दी, नायतर पिऊन दंगा.! पण शांताबाय हुती ती. आवाज वाडला की गडी कसलाबी आसुदी गाराटलाच पायजी. शांताबाय त्यच्या आब्रूलाच हात घालायची. "तुला उदार दिऊन मी दारू दारुवाल्याखाली निजू काय?" आसलं बोलायची. कुणाचं धाडस हाय हिच्याफुडं बोलायचं? कोण लय उंडारला; तर तडाकं दिउन तिथनं हाकलून द्याची. काय हुईल मागं-म्होरं याचा ईचारच करायची न्हाय. सगळंच बेधडक. पाच रुपयाला पेला दिउन त्या केनाचं दोनशे रुपय करायची. दारूची वाहतूक सगळी केनातनं. इष्टीतनं डायवर म्हणायचा," काय हाय केनात ?" ही म्हणायची," दारू..!" कशाला? तर बागंवर फवारायला लागत्या म्हणायची. गावातली सहा-सात जण तवा दारूचा धंदा करत हुती. त्यामूळ स्पर्धा बी जोरात हुती.!
द्यानु कांबळे आणि शांताबाई यांची शाब्दिक जुगलबंदी आख्ख्या गावाला म्हायती हाय. "ये देन्या, तुला जाळला न्हिउन... कंटूर दीतूस का न्हाय आयघाल्या?" आशा शिव्या देतंच शांता कंटूरात घुसायची. द्यानु बी लय हुशार.! "कंटूर द्याचं मजी दारू देण्यायेवडं सोपं हाय वी शांते?" आसं म्हणून तिला खिजवायचा. आणि मग दोगांची कळवंड लागायची.
द्यानु मावली आन् त्यचा दोस्त भाव परीट हेंच्या डोसक्यात येगदा आलं; आपण फिरती दारू यिकून शांतीचा धंदा बंद पाडायचा. शांतीच्या घराकडं जाणाऱ्या मार्गावर यांनी किशात बाटल्या टाकून धंदा सुरू केला. शांतीकडं जाणारं गिराइक वाटंतनंच मागं फिराय लागलं. शांतीला कळालं. ती त्यंच्यावर नजर ठिऊनच हुती. येगदा तिला द्यानु आन् भाव परीट रत्नाबायच्या दारात घावलं. काय मार परटाला... शांताबाइनं तेला जाम हानला. द्यानु घाबरून म्हणला, "आयघाल्याला नगु म्हणून सांगिटलं हुतं. बाय शानी हाय का?" तवा पुलीसासनी शंबर रुपय हाप्ता हुता. सगळी पुलीस, वकील हिच्या चांगल्या वळकीची. सकाळी न्हेलं; की शांताबाय दुपारी घरला. सगळी यंत्रणाच हिच्याच हातात ओ..! कुणीतरी गावात हिज्या दारूची टीप दिली; की ही बाकीच्या साऱ्यांची द्याची. मग साऱ्यासनीच गाडी भरून पुलीस न्ह्यायचं. पुलीसांच्या त्रासानं हिनं धंदाच बंद केला. आता कधी पुलीस स्टेशनला कोण वळखीचं पुलीस दिसलं आणि हिला आवाज दिला; तर म्हणती, "बसलायस गांड टिकून गप बस की.!"
साप धराय बाबतीत तर तिचा कुणीच हात धरत न्हवतं. साप कुटंबी दिसुदी; बाय तानून मागं लागत धरायची. सापाला बेधडकपणानं धरणारी शांताबाय सुरटाला मात्र लय भेत्या. रात्रीच्या आंधाराची तर तिला आजाबात भिती वाटत न्हाय. माजी सरपंचाच्या पोराला 'ये धोंड्या' आसं बा चं नाव घिऊन हाक मारत्या. शांताबाय सगळ्यासनीच तराट शिव्या घालत्या; पर त्या शिव्यात बी प्रेम हाय, गोडवा हाय.! लोकांकडनं हाक्कानं मागून घेणार; पण कदी चुरी न्हाय, की लबाडी न्हाय..! "आमाला कुटल्या योजनेतनं घर न्हाय, दारिद्र्य रेषेत नाव न्हाय. आता कुणाला मतच देणार न्हाय. लोकांनी आमच्या दारात इऊनी मतं मागायला..!" आसं तिचं सरळसोट म्हणणं. कुठल्यातरी निवडणुकीला गावतल्या बाया हळद-कुक्कू लावाय शांताच्या घरला गेल्या. दारात आलेल्या बायकासनी बगून हिचं माथं भडकलं. "फिरता का न्हाय मागारी..!" म्हणून काटी काडली. बाया घाबरून परत फिरल्या. गावातला नेताजी पाटील सांगत हुता... "हिज्या हातात एक काटी द्यायची. सांगून कसलंबी चार गडी ती खाली लोळवणार.!" आसली ही शांताबाय. चालाय लागली की पायातलं जोडवबी दमदार आवाजात वाजायचं.
शांताचं नातू शाळा शिकून आता मोठ्ठं झाल्यात. त्यांची लग्नंबी झाल्यात. नात चांगली शिकल्या. तिला नुकरी लागल्या. शांताबाय ही सगळं अभिमानानं सांगत हुती. खरंतर आसल्या धाडसी महिला जास्त कुटं बघाय मिळत न्हाईत. कोण काय म्हणंल? माजी मापं निघत्याल काय ? आसल्या गोष्टींची आख्या जिंदगीत तिनं कदीच फिकीर किली न्हाय. आता तिच्यावर मी लेल्यालं तिला कळल्यावर प्रेमानं का हुइना; पर मला 'शिव्या' बसणारच हायत्या. समाजात पोरीसनी सुरक्षित वातावरण न्हाय. छेडछाड, विनयभंग, बलात्कार यात वाढ झाल्या. खरंतर रगील पोरं व पुरषासनी भिडायचं मजी शांताबायसारखं धाडस पोरींच्यात भरणं गरजेचं हाय. गाण्यातल्या शांताबायपेक्षा या शांताबायचा आदर्श समोर ठेऊन तिच्यातलं नुसतं धाडस जरी आजच्या पोरींनी घेतलं तरी बायकांच्यावरलं अत्याचार लय कमी हुत्याल.
मस्तच विनू भाऊ
कडकं….. विनायकाव तुमची लेखणी अशीच लोका पर्यंत पोहचत राहिली तर गावाकडून शाहराकडे येणारी पावले नक्कीच कमी होतील व शहरातल्या जीव घेण्या स्पर्धेपासून लांब राहील.
महत्वाचं म्हणजे तुमच्या अधिकाराच्या ओळखीचा शांताबाई सारख्या गरीब प्रामाणिक पने कष्ट करण्याऱ्या लोकांना आवास योजनेचा लाभ मिळाला तर उत्तमच होईल.
धन्यवाद पवनदादा चांगलं पेरायच काम नक्की करूया
पवनदादा चांगलं पेरूया सोबत मिळून आसच प्रेम राहूदे