लोढ्याचा : ” रंगा आप्पा”
गर्दीतला आवाज…..
विनायक कदम…. ९६६५६५६७२३
लोढ्याचा : ” रंगा आप्पा”
गावाकडच्या माणसांचं जगणं आणि ‘ताल’ जगायेगळाच. आपल्याच धुंदीत, आपल्याच मस्तीत, हाय तसं, मनमुराद जगणारी माणसं. कुठलं टेंशन , ताणतणाव का कसलीच काळजी न्हाय. तसं हाजार बाराशे लोकसंख्येच आमचं गाव बी लय भारी हाय. लय हटके, रगील, पांचट, इरसाल, भांडकुरी, प्रेमळ , हरेक तरची चांगली , वाईट माणसं भेटत्याल. एकविसाव्या शतकात माणसं पृथ्वीवर शे पाचशे वर्ष जगायला आल्यागत कराय लागल्यात. जगायची जीवघेणी स्पर्धा लागल्या. तेज्यामुळ कोट्यवधी किमतीच्या शरीराच्या इमारतीच वाटोळं हुतय. पूर्वीची माणसं म्हणायची कसाय गडी. कशीय त्याच्या शरीराची इमारत. थाप्पीच शंभर किलुच पोत तवाची पोर स्वता उचलची. इतकी रग अंगात हुती. खाऊन पिऊन रेड्याची अंगात ताकत. आमच्या गावात आसलंच एक खतरनाक व्यक्तिमत्व रंगराव सिताराम ठोंबरे. उर्फ रंगा आप्पा, उर्फ म्याचवेल, उर्फ टेलर, उर्फ रंग्या…. परत्येकाच्या सोयीची ही ढीगभर नाव…….
रंगा आप्पा मजी दादागिरी, कुस्ती, व्यायाम, आणि क्लास कापड शिऊन देणारा भन्नाट माणूस. आभाळाला टेकाय गेल्याली सा फूट उंची. डोसक्याला बारीक केस, पिळदार शरीर, पायात त्याच मापाच पायताण, मनगाट भरून दोरा, डोळ्याला चष्म्या आणि त्यातली भेदक नजर… आप्पाची तुफानी तब्येत बगूनच माणसं गाराठत्याती. आसली तब्येत या माणसानं कमवल्या. पण तोंडात कायम शिव्या. सजावारी बोलला तर शिव्याच देणार. पण वाईट अर्थानं न्हाय तर प्रेमानं… मग घरातला, भायरचा, पावणा , पय, पोरगा… कोणबी आसला तरी ट्रीटमेंट येकच. तंबाकुची बारीक पिचकारी किमान पाच फूट लांब जाईल आसल्या पद्धतीनं गडी थुकणार. गावात लय उलट सुलट चर्चा आप्पा विषयी. त्यो आसा हाय तसा हाय, माणसं जवळ जायाला दबकत्याती*.
आप्पा लय दिवस मनात घोळत हुता. रविवारी म्हणलं आप्पाला गाटायचा आज. संध्याकाळचा सावरड्याचा बाजार. मिबी पिशवी घिऊन गिलू. जरा भाजी घितुय तवर गडी यमासारखा फूड आला. म्या म्हणलं कुठाय पत्ता भेट न्हाय. मला म्हणला गप लगा थापड्या*ड्याच्या मटण आणलवत ईतू म्हणलास आणि आला न्हायस. आसुदी म्हणलं परत जुळणी करू. गावात या भेटायचाय म्हणलं? आणि बाजार आवरला. घरला आलू आणि रंगाप्पाचा फोन आला. य आलूय र… बस थांब्या जवळ खूली , गोटा, ढाबा, आणि टेलरिंग च आप्पाच दुकान हाय. गिलू तर आप्पा धा, धा किलुच डंबेल्स उचलत हुतं. बस, काय पायजी तुला म्हायती म्हणला. म्या म्हणलं ही हुदी की मग बुलूया. मला तास लागलं, तू इचार म्हणला व्यायामाची हयगय न करायच्या त्यांच्या कामाचं मला कौतुक वाटलं आणि रंगा आप्पा बोलताय लागला. परिस्थितीन सहावीतन शाळा सूडली. साडेतीन चार एकर रान. पण ७२ च्या दुष्काळान भल्या भल्यासनी गुडग्याव आणलं. पाच भणी आणि सहावा ह्यो रंगा. बा सिताराम आबा न सांगितल तू एकटाच हायस आणि तुला धा गडी आडवं करता आल? पायजी आसली तुजी तब्येत पायजी. म्हणून व्यायाम कर. दुष्काळात आबा न कापड शिवायची मिशन घिऊन दिली. पण चांगलं यायसाठी तासगाव, ते सांगली पर्यंत बऱ्याच दुकानातनी काम केलं. उत्तम प्रतीचा कापड शिवणारा स्पेशालिस्ट म्हणून आप्पाची वळख झाली. आणि तासगावात म्याचवेल टेलर नावानं कासार गल्लीत दुकान टाकलं.
दरम्यान सांगलीत आसताना तालीम कुस्ती आणि पैलवान झाल्यानं अंगात रग आणि दादागिरी आली. तब्येतच आसली हुती की तामिळी पिच्चर मधल्या खलनायकागत. त्यावेळी दादागिरी आणि भानगडीतल लय दोस्त झालं. अनेक ठिकाणी नांव चर्चेत आलं आणि रंग्या नावाला लोक दबकाय लागली. तोच अरुण गवळी यांच्या अखिल भारतीय सेना या संघटनेचा तालुकाध्यक्ष म्हणून पत्र आप्पा ला मिळालं आणि लयचं उलट्या चर्चासनी उधाण आल. जवानीची मस्ती आंगात आसली तरी सर्वसामान्य मांसासनी याचा त्रास न्हवता. पण गावाकडं एकादयाच कानफाट्या नाव पाडलं की त्यो मरलं ?तवाच तेजा शिक्का जातूय. शिवनळ तवा ४० रुपयाला प्यांट शर्ट हुता, कापड शिवायच्या बाबतीत आप्पा लय फेमस झालता. जिल्ह्यातली नामांकित पुढारी, आधिकारी व मान्यवरांची कापड तेंनी शिवली. बहिणींची लग्न, स्वतःच लगीन हुन प्रपंचा व कुस्तीबी चालू हुती. आप्पाचा बा आणि आय बी आप्पाच नाव रंगराव म्हणून आदबीन घेत बोलायची. आप्पाला चार पोर आणि एक पोरगी. पोर बारकी आसल्यापासनाच तालमीत आणत आप्पा गुरागात तेंच्याकडन व्यायाम करून घ्याचा. मारुतीच्या मंदिराजवळ तालीम. आणि तालमीत दार झाकून आप्पा काटी घिऊन बसायचा. थोरला भय्या आमचा दोस्त. लय कुग्राम. तेला व्यायाम बियाम नगु वाटायचा पण गडी च्या ला लय हावरा. दोन नंबरचा दादया आणि बारक भाव्या मन लावून व्यायाम करायची.
तालीम बी लय भारी हुती. लालभडक माती, भितीव हानुमानाचा फुटू. पण वरच्या फरश्या तेवढ्या फुटल्याल्या. भाव्या ची तब्येत बगून आमालाबी खाज आली. छला म्हणलं व्यायाम करायला. तवा आमीबी बोंबल भिक्याच ओ. तळ्यातल सुरश्या, यिन्या, कचऱ्याच पितम्या, आज्या घुटुगडे, ईप्या, आतल्या कांबळे,आस आठ धा जण तालमीत संध्याकाळच जायाचं. तालीम चकाचक करून त्यात लोम्बकाळाय एक लाकूड बांधलं. व्यायामाचा आड आणी बुड बी काय आमास्नी म्हायती न्हवता पण भाव्याच बगून
कसतर व्यायाम करायचू. जरा व्यायाम करून शरीराकडे बगायचू. आणि चेकाळायला यायचं. शिग्रेट, बिड्या वडायच्या आणि तंबाकू खाऊन करंट आणत व्यायाम करायचा. तालमीत आमी बारकी टीव्ही आणून ठिवलीवती. आणि येगदा उनाचच इंद्रा द टायगर ह्यो भाव्यान पिच्चर आणल्याला कॅशेट टाकून डिव्हिडिव्हीव लावला. रंगाप्पा तवा कुटतर गेलता. आणि आमचा तालमीत ह्यो उद्योग. कापड काढून चड्डीव आमचा व्यायाम. लंगुट फक्त भाव्याकडच. फुल्ल आवाज सुडून आमचा पिच्चर रंगात आला आणि दारावर धाड धाड थाप पडली. मुताय आलं साऱ्यासनी. ज्यो त्यो घावल तसा व्यायाम करायला लागला. भाव्या न टीव्ही बंद करून दार उघडलं. तसा शिव्यांचा भडिमार तोफतन गोळ यांवत आसा व्हायला लागला. कडुनू उनाचं तूमच्या आयचा** कसला व्यायाम करताय र…. आणि फुल प्यांट घालून आमचं काय गडी व्यायाम करत हुतं. आप्पा म्हणला ही कडू कुणाचाय रं. तुज्या बा न आसा व्यायाम केलता का? आस म्हणत येकमेकांच्या कुस्त्या लावल्या. कुस्ती कशी करायची डाव कस आस्त्यात हे आप्पा शिकवायचा. पण आप्पाच्या बोलण्यात एक प्रकारची दहशत हुती. तेलाचं पोर हाबकायची. आप्पा आला की आमचा व्यायाम बंद आनी गेला की व्यायाम सुरू.
भाव्या ईचपाट व्यायाम करायचा. लय कुस्त्या करून तेंन लै मैदान मारली. त्याच खाणं बी आरबुज हुतं. पण गड्याला लाल मातीची एलर्जी झाली आणि कुस्ती कायमची सुटली. पण व्यायाम सुटला न्हाय. आप्पाच्यात खाण्याला हायगय नसायची. मुबलक दूध, मटन, तूप. आसल खाणं. आप्पां आणि त्यांच्या ३ मित्रांनी चौघात १० किलुच बोकड संपवलं हुतं. पोर रांकला लागली. योक आयजी ऑफिसला कोल्हापूरला हाय. तीन वर्षांपूर्वी आप्पांन ढाबा काढला . पण आचारी हेंच्या आसल्या सभावाफुड टिकना. येगदा, दोनदा आचाऱ्यालाच हुंदालला. आसला ह्यो आप्पा. गड्याला भजन आणि गवळणी म्हणायचा नाद बी हाय. आता टेलरिंग पुन्हा चालू किल्या. गावात कॅनल मधी ३० फुटावरन पडलवत, अपघातात मरता मरता वाचलंय. पण वयाच्या चौसष्ट वर्षी आप्पाच्या सकाळ संध्याकाळ व्यायाम करण्याच्या सवयीचं जाम कौतुक वाटलं. पैसा कमावण्याच्या नादात माणसं व्यायाम व शरीराकड दुर्लक्ष कर्त्यांत. पण गावात चांगली व्यायामशाळा पायजी. पोरानी व्यायाम केला पायजी. त्यासाठी मी जागा दीतू आस आप्पा म्हणतंय. माणूस चांगला आणि वाईट कुणी जन्मताच नसतो. प्रत्येकाला परिस्थिती तसं घडवते. मी हाय असाच हाय? पटलं तर माझ्या जवळ या?
नायतर तुमची **घाला. व्यायाम झाला. आप्पा म्हणला छल जेवायला मटन आणलंय. म्या म्हणलं म्या बी आणलंय. जातू. मी मुजुन खाणार… आणि आप्पा तिथं माझ्या जेवणाव लेक्चर देणार त्यापेक्षा निगावं म्हणलं. गाडीला किक मारली पण तासाभराच्या व्यायामान आप्पा थंडीत बी घामानं निथळत हुता…..
जबरदस्त… आप्पा … विनायकराव थोडक्या शब्दात गावातल्या लोकांचा जीवनप्रवास मंडताय तुम्ही… गावात जेवढे पण दिवस जे काही लोकं बद्दल जाणून घेऊ शकलो नाही ते तुमच्या लिखाणामुळे कळायला लागलंय… तुमच्या कडून हुताहुईल तेवढं लिहा म्हणजे अख्खं गाव कसं हाय कळल आम्हाला भी.
गावात खरंच हिरेमोती आहेत ते आत्ता कळायला लागलंय नाहीतर लोड फक्त तल्यासाठी फेमस आहे असं वाटायचं….
पण आमच्या काळातल्या एक भी गाडी तुमच्या लिखाणाच्या लायकीच नसवा याचं वाइट वाटतंय….
धन्यवाद.. लेखनाचं चांगलं अंग हास्य तुमच्याकड जरा सिरीयस हुन लिहत व्हा
दिवस राहिलो**
आमच्या वारकरी मल्यातला*
मनापासून धन्यवाद🌿🙏