गोरखचिंचेची ३५० वर्षांची जुळी जोड:
गोरखचिंचेची ३५० वर्षांची जुळी जोड
विनायक कदम:९६६५६५६७२३
गोरखचिंच हा प्रकार तसा मला नवीनच हुता. झाड कधी बघिटलं न्हवत. तसं महाराष्ट्रात बी ही झाड दुर्मिळ हाय. काय ठराविक लोकांनीच हेच जतन केलंय. फेसबुकला कवलापूरात गोरखचिंचच झाड आसल्याच फोटो बगिटलं आनी झाडाला भेटायची, बगायची उत्सुकता लागली. कवलापुरातला हास्याचा झरा असणारा आमचा मित्र गणेश डीसले ला फोन केला आणि वाट धरली. झाडाजवळ पोहोचलो बगतो तर काय प्रचंड डेरदार झाड. भलामोटा बुडका आणि विशेष मजी ही जुळी जोड हुती.
झाड बरीच बघितली पण गोरखचिंच ही झाड पयल्यांदा बगत हुतो. कवलापुरातल्या महादेव माळी व आनंदा माळी यांच्या शेतात ही झाड हाय. झाडाला दगडी कट्टा करून तेला जपलय. आणि झाडाच्या खाली बुडक्यात गोरखनाथांची दगडात कोरलेली प्रतिमा हाय. त्यांनी सांगितलं राम रावण युद्धात गोरखनाथ हे रामाला सहाय्य कराय निघालेवते. रात्री अंधार पडताच त्यांनी कवलापूर गावात मुक्काम केला व जाताना हे गोरखचिंचेच झाड लावलं. अशी आख्यायिका हाय. ६५ वर्षाच्या माळी बंधूनी सांगितलं. आमच्या आजोबाला त्यांच्या आजोबांनी लहान असताना ही झाड असल्याचं सांगितलं हुतं. कमीत कमी साडेतीनशे वर्ष या झाडाला झालीतच.
ह्यो गडी मूळचा आफ्रिकेतला. तीत हेला बाओबाब म्हणत्यात. आणि आमच्याकडं तेजी फळ आंबाट आसल्यामुळं कदाचित गोरखचिच म्हणत असावीत. गडी दांडगा ह्यो, तेजा बुडका पान, फुल, फळ, वाढ, उंची सारच न्यार हाय. पाणी कमी आसल्याल्या ठिकाणी ह्यो तग धरतुय. आनी हेज्या बुडक्यात पाणी साठवायची प्रचंड क्षमता आसत्या. हेची पानं, फुल, साल यांचा औषधात चांगला उपयोग हाय. गोरखचिंच जित हायत तेज्यापेक्षा कवलापुरात या झाडाचं येगळपण हाय. हित या झाडाची देखणी आशी जुळी जोड हाय. चैतात यात्रा आसती. माहितीसाठी आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच उत्तमराव पाटील यांची भेट घितली.
उत्तम अण्णा म्हणले या झाडाच्या सावलीत यात्रा आसल्याव आमी कुस्त्या भरवत हुतो. कुस्त्यांची तालीमबी या झाडाखाली करत हुतो. आलीकडं बांधात, वड्यात शिती करायचा ट्रेंड आलाय. झाड कापून रान काढल जातंय. ह्यो दुर्मिळ गडी हाय पण शेतमालकांन झाडामूळ त्येज्या खालची काळी कुळकुळीत जमीन पडून हाय पण झाड तोडाव हा ईचार कधी मनात बी आणला न्हाय. आपवाद हायत माणसं आशी. या झाडाच्या वयाबाबत नेचर प्लॅन्टस नावाचं नियतकालिक म्हणत याच वय ११०० ते २ हजार ५०० वर्षे आहे. तर आफ्रिकेतल्या क्रूगर या उद्यानाच संकेतस्थळ म्हणत हे झाड ३ हजार वर्षे जगू शकत.
पण हव्यासान झपाटलेल्या माणूस प्राण्यांन विकासाच्या नावावर निसर्गावर आळीपाळीन बलात्कार सुरू केलाय. संशोधक म्हणतात वातावरण बदल व प्रदूषणामुळ ही अजस्त्र झाड मरायला लागलीत.
सोशल मीडियावर गेली २ दिवस १ बोलका फोटो फिरतोय. एका वाळवंटातून एक महामार्ग गेलाय. महामार्गाच्या वाटेत एक लहानस झाड आडवं येतंय मात्र त्या लहान झाडासाठी रस्त्याला वळण देत झाड वाचवलं गेलंय. आणि त्या झाडाखाली १ गाढव सावलीत उभं आहे. मेंदू आसणारा माणूस समजू शकतोय पण आमच्या लेखी निसर्गाला कवडीची किंमत न्हाय. आडाणी लोकांपेक्षा पुस्तक वाचून स्वतःला हुशार आणि इतरांपेक्षा येगळ समजणारया माणसांनीच निसर्गाचं वाटोळं केलंय. कवलापूरच्या माळी बंधूनी ३५० वर्षांच झाड जपलय. तुमी लावण्यापेक्षा हायत ती जपन्याच तर काम करा…