येसन:
येसन…
विनायक कदम:९६६५६५६७२३
दिशी गय आनी बैल मजी गावाकडचा काय काळी आत्माच हुत. दूध खायाला आनी तिज्यापासन दिकनी खोंड व्हायची. खोंडाचा भारदस्त बैल व्हायचा. चार चार बैल दावनीला डिरक्या टाकायची. आता ट्रॅकटर आलं. तरी दिशी गय आनी बैलांच महत्व काय कमी होत न्हाय.
आवड म्हणून म्या बी खिलार गय आनली. ५ म्हयन्यापूर्वी आयसारखाच दिसनारा, भरदार उंचीचा, लांबलचक गोजिरवाना हारनागत चपळ खोंड पावना म्हनून घरी आला.
देकन्या गड्याच काय कौतुक सांगावं. पानीदार डोळ, लांबलचक कान ,लालभडक नाक, पाटीवर भावरा, ऐटबाज शेपटाचा गोंडा, गोंजराय लागलं की गपगार हुभा राह्याचा. कशाचा आवाज आला की कांन हुभ करून बावरायचा, प्यायला सोडला की साऱ्या दुनियेला कवेत घेत वाऱ्याशी स्पर्धा करत बेफाम उधळायचा. बालपन व तेज्या साऱ्या लीला डोळ्यात साठवायगत.
मोकळा सोडला तर किती पळायच गड्याला भान राहयाच न्हाय. मग आयच्या कासत जाऊन मनसोक्त ढुसन्या मारून तोंडाला दुनी बाजूनी दुधाचा पांढरा फ्योस योस्तर प्याचा. दिस वाढत्याल तसं गड्याची ताकत आनी रग वाडत हुती. देखनपन वाडत हुतं. गळ्याला दाव लावून थोड दिवस आवरला पन आता आवाक्याच्या भायर निगाला. जमना म्हनल्यावर बारकी सुताची मऊ म्हूरकी घाटली. म्हूरकीन गड्याच्या मुंडक्याला ,नाकाला जरा वड लागली. जरा शान्या जनावरागत वागायला लागला. आयला बरं झालं म्हनलं.
म्हूरकीन जरा तेला आवगडल्यागत झालं. नुसतं दूध पिऊन ताकत वाढत हुती. खायाला ढीगभर आसल्यानं गडी उंडारलावता. आता त्यो म्हूरकीला दाद देत न्हवता. सुतळीगत तेला म्हूरकी वाटायची. गयला पाजायच म्हनलं की दोन दावी लाऊन सोडाय लागायचा. प्याय गय जवळ न्ह्याचं म्हनलं की आंगाव काटा याचा. खुट्याच दाव सुटायच न्हाय. तवर हेजा धिंगाना सुरू आसायचा. सोडला की दारं… दारं वडत न्हेत दोन मानसांचा पाळना करायचा.
पाजून कासतंन तेला बांदायच्या जाग्याव न्हेसतोर हिरीतन मोटार वरं वडल्यागत आब्दा व्हायची. हाताला दावं कचून रक्ताळल्यागत हात व्हायच. आता तर म्हूरकीलाबी जुमानना. तेज्या वडीन म्हूरकी नाकात कचाय लागली तरी त्यो रेटत न्हवता. हेज्या आसल्या उद्देगान घरात सोडाय बांधायची बोंबा बोंब सुरू झाली. सार गुत्त्याच काम. आता ह्यो आवाक्याच्या भायर झालाय हेला येसन घालय पायजी म्हनलं. आता येसन घालायची मजी लय आवगड काम. आमच्या गावात बाळू चव्हान,यंको आबाचा दाजी, तुकाप्पाचा संदीप, काका आण्णा आस ठराविक गडीच यिसनी घालायची.
पयल्यांदा येसन घालायची ती साऱ्यात बारीक आसत्या. तिज्या टोकांसनी पीळ दिऊन दाबनातन ववायची. येवस्थित पायाव चुळून ही सारं कराय लागायचं. साऱ्या जनावरांच्या नाकात जाळीगट योक पातळ भाग आस्तुय. त्यातन येवस्थित घाटली की लगीच दाबान भायर येतंय. रगात येत न्हाय. येसन घालताना नाठाळ जनावर लय धिंगाना घालत्यात. उडया मारून खाली पडत्यात. खाली पडून पाय वर करत फास लाऊन घेत्यात. ईसनीच तस आवगड काम.
गावात ईसनी पोक्त माणूस घालायची. मी येसन घालनार म्हनल्यावर घरात दंगा योट. चांगला मानूस बोलावं तुला येतय वी. मी आयकायला न्हाय आल्यागत करत जुमानलच न्हाय. येसन कशी वळत्यात,कशी घालत्यात आसलं बगायचा लय नाद. येसन ववली. आनी भावानं आनी मी २ कासर लावत गड्याला वड्याकड पेरवाच्या झाडाला बांधला. खेलातन दाव घिऊन म्हूर्किसंग जाम बांधला. पिर्वीच झाड गुळगुळीत आसतंय जनावरासनी धडपडली, हिसक मारलं तरी लागतं नसतंय. बांधून झाल्याव नाकात जाळी कूट लागत्या बगाय ब्वाट घाटलं.
नाकाला हात लागतुय का न्हाय तवर हाय न्हाय तिवडी ताकत लावून उड्या घेत झाड हालवून सोडलं. कडावा हुस्तर धिंगाना घालाय लागला. पन तेज्या वडा वडीन आमी घायला आलतू. कसलाबी धिंगाना घाल म्हनलं वागा. सोडलाच न्हाय गड्याला. नाकातल्या जाळीतन खासकन दाबान खुपसून भायर काडलं. तेलाबी काय हुतय कळना. नाकातन रगात आलंच न्हाय. ईसनीचा सारा कार्यक्रम येवस्थित पार पडला. नव्या न्हवरीच्या नाकात नथ दिसावी तशी पांढरी येसन आता दिसत हुती. आता गडी पाकच थंड आलाय. आता ईसनी घालायला माजाबी चांगला हात बसलाय. नाठाळ जनावरासनी आनी नाठाळ मानसासनी बी घालाय..!
येसण घालणं खरंच अवघड काम आहे, कारण नेमक्या ठिकाणी टोचावं लागतं, तेही रक्त न येता…. खूप छान लेख आहे…
धन्यवाद दादा