--------------------------------- ======================================

“माय मरावी,पण मावशी उरावी…!”
ही म्हण सार्थ करणारी…. ‘येसामावशी’

“माय मरावी,पण मावशी उरावी…!”
ही म्हण सार्थ करणारी…. ‘येसामावशी’

विनायक कदम: ९६६५६५६७२३


       तासगाव तालुक्यातल्या लोढ्यात 'ठोंबऱ्याची येसामावशी' साऱ्या गावाच्या गष्टीतली. बारक्या पोरापासून ते म्हाताऱ्या माणसांपातूर अखंड गावाची ती मावशी...! येसामावशी... साठी पार केल्यालं वय, पण आजारपण का औषधाची गुळी कधी म्हायती न्हाय, पिकल्यालं क्यास, कपाळावर कोरल्यालं गोंदाण, २४ तास कधीबी बघिटलं तर डोसक्यावर अखंड पदर घेणारी, तोंडात दातांची संख्या वयानूसार घटल्याली... आशी ही येसामावशी..! हातात काटी, पायात कातडीच्या चपला, डोसक्यावर जळणाचा भारा, समोर २, म्हशी२, रेडकं,१ दिशी गाय आणि ४-५ शेरडं-कोकरं आसा तिजा लवाजमा..! डोसक्यावर भारा, तोंडात धरल्याला पदर आणि तोंडातन निघणारा "हाल्या हाल्या... आगं थिर.. थिर... ये तुला कापलं न्हीऊन...!" आशी अवखळ पणानं जनावरांवर शिव्या हासडत लोढे तलावाच्या बांधावरून, दिस मावळतीच्या वेळी गेली एक-दोन नाही तर तब्बल ३६ वर्षे अखंड गावाला तीज याच आवतारात दर्शन हुतंय...!


    आशा या मुलखायेगळ्या येसामावशीची भेट घ्याची तर सकाळी ११ वाजता न्हायतर संध्याकाळी दिस मावळताना लोढे तळ्याच्या बांधावरच.! जनावरां- मागं मैलो न मैल भटकंती करणारी येसामावशी..! मूळची तासगाव तालुक्यातील पेड गावची. पाच भावंडांतील ४ नंबरची. हिच्या मोठ्या बहिणीचा लोढ्यातील ट्रक ड्रायव्हर आसणाऱ्या बाबासाहेब ठोंबरे हेंच्याशी विवाह झाला. त्यांसनी भरत व शरद ही दोन पोरं. १९८२ ला येसामावशीचं लगीन झालं. तुरचीत दिली. पन वरिसभरातच पतीचं आकस्मिक निधन झालं आनी तिच्या नशिबी वैधव्य आलं.! पोटाला मूलबाळ न्हाय, कुटल्या आशेवर सासरी जगायचं.? मग तडक आई वडिलांकडं पेड गाठलं.
          हिच्या नशिबी वैधव्य येत नाही; तवर बहिणही विधवा झाली. मुंबईत एका रस्ता अपघातात बाबासाहेब यांचा मृत्यू झाला. यानंतर मावशीची बहीण कुठं गायब झाली? देव जाने. तिजा आजपातूर ठावठिकाणा लागला न्हाई. २ मूलं उघड्यावर पडली आनी सुरू झाली, 'माय मरावी पण मावशी उरावी!' या म्हणीसोबत येसा मावशीची अग्निपरीक्षा.! आयच्या मायेविना २-३ वर्षांच्या उघड्या पडल्याल्या २ लेकरांना येसामावशीनं लोढ्यात यिऊन कुशीत घेतलं. मायेची ऊब दिली. आपल्या पंखांखाली प्रेमळ आसरा दिला आणि सुरू झाला येसामावशीच्या निष्कलंक त्यागाचा खडतर प्रवास...!

      पोरांसनी प्यायला दूध न्हवतं.! मग दुधाची म्हस घिऊन मावशीनं लोढं गाटलं. जिल्हा परिषदेच्या शाळजवळ जागा हुती; पण ऱ्हायाला सरळ छपार न्हवतं. त्या बारक्या पोरांसंग तिचा परपंचा सुरू झाला. म्हशीला रिडकू झालं. त्या रेडकाची म्हस झाली. देशी गयचं वासरू आणून तिनं तिची गय केली. शेळीची किती कोकरं झाली; याचं गणित नाय. 'जनावरांसनी वैरण आणि चुलीला जळाण' ही तर तिचं रोजचं ठरल्यालं काम.! शेरडं लई झाली; पर त्यासनी निवारा न्हवता. पावसाळ्यात लय आबदा व्हायची. भिजल्याली शेरडं शाळच्या वळचणीला आसरा घ्यायची. शनवारची सकाळची शाळा आसायची. मास्तर, पोरं शाळेत आल्याली आसायची. शाळेचा व्हरांडा  शेरडानी, तेंच्या मुतानं , लेंडयांनी भरल्याला आसायचा. लेंड्या व मुताचा वासानं पोरांच्या कपाळाव आठ्या पडायचा. मास्तर हाक मारायचा," मावशे... शेरडं हान की..!" मावशी भायर न येताच छपरातनंच तिचा "आगं थिर...थिर..." असा आवाज यायचा. शेळ्याबी गपगुमान शाळेची भिताडं घासत व्हरांडा सोडायच्या.

    पोरं मुठी होत हुती. मावशीनं दहावी-बारावी पर्यंत पोरं शिकवली. दोघंबी ड्रायव्हर धंदा शिकली. दुसऱ्याच्या वाहनावर जात चिकाटी ठेवली. दोघांच्या पाठीवर आधाराचा हात ठेवायला मावशी हुतीच..! सुरवातीला एक ट्रॕक्टर घेतला. येकाच २ ट्रॕक्टर झालं, दोनाचे तीन केल. शरद व भरत दोघांची लग्नं मावशीनंच किली. आता दोघांसनी पोर बाळ हायत. तेंचा सुखाचा संसार सुरुय. मावशीचं छपार जाऊन डोसक्यावर चांगलं छत आसणारं घर झालं. पोरांनी चांगली प्रगती किली. मावशी तेंच्यावर खूश हाय.! पोरं म्हणत्यात..." म्हसरं यिकून टाक आणि आता गप घरात बस." आयुष्यभर काटकसर करून संसार उभारणाऱ्या मावशीच्या आंगात कष्ट करण्याची उमत आसल्यानं या वयातबी तिला बसू वाटत न्हाय.!

        गुरुवारी तलावात पाणी किती हाय बगायला मी तळयाच्या बांधाव गिलू. तवर बांदावन मावशीचा सगळा ताफा गावाकडं येताना दिसला. वाटत टोल घ्यावा तशी मी मावशीची गाडी आडवून; म्हणलं यिचारपूस करावी. मी काय ईचारायच्या आतच मावशीनं, माजीच मुलाकत घ्याला सुरवात किली. मी काय करतूय? जनावरं किती हायती? हितंन गावाला लाडू कधी घालतूयस? हितपर्यंत. तिज्या प्रश्नांच्या धाड-धाड गोळ्या माझ्यावरच झाडल्या. मी बी मग मला भावलेल्या या मावशीवर प्रश्नांचा जोरदार मारा केला. कालपरवा घडल्यात का काय? आशा वाटणाऱ्या, मला आठवणाऱ्या जुन्या इंटरेस्टिंग आठवणी मी तिला सांगिटल्या. मावशीनंबी बराच उलगडा केला. पंधरा मिनिटं गप्पा झाल्या.   
         काळंकुट्ट आभाळ दाटून आलं. जोराचा वारा सुटलावता. पावसाची टप..टप सुरू झाली आणि मावशी म्हणाली..." मी जाती बाबा आता..!" पाठ फिरवून मावशी चालू लागली. वय झाल्यानं आता डोसक्यावर जळणाचा भारा न्हवता.. ! म्हसरांनी कवाच घर गाठलं हुतं. गावात 'राजमाता अहिल्यादेवी होळकर' यांच्या जयंतीच्या मिरवणुकीला सुरवात झाली हुती. आणि "माय मरावी पण मावशी उरावी" ही म्हण खऱ्या अर्थानं सार्थ करणारी ही 'अहिल्या' कुठल्याही सन्मानाच्या आपेक्षा विना तळ्याचा बांध उतरत घरचा रस्ता तुडवत हुती..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *