यमगरवाडीचा ४५० वर्षांचा जिवंत साक्षीदार
यमगरवाडीचा ४५० वर्षांचा जिवंत साक्षीदार
विनायक कदम:९६६५६५६७२३
निसर्गाचा कितीबी प्रकोप झाला तरी झाड आणि निसर्ग जपायचं आमच्या टाळक्यात येत नाय. कारण हव्यासांन झपाटलेल्या माणसाला ते फुकट ऑक्सिजन देतय ओ. मग फुकटची आमाला काय किंमत आसणार? पण झाड आणि निसर्ग आम्ही कितीबी तेज्याव अत्याचार केला तर त्यो आमच्याव कधी रागवला न्हाय. निसर्गाची आवड व जपणूक करणारी माणसं हायत , तशीच काय गावं बी हायत. पूर्वीच्या काळी गावातल्या मोक्याच्या ठिकाणी माणसं झाड लावायची. झाडाच्या बाजूला दगडी पार बांधायची. हा वृक्षसंवर्धनाचाच एक प्रकार हुता. गावातनी आजूनबी आसल पार हायत. तेंची चांगली जपणूक काय गावांनी किल्या. नुसती गावं न्हाय तर त्या गावातल्या पिढ्यान पिढ्यानी किल्या. तासगाव तालुक्यातल्या यमगरवाडी गावाच्या चार पिढ्यानी जपल्याला ४५० वर्षांचा जिवंत साक्षीदार असणार चिंचेचं झाड आजबी डौलात उभाय.
साडेचारशे वर्ष…? तुमच्यागत मलाबी आश्चर्य वाटलं. गड्याला बगावा म्हणून तोफिक मास्तर संग गाव गाठलं. आमचा पत्रकार मित्र राजेश पाटलांनी म्हायती दिली. पाणी फाउंडेशनच्या विनोदरावनी गावातल्या अर्जुन यमगरचा नंबर दिला. आणि गाव गाटल. मयाबा मंदिराच्या फूड आलु आणि मी बगतच उबा राहिलो. लय दांडगी झाड आजपर्यंत बघितली पण आसल झाड मी पयल्यांदा बगत हुतो. त्या भरदार झाडाखाली बांधल्याल्या दगडी पारावर गावातली काय माणसं बसली हुती. झाडाचा बुडका बगून ह्यो कुठलातरी महापुरुष आसल्यागत वाटाय लागल. उंची आभाळाला टेकाय गेल्याली.
अर्जुन यमगरसंग त्या मानसासनी झाडाचं ईचारल. माणसं म्हणली भिंगीर बाबा नावाचं साधू यमगरवाडी हित उंच ठिकाणी तपश्चर्या कराय आलत. पण त्यासनी जागा पसंत पडली न्हाय. मग ते गावातल्या या झाडाखाली येत त्येंनी ध्यान धारणा सुरू किली. जवळच असणाऱ्या शुक्राचार्यला ते पायी जात असल्याची आख्यायिका हाय. मयाबा मंदिराच्या फूड आसणाऱ्या त्या झाडाखाली समाधी व महादेवाची पिंड बी हाय.
ही नुसतं चिचचं झाड न्हाय तर गावच श्रद्धास्थान हाय. गावातल्या चांगल्या कामाची सुरुवात ह्या झाडाखाली पारावर बसून माणसं कर्त्यांत. मग त्यात जत्रा, वाढदिवस, लग्न, नवीन वाहन आलं, मूल जन्मल, राजकारणातला प्रचार, तमाशा, सांस्कृतिक कार्यक्रम आस कायबी चांगलं काम या झाडाखाली हुतय. पारावर बैठक बसली तर कोण चप्पल घालून येत न्हाय. कोण आला तर तेला शंभर रुपय दंड केला जातूय. चिचा पाडाय झाडाला कधी कोण दगुड मारत न्हाय. नुसत्या पडल्याल्या चिचा खायाला न्ह्यायच्या. यिकायच्या न्हायत. मग त्येज्याव कुराड चालवन लांबच. २ हाजार लोकसंख्येच गाव. पण गावात कुटबी घराचा पाया काढलं तिथं ह्यो जिवंत साक्षीदार पोचलाय. त्येज्या मुळ्या साऱ्या गावभर गेल्यात.
साडे चारशे वर्षात त्यो आभाळाला टेकाय चाललाय.
आत्ता तेजा आसला ताल हाय, जवानीतला त्याचा ताल काय निराळाच आसल. त्याच्या गर्द सावलीत ५०० ते ७०० माणस आगदी आरामात सावलीत बसतील इतका त्याचा आवाका हाय. लांबन बगिटलं तर किमान ४ ते ५ किलोमीटर वरन त्यो दिसतुय. फांद्याचा पसारा व उंची यामुळं त्यो एकाद्या गर्भवतीप्रमाण भरलाय. माकडं, पोपट, खारुट्या, बगळ, साळुंख्या ,कावळ, घुबड ,घारी यांचं जणू ते सुरक्षित घरच. कुणालाच तेज्याव सजा सजी चढाय येत न्हाय. म्हणून त्याव अनेक घरटी व ढोल्या करून सारी प्राणी पाखर समाधानात दिवस काढीत तेंनी संसार फुलवल्यात. झाड मोठं आसल्यानं कुणाला कशाचीही भिती व त्रास न्हाय. तीन वर्षांपूर्वी पुरातन विभागान भेट देत तेजी साल व बुडका याची तपासणी करून ही झाड साडेचारशे पेक्षा अधिक वर्षाच हाय आस सांगितलंय. किती उनाळ, पावसाळ, चार पिढ्याची येग येगळी माणसं , आसल्या सारयांचा जिवंत साक्षीदार आजून बी दिमाखात उभ राहून गावाला जागता पहारा दितूय.