--------------------------------- ======================================

विश्वासाचं दुसरं नाव….. “कुत्ते सोनारमामा..!”

विश्वासाचं दुसरं नाव….. “कुत्ते सोनारमामा..!”

विनायक कदम:

       पूर्वीच्या काळी माणसं काठीला सोनं बांधून मैलोनमैल प्रवास करायची. इतकी सुरक्षितता आणि विश्वासार्हता त्याकाळी हुती. आता काळ बदलला. सीसीटीव्ही आसूनसुद्धा दुकानातलं सोनं कधी हाणलं, कळत नाही. सराफ धंद्यात महत्वाचा असतो तो 'विश्वास..!' मात्र आलीकडं या धंद्यात फसवणूक आणि सावकारकीला उत आल्यानं विश्वास ठेवण्यासारखं काय राहिलं नाही. काय माणसांनी मात्र अजूनही या धंद्यातला विश्वास कमी होऊ दिला नाही. त्यातलंच एक विश्वासू नाव म्हणजे; तासगाव शहरातील सराफ व्यावसायिक.... "संजय मोतीचंद कुत्ते (वय 41)"

        साधी कापडं घालून साधेपणानं राहणारा हा माणूस विचारानं, कर्तृत्वानं खूप मोठा आहे. सराफ कट्ट्याला त्यांचं साधं छोटंसं दुकान आहे. तासगाव तालुक्यातील कुमठे, कौलगे, लोढे, तानंग, नागाव निमणी, निमणी, वाघापूर या सात गावात सोनारमामा प्रसिद्ध..! आपल्या पिशवीत सोन्या चांदीच दागिने भरायच आणि जे गाव त्यादिवशी आहे ते गाठायचं. माणसं ठरलेली... सोनारमामानं बिनधास्त कुणाच्याही घरात शिरावं; इतकी या माणसाची विश्वासार्हता.! कुणाच्या घरची काही अडचण असो, पोरांचं बारसं, कुणाचं लग्न, कुणाला नव्या सूनंला काय घ्यायचं आसंल, सोनाराच्या दुकानात जायाला वेळ नसंल, कधी पैसे कमी असतील... अशा असंख्य अडचणी सोडवण्यासाठी सोनारमामांची घरपोच सेवा आसत्या...! 

सोनाराचं दुकानंच घरात आल्यावर बायका तर काय खरेदीला हयगय करत्यात व्हय..! कुणाची मोड, किडूक मिडुक घालून येगवयेगळं दागिनं बायका घेत्यात. ग्रामीण भागात कुणाकडं वेळेवर आलाय ओ पैसा? मग माणसं थोडं पैसं देऊन उधारीवर वस्तू घेत्यात. या सोनारमामाचा बऱ्यापैकी धंदा हा उधारीवरच..! अगदी ५० रुपयांपासून त्यांची वसुली असते. या माणसाला ग्रामीण भागातल्या लोकांच्या अडचणींची चांगली जाण आहे. कुणी कधी पैसे दिले नाहीत; तर का म्हणून कुणाला विचारणार नाही की मोठ्यानंही बोलणार नाही. हा माणूस आपल्याला फसवणार नाही; हा विश्वास या लोकांच्या इतका डोक्यात बसलाय की या माणसानं खरोखर फसवलं तरी लोकांना खरं वाटणार नाही. एक-दोन न्हवे तर गेली २० वर्षे 'सकाळी ७ ते दुपारी ११' या वेळेत ऊन, वारा, पाऊस, थंडी कशाचीही तमा न बाळगता त्यांचा हा प्रवास अखंड सुरु आहे.

      गेल्या २० वर्षात ही काम करत आसताना अनुभवलेले अनेक प्रसंग या माणसाने सांगितले. दारूच्या आहारी गेलेली पोरं आईच्या नरड्यावर पाय देऊन मंगळसूत्र तसंच इतर सोनं पैशासाठी पळवायची. पण आईचा सोनारमामावर लय विश्वास; ती पोराला सांगायची, "पोरा सोनं ठेऊन पैसा घे; पण सोनारमामाच्या दुकानातच जा..!" हा विश्वास बरंच काही सांगून जातो. कुणाला किती पैसे, कधी, कुठे व कशासाठी दिले? याचं टिपण नेहमी त्यांच्याकडं तयार असतं. मूळात संजयरावांच्या वडलांचा हा परंपरागत व्यवसाय..! बापाच्या माघारी वयाच्या २२ व्या वर्षा- पासून त्यांनी हा व्यवसाय सुरू केला. प्रामाणिकपणा तसेच उधारीमुळं या माणसाची इतर सोनारांसारखी प्रगती जरी झाली नसली तरी; सोन्यापेक्षा लाख मोलाची माणसं आणि त्यांचा विश्वास त्यांनी कमावलाय..!

    सोनारमामाला जेव्हा मुलगी झाली; तवापासून "लहान मुलांचे कान टोचायला पैसे घ्यायचे नाहीत." असं त्यांनी ठरवलं. गेली अनेक वर्षे ते फुकटमध्ये पोरांचे कान टोचून देतायत. सराफ व्यवसाय आता काही ठराविक अपवाद सोडले; तर फसवणुकीचा अड्डा झालाय. दुकान चकाचक आसलं तरी त्यात विश्वास विकत आणता येत नाही. तो बाजारात कुठे विकतही मिळत नाही; तर तो कष्टाने आणि निष्ठेने स्वतः कमवावा लागतो. पूर्वी ग्रामीण भागाचा गाडा बारा बलुतेदारीवर चालायचा. त्यात प्रेम, जिव्हाळा, आपुलकी होती. दिलेला शब्द माणसं पाळायची. २१ व्या शतकात माणसं लय बेईमानी झाली. पैशासाठी नको त्या थराला जायाला लागली. आजकाल बोलताना आम्ही "विश्वास" पानिपतात गेला असं सहजपणे म्हणतो..! मात्र विश्वास अजूनही जिवंत आहे; तो तासगांवच्या 'संजय कुत्ते' यांच्या घरी राहतो....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *