माणसं फाडणारा : विनायकमामा
माणसं ‘फाडणारा’… विनायकमामा
विनायक कदम९६६५६५६७२३
तासगावातल्या सांगली नाक्यात दोस्तांची वाट बगत थांबलावतो. माझ्या गाडीच्या माग पोरांचं याक टोळकं पिचकाऱ्या मारत उभं होत. येकाचा फोन चालू हुता. पलीकडल्या माणसाला त्यो तोंडाला यील त्या शिव्या देत हुता. बोलता बोलता त्यो बोलला. ‘तित यिऊन ऊबा फाडीन’. मिबी जरा हादरलू. मान वळवून माग बगीटलं. साडेतीन चार फुटाचा ह्यो गडी. माणूस उबा फाडायच्या बाता मारत हुता. आणि ह्या फाडाफाडी वरन चिचणीच्या अक्षय भैय्यांच ध्यान झाल. आमच्या गावात योक लय खतरनाक माणूस हाय. तासगावच्या ग्रामीण रुग्णालयात त्यो पोस्ट मार्टम करायला हाय. त्यावर कायतर ल्या, आस तेंनी आठवणीनं सांगिटलवत. धेनातन गेलेला ईषय त्या पोराच्या फोन न लक्षात आला. आणि सावळजचे डॉक्टर मित्र सचिन देसाई यांना फोन करून चौकशी केली. त्यांनीही त्यांच्याविषयी भरभरून सांगत भेटवतो या आस सांगिटलं.
उत्सुकता लागली कसं करत्यात पोस्टमार्टम, कसा आसल त्यो?, त्याची हत्यार ? बऱ्याच प्रश्नांचं डोक्यात वारूळ उटल. तासगावच्या ग्रामीण रुग्णालयात सचिनरावांचं केबिन गाठलं. त्यांनी संबंधित माणूस जोडून दिला. आणि सांगितलं मला काम हाय तुमी बसा बोलत. पांढऱ्याशुभ्र कपड्यातली माझ्या बापाच्या वयाची एक व्यक्ती मला नमस्कार घालत आली. तुमी बसा मी दोन मिनिटात आलो आस म्हणत गडबडीत भाईर निघून गिली. दवाखान्याच्या भाईर रुग्णवाहिका आल्याचा आवाज आला. बहुतेक त्यासाठी तेंची धावपळ असल्याचं माझ्या धेणात आलं. पाच मिनटात परत आले. वळख पाळख झाली. म्हणले बोला ? काय पायजी म्हायती. तुमच्या कामाची म्हायती मला समजली म्हणून आलोय. पण तुमचं काम आधी होउदे, मग बोलू आपण. आस म्हणत मी त्यांना घेऊन उठलो. कुठल्यातरी पन्नाशीतल्या माणसाचं शव त्या रुग्णवाहिकेतून उतरण्यात येत ते पोस्ट मार्टम ला नेण्यात आलं.
त्या खुलीत त्या मेल्याल्या माणसाच्या बॉडी बरोबर मिबी आत शिरलू. उचलाय आल्याली माणसं टेबलवर ठेवत निघून गिली. यिस्कटून पडल्याली जुनी कापड, रक्ताचं लालभडक डाग, कोंदट वास, कापूस, सुया, घाण बेसिन, औषध, निलगिरी तेलाची बाटली, कात्री, पांढर कापड, छिन्नी, हातोडा, सूरी, पाण्याची बादली, ग्लोज, खराटा, साबण आस काय बाय सामान पडल्याल. कोपऱ्यात एक खुर्ची पांढऱ्या धोतराचा धडपा निसून बसल्यागत बसली हुती. उग्र वास येत हुता. चला.. आपण तित.. बसून बोलूया. मी म्हणलं तीत नको, हितच बसून बोलूया. ते म्हणाले हित कसं बसायचं ? आसल्या वासात? तिकडं जावया की. मी म्हणलं तुमी रोज ज्या वासात जगताय,काम करताय मलाबी जरा त्यो वास घिवदया की. मी आयकत न्हाय म्हणल्यावर त्यांनी कोपऱ्यात आसल्याली खुर्ची मला बसाय दिली. काय अडचण नाय मला. तुमी बसा आस म्हणत मीही त्यांना बसायची विनंती किली. दुसरी खुर्ची न्हवती आणि त्या शवाच्या शेजारीच आमी दोन जिवंत मानस मेलेल्या माणसांच्याव बोलाय बसलू.
विनायक नटू पवार, गाव. चिंचणी, तालुका.तासगाव. शिक्षण आठवी. सध्या तासगावच्या ग्रामीण रुग्णालयात कक्ष सेवक म्हणून असणारा, मात्र तालुक्यातली व भायरली मेल्याली माणसं निधड्या छातीन एकटा फाडणारा गडी. तीस वर्षांपूर्वी विनायकमामा कक्ष सेवक म्हणून सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे रुजू झाले. जखमी लोकांची मलमपट्टी, डॉक्टरना मदत अशी काम त्यांच्याव हुती. पण त्यांचं मन दुसरीकडच हुतं. शवविच्छेदन करणाऱ्या ठिकाणी डॉक्टरांच्या सोबत जात ते पोस्टमार्टम कस करत्यात बगायचे. महिनाभरात बगून, बगून कस करत्यात बघितलं. आणि ठरवलं आपुन पोस्टमार्टम करायचं. २७.११ १९८९ ला अपघातात डोसक्याचा चेंदामेंदा झालेल्या माणसाचं पोस्टमार्टम कराय पयल शव आलं.
पयला मेल्याला मुडदा फाडाय घेतला. पॉट फाडायचा चाकू हातात घेतला? पण हात कापाय लागलं. घसा कोरडा पडत, अंगात दरदरून घाम आला. पण शेवटी एकाग्र हुन आयुष्यात पहिला माणूस मी फाडला. आता काय वाटतं नाय. नुकरी लागली. पण लग्नानंतर करू नका आसल काम, धोक्याचं आसतय, घाण आसतंय, आस म्हणत ती काम सोडा म्हणून बायकून तगादा लावला. पण तिला समजाऊंन सांगितलं आपण मिलू तर आपलं शरीर फाडणारा कोणीतर माणूसच आसल की, कुणालातर हे काम करावंच लागलं लागलं व हे कसं पुण्याइच हाय ती सांगत मी तिची समजूत काढली.
विनायकमामा म्हणले लोकांचा एक गैरसमज आसतो की पोस्टमार्टम करणारा माणूस दारू पेल्याशिवाय ते कामच करू शकत न्हाय. पण मी अपवाद हाय, दारू न पिता मी पोस्टमार्टम करतो. अपघात, विषबाधा झाल्याली, विष पेल्याली, गळफास, अपघात, भाजल्याली, आसली बरीच वेगवेगळ्या पद्धतीची माणसं येत्यात. त्यात तरणी पोर, बायका, लहान पोर, म्हातारी माणसं पोस्टमार्टमला त्या खोलीत येतात*. *पण मिबी माणूस हाय, माणूस फाडताना वाटत का जीव दिला आसल यांन, किती जिंदगी आजून फूड पडली हुती. वाईट वाटतंय. कुठं तर बाबा रुसून गेला आसतास तर जीव वाचला आता. डोसक्यात विचारचक्र सुरू हुतय.
कुजून आळ्या झालेल्या बॉड्या विनायकमामा मन, मेंदु व भावना नसल्याल्या माणसागत नाकाला मास्क न लावता फाडल्यात. कापड, सुतळी, निलगिरी तेल, सुई दोरा, व्हिसेरा असेल तर २ भरण्या व येक किलो मीठ लागतय. डॉक्टर सांगतात त्यानुसार अवयव काढायला लागत्यातत. त्यासाठी सूरी जपून वापरावी लागती. डोसक कस फोडायच, कुठला अवयव कसा काढायचा हे आता ते ‘डोळ झाकून करू शकतात इतका हात बसलाय. महिन्याला कमीत कमी पंधरा माणसं ते फाडतात. अशी तीस वर्षात त्यांनी तीन चार हाजार मानस फाडल्यात. पंधरा बाय पंधराच्या त्या खुलीत येडीवाकडी तोंड आसलेल्या भितीदायक, वेगवेगळ्या अवस्थेतील त्या मूडदया शेजारी जिवंत असणारा त्यो एकमेव माणूस. गरीब ,श्रीमंतांही फाडणारा,जिवंत हाय तवर कस जगावं व जगण्याची किंमत समजल्याला हा धाडसी माणूस, ग्लोजची ऍलर्जी होऊन हाताला जखमा झालेल्या असतानाही तो माणसं फाडतोय आपली जबाबदारी व एक सेवा म्हणून…..