वड्याला मसर धुयाला:
वड्याला मसर धुयाला:
विनायक कदम:९६६५६५६७२३
गावाकड मानस आनंदात आसायला सगळ्यात भारी काय आसल तर ती मजी जनावर. गय, म्हस, रेड, बैल, घोड, रेडक, कालवड(गावाकडं कालवडी कूट गेल्या आस पुरीसनी आजून म्हाताऱ्या बाया म्हनत्यात), शिर्डी, कोकर, खाँन्ड, कुत्रं आशी गोट्यात धा बारा खुट्याची लांबलचक दावन. मानस जिवडी मया लावायची तितकी मुकी जनावर मानसाला लळा लावायची. लय तरची जनावर. आनी तेंची तरा बगायची आसल तर त्यासनी धुयाला काडायच. मसर धुन मजी माज साऱ्यात आवडत काम. येक म्हस, दोन जरशी गया, येक दिशी गय, खाँन्ड, रेडाक आनी जवानीत आल्याली कालवड. रविवारच सुट्टीच धुयाची जुळणी किली.
पावसानं चुपुन काडलय आनी घरामागल्या वड्याला निवाळ संक पानी रात ना दिवस वाहतय. दोन कासर ,व्हीलच्या साबनची वडी, ब्रश आनी कुचीची हातात बसल आसली काळी कपिरी मसर गासाय हुडकून आनली. मसर धुयाची तयारी बगून भाचा उधळतच आला. लिंबाची लांब लचक फोक आदी गड्यांन काडली. त्येज्या ताक्तीपेक्षा तायगंड जनावर. रेटना की त्यो हानाय जुपी करायचा. मसरांच्या ईसनीला दावी लावली. म्या येक म्हस, भाच्यान काळी जरशी गय क्यांनलवरन वडत घेत वड्याकड वरात निगाली. ईसनीला दांड जनावर वडून वडून हाताला कच पडायची येळ आली. आरडत,भ्या घालत, शिव्या देत वडा गाटला.
मावल्याचा ढु मजी बेरडकी आनी कदमाच्या वस्तीच श्रद्धास्थान. काळाकुट्ट लांबलचक दगुड आनी दगडाला लागून वड्यात धा बारा फूट खाली पान्याचा ‘ढू’. बाया धुनी, वाकळा, बाळूती, तळवट, किलतांन धुयाला वड्यालाच की. साबनाच्या वड्या, निरम्याच पूड, मिसरीची डबी, बाया कासुट घालून सनाची धुनी आपटाय मावल्याव न्ह्याच्या. मावल्याचा ढू मजी पाननीवळ, मास, खेकड, इरुळ हेंच्या हाक्काची सुरक्षित जागा. पानी खडूळ झालं की पानं निवळ कुनी न सांगता गडी पान्याचा तळ दिसलं आस फिरून पानी निवाळ करायचं. त्यासनी वंजळीत धरायच मजी बगळ्यागत चप धराय लागायची. वाकून कम्बरला कड याचा. जात बुडाय लय ताट. तोंडा फूडन बुडून पायात निगायची. पन धरायला भारी वाटायचं.
बायानी धुयाला न्हेल्याली साडी वडा भरून लावत बगळ्या गत बिन हालचाल करता पान्याच्या कडला हुब थांबून कड याचा. चिंगळ्यांच्या झुंडी च्या झुंडी पायातन पळायच्या. टाचला मळ खायाच्या. गुदगुल्या व्हायच्या. आर आला उचाल म्हनूस्त्रर मास पळून जायाचं. परत तसच करत वड्याला दिवस निगायचा. सताट धा मास घावल्याव तेंच्या पोटातली घान काडून राच्च जुळणी व्हायची. खेकड तर नांग्या वर करून यच तू दावतु तुला आसल्या तोऱ्यात डोळ काडून पान्यातन बगायचं. ऊन खायाला दगुड धरून तिरपिला याचं. कोन आलं की पाटशिरी बिळात. तेज चिकलाच बिळ त्यो करत आसताना बगाय मिळन मजी लय कायतर मोट बगीटल्यागत वाटायचं.
खाळ खाळ आवाज करत काळ झार पानी कुटल्यातरी आनंदानं धावत हुतं. मावल्याच्या कडला निर्गुडीच्या ताटव्यातन बेडक तालासुरात वरडत हुती. पायाला खर आसल्याली जरशी गय आंगुळ नगु म्हणत पाय वडत पान्यात घुसली तशी पान्याच्या कडला गिलीबी. करंजाच्या झाडाला गय बांधली. मस पानी पित्या का बगीटलं पन मशीचा तसा आज मूड न्हवता. पान्यात मुतून हागाय जुपी किली. याक दाव शिताफळीच्या झाडाला गुतापल.आनी दुसरं ईसनीला लावत भाच्याकड दिलं. बावारल्याली मस लैच बावारली. पान्याच्या बारडीतल पानी जस आंगाव पडलं तसं आक्कान नाचायलाच जुपी किली.
पान्याच तिला लै वावडं. त्यात तोंडाव पानी घ्याच मजी तिला मालक कसाब वाटाय लागला. करंजच्या फोकन पाटीव दोन बार काडल्याव जरा थंड आली. पन ती थंड हुस्तोर म्या तिज्या साऱ्या कुळाचा उद्धार शिव्या दिउन केलता. त्यातच तिनं मुताच शेपाट चापशिरी पांढऱ्या धोट बन्यालाव मारत नक्षी काडली. भिजवून झाल्याव साबनची वडी आंगाव लावून खास खास चिपन घासनीची जुपी केल्याव मस वाकाय लागली. काळ्या मळाच्या गोळ्या निगाय लागल्या. आनी पान्यात मळ खायाला माशाच्या कळपातल पंचीस तीस गडी पान्यात टपून बसलवत. घासनीन मशिलाबी बरं वाटाय लागलं.कनाटा शेपाट, मांड्या, कासुटा, नक्या,निरान, खुर, शिंगाट, पुळी, बिंबी, डोळ,नाक दगडी चिपन, ब्रशन घासून काडलं. काळी मस आनीकच दिकनी दिसाय लागली. कासरा ढिला केल्याव बया फुटाय हुस्तोर पानी पिली.
भायर काडून झाडाला गुतापली.आनी जरशी गय पान्यात वडली. जात हागुन हागुन घानीघान झाल्याली. बोचा आनी मांड्या शेनान भरल्याल्या.आंगाव तर बारा म्हयन माशा. पानी मारून चपचपीत करून घासनी लावली. चिप व ब्रशन मनासारकी घान निगली. दुनी घराकडं वडली. वाटत जरा थांबवली. वाकून वाकून आपापल्या जीबन पुसाय तेंनी जुपी किली. आल्याल्या माशा शेपटाच झपुट खात हुत्या. उनाला बांधली. आता म्हनलं येकच गय न्हयायची उगच आब्दा नगु. ह्याच तरची तिबी गय गॉड बुलुन आंगुळ घालून आनली. आता दिशी गय मजी लय तायगंड. तिला न्हयायचं मजी पाय मोडायच काम. खॉंड संग न्हेल तर बरं नायतर न्हेनाराचा पाळनाच करायचं. ईसनीला लय दांड. खाँन्ड फूड वडत आनी माग गय. गडी वड खायाचा, फोकचा झपुटा दिला की आत्राळी व्हायचा.
वडा आनी पानी बगीटल्याव तेंन कडला मातीत पाय खवल. वडून बी ईना. हाळूच गय शिताफळीला गुतपत त्यो पळून जायाच्या आदी कासरा धरला. न्याट लाऊन वडला तर पान्याच्या ह्या कडसन त्या कडला उडी मारली. पळायच्या आदी बुडक्याला दाव गुतवत गय कड मोर्चा वळवला. दिशी जात मजी आंगाला घान अजिबात लाऊन घेत न्हाय. आत्ताच धुन आनल्यागत. पानी शिपडाय जुपी केल्याव पाताळ बिर हागली. गांड हिकडन तिकडं तिकडन हिकडं करत मुसमुसाय लागली. त्यात तोंडाव आनी कानात पानी गेलं की कशात घालून घिऊ काय आस कराय लागली. दनकाटून धरलीवती. फोकच दोन बार काडल्याव थंड आली. साबन लाऊन चांगली घासली. लालभडक उटली. सोडाय लाग्लू तर गांडीन माग सरत उधळायच्या नादाव. येसन धरून गोंजरत झाडाला गुतवली. जात बैलागत ओ.
म्हयनाभर झालं आस्त्याल खॉंड जलमून पन गडी मलासुदा रेटत न्हवता. दोन कासर लाऊन बांधून बाजूला हुतुय तवर उसळ्या घ्याय लागला. का..? तर आंगाव पानी नगु. फाड फाड पाच सा बारड्या तेज्या आंगाव वतल्या. तवर लैच रेटना म्हनल्याव भाच्यान त्येज्या नरड्यालाच कवळा घाटला. गडी गप उबा राह्यला. साबन लावून मांड्यात हात घाटल्याव तेंन मांड्या तानल्या. तेलाबी बर वाटाय लागलं. नुसती साबन लाऊन गड्याला नकीपातूर चोळला. म्हनलं कपिरी लावली तर गड्याच कवळ कातडं निगल. धोत आवरत आवरत कसातरी रेटला आनी धुयाच झाल्याव गळ्यातन दाव काढून सोडला तस शेपाट वर करून गडी आल्याल्या वाटन घराकडं चौकऱ्या उधाळला. लिकरू गेल्याव आय दम काढत्या वी. झाडाला दवासन्या घिऊन लेकरासाठी तीन हागुन मुतून घेटलं. परत पानी आनून ढुंगनाव पानी मारलं. तिला कवा घर गाटीन झालत. गेल्यागेल्या खोंडाला चाटल तवा आक्का थंड झाली.
आता काळ रेडाक आनी कालवड संगच न्हयाची म्हनलं. धा दिसापूर्वी मस येल्याली. काळी झार आशी दनदनीत ,पानीदार डोळ्याची रिडी झालती. चार म्हयन्याची कालवड. रांड लय तायगंड. सोडलं की पळाय जुपी. गळ्यातल्याच कासऱयांन तिजा फुडला पाय बांधत तिला पायकुट घाटलं. आता पायकुट ह्यो प्रकार पोरासनी कळतं नाय. पायकुट घाटलं की कसलबी जनावर आसुदी आकसून चालायचं. तिला पायकुट घालून भायर काढली तर जात तीन पायाव आत्राळी होत मला वडत न्हेल. तवर रेडाक धुरळा उडवत कॅनलवर गेलत. हो हो करत आवरलं आनी दाव्याच्या मुदनींन दोन तीन तडूक पाटीव दिल. चांगला कडावा झाल्यावर बया थंड आली. तवर वड्यात पोरांनी रेडाक निम्मं भिजवलवत. रेडाकाच चिकाट आंग साबनान जरा बरं निगल. ताकत कमी आसल्यान रेडाक आमच्या आवाक्यात हुतं. धून दाव गळ्यात गुतापल आनी दिल सुडून. भिरकीट उटवत ती घराकडं निगाल.
कालवड आमाला दोगांचा पाळना करनार ही म्हायती हुतं. झाडाला बांधून जरा भुजवली मग कासर लावून पान्यात वडली. पान्यात धिंगानाच सुरू केला. हुदी म्हनलं जरा कडावा त्याशिवाय थंड याची न्हाय. थंड आल्याव बांधून मग कार्यक्रम सुरू झाला. साबन घासनी लावल्याव तिलाबी बर वाटाय लागलं. मानसं काय..नायतर जनावर काय? साऱ्यासनी मन भावना हायत्याच की ओ. धूयाला काडल्यावच जनावरांच सभाव कळत आस्त्यात. धून झाल्याव सामान घेटलं. घराची वाट धरली. सावळजकड पाऊस उतरायला लागलावता. धूयाला आकराला जुपी केल्याली वाजल दोन. घरापशी आलु तर जिबचा टावेल करून जनावर न सांगता आपलं आंग पुसत हुती.