वाडा गावाकडंन बी गायब झालाय.!
गर्दीतला आवाज…
वाडा गावाकडंन बी गायब झालाय:
विनायक कदम:९६६५६५६७२३
बाई वाड्यावर या… बाई वाड्यावर या……..ह्या गान्यान पाटील आनी गावाकडचा वाडा बदनाम केला. आनी टीव्ही सिरीयल वाल्यानी भुताचा वाडा, झपाटल्याला वाडा आसल्या सिरीयल काडून वाडयाची वाट लावली. लिवनारानी आजपातूर वाड्याच आसल फालतू दर्शन लोकासनी केलंय. पन गावाकडचा वाडा आसा हुता का.?
वाडा मजी ग्रामीन भागाचं वैभव, वाडा मजी श्रीमंतीचं दर्शन, वाडा मजी संस्कृती, वाडा मजी येकोपा, वाडा मजी प्रेम, वाडा मजी जिव्हाळा, वाडा मजी संवाद, वाडा मजी तालेवार संस्कृती, वाडा मजी न्यायदानाचं ठिकानं. काय कौतुक ल्याव या वाड्याच. कवी म्हन्तु घर आसावं घरासारखं नकोत नुसत्या भिंती. पन संस्कृतीचा प्रतीक आसनारा वाडा व तेज वर्णन करायला कवीबी दमलं. ईवडी वाड्याची महती हुती.
गावाकडं तर वाडा मजीचं वळक हुती. पाटलाचा वाडा, कुंबाराचा वाडा, जाधवाचा वाडा, आडनावावरनं वाड्याची वळक हुती. पुन्या बिन्यात गेला तर नातू वाडा, सरदार वाडा, गोखले वाडा, बापट वाडा आसली नावं हायती. गावाकडचा वाडा मजी नावागतच भारदस्त आनी भव्यदिव्य आसायचा. कमीत कमी आरध्या येकऱ्यात. वाड्याच्या आत मंदी तुळशीच वृंदावन. कोपऱ्यात पान्यानं भरल्याल रांजानं, वाड्याच्या मदली भुय दिशी गयच्या शेनाने सारवल्याली आसायची. वाडा एक मजली ,दोन मजली आसायचं.
वाड्यात दोन,तीन वरीस पुरल आसलं धान्याचं कोटार, बाळंतीन बायसाठी स्पेशल खूली, देवासाठी बी मानस जागा आरक्षित करून ठेवायची. मदी गुळगुळीत फळ्यांचा कड्या लावल्याला झोपाळा तेज्याव बसून घरातलं जेष्ठ गडी वाड्यातल्या हालचाली टिपत नातू, पनतू खेळवत बसायचं. वाड्याच्या मागं परसबाग, जनावरांसाठीबी आत गोटा आसायचा, तवा काय चावीला पानी याची वाट बगत बसत न्हवती मानस. वाड्यात आत नायतर भायर आड व तेज्याव राहाट बसवून कायम ताज झऱ्याच पानी मानस प्यायची. आडातन बारडी भरून पानी शेंदायचं मजी बी कला हुती. तेंन व्यायाम व्हायचा.
वाड्याच्या जोत्यापातूर दगडाचं भक्कम बांधकाम आसायचं. भित तीन तीन चार चार फूट रुंद. माती आनी चुन्याच्या पांढऱ्या भिती त्याव सनावाराला मानस पोत्यारा देत सारवानं काडायची. तेज्या पांडऱ्या मातीचा वास काय सांगावा. सारवल्याल्या भितीवर चित्र बायका काडायच्या. तवा झाड भरपूर हुती. ढीगभर लाकड मिळायची. मग काय खिडक्या, लाकडी जिनं, तुळया व वाड्याचा भव्यदिव्य दरवाजा तयार व्हायचा. सागवान, बाबळीच लाकूड दरवाज्याला वापरायची. सुरक्षेच्या दृष्टीनं दरवाजा म्हत्वाचा हुता. दरवाज्याच्या मागं काट्या, कुराडी, कोयतं, भालं, पारं, बंदुका काडतुस आसायची. लागूनच कातड्याच्या भल्यामोठ्या चपला. भल्या मोट्या वाड्याच्या भिती चढून त्यात चुरी करायला जायाचं मजी सोपं कामं नसायचं. म्हनून वाड्यात चोऱ्या सहसा व्हायच्या न्हायत. झाल्यातर कमी.
वाड्यातलं गडी पाटचं उटून रानात जायाचं. तवा दिवसभर घरातल्या म्हाताऱ्या मानसांवर वाड्याची जबाबदारी आसायची. ४० ते ५० मानस येकत्र वाड्यात मिळून मिसळून राह्याची. त्यामुळं संस्कृती नांदत होती. वडीलधाऱयांचा साऱ्यांच्याव धाक हुता. हेज्यामुळं चुकीचं काय कराय मानस धजायची न्हायत. येवड्या मांनंसासानी तवा बायका जात्याव दळून चुलीव करून घालायच्या बरं का.? जत्रा ,लग्न ,सन वराला पय पावन्यानी वाडा गजबजून जायाचा. उन्हाळी व दिवाळीच्या सुट्टीत पोरं मामाच्या रानांत, वाड्यात, आंब्या, किळीच्या बागातनी हुंदडायची. वाड्याच्या मदी पटांगनात गट्टया ,लंगडी, लपाछपी, भातुकली, चिनी दांडू, कबड्डी, खोखो खेळायची.
आसा ह्यो वाडा गोरगरिबांसाठी धान्य, दूद,धय, ताक मिळायचं हाक्काचं ठिकानं हुतं. साऱ्यात म्हत्वाचं मजी पाटलाच्या वाड्याव योग्य न्यायनिवाडा व्हायचा. ह्यातन दिवंगत अभिनेते निळू फुले यांचा बाई वाड्यावर या ह्यो डायलॉग तुफान गाजला. तेजा आर्थ जरी येगळा काडला गेला आसला तरी मदत घ्यायसाठी वाड्यावर या आसा हुता. वाड्याच्या देकभालीसाठी त्यातली कुशल मानस आसायची. मानसांचा तवा येकमेकाव दांडगा इसवास. वाड्यातली मानसं भायर जाताना वाड्याच्या किल्ल्या शेजाऱ्यांच्या ताब्यात दयायची आसला ह्यो वाडा. त्या वाड्याचं सारं वैभव सध्याच्या सिमेंटच्या जंगलात हारवून गेलयं.
५०ते ६० वर्षांचं आयुष्य आसनारा, उन्हाळ्यात थंडावा व हिवाळ्यात उबदारपना देनारा, प्रेम, जिव्हाळा, संस्कार, न्याय देनाऱ्या वाड्याचं आयुष्य संपल. नव्या पिडीला तेज म्हत्व कळलच न्हाय. शेरात सोडा गावाकडन बी वाडं गायब झाल्याती. मात्र त्यां जाग्यांची वळक आजूनबी त्या वाड्याच्याच नावानं हुत्या. आता ढीगभर पैस आलं. आभाळाला टेकाय गेल्यायिवडी मजल्यांची घरं झाली. पन त्यात राह्यला मानसं दोनचं. पण तिबी सुखी न्हायत. वाडं गेलं येकत्र कुटुंबव्यवस्था जाऊन बंद खूलीतली विभक्त कुटुंब पद्धती आली. तिजा परिनाम समाज स्वास्थ्यावर झाला. व वाड्यात घडनारी सुसंस्कृत पिढी संपली.