उतरंड: ग्रामीण भागचा लॉकर
उतरंड: ग्रामीण भागचा लॉकर
विनायक कदम:९६६५६५६७२३
उतरंड ह्यो काय प्रकार हाय? आस शहरातलीच काय गावाकडची पोर बी ईचारत्यात. कारण आलीकडं आमच्या पिढीचा ग्रामीण भागाच्या जुन्या वस्तूंशी काय संबंधच आला नाय ओ. पितळी नंतर जर्मल आल. नंतर स्टील आल. ही सार गावाकडं बी आलं बर…का? मग उतरंड कुटली दिसत्या.
गाडग्याची उतरंड आणि गाडगी कधीकाळी ग्रामीण भागाचा आत्मा हुती. गाडग्यात बायका कोरड्यास करायच्या. दावणीला गुर लय आसल्याण दूध दुपत काय कमी न्हवत. मग भल्या मोठ्या गाडग्यात दूध तापाय चुलवाणाव गाडग चढायचं. खरपूस वास येत भाकरीगत साय याची. बायका धय लावायच्या. घटमुट धय लागायचं. मेडक्याला दुरी बांधून डेऱ्यात ताक हुयाचं. सगळं भारी आणि चवदार लागायचं. त्यो तसा सुवर्णकाळच हुता. तवाच कुंभारमामा गाडगी आसली मजबूत करायची की ती कसही वापरा फुटत न्हवत एवढा तेजा दर्जा हुता.
आता उतरंड मजी घराच्या, घपराच्या येका कोपऱ्यात सुरक्षित लावल्याली गाडग्याची टीमानं. येकावं येक बारक्या मोठ्या गाडग्याचा थर लावून किली जात्या. तसा म्हणला तर ह्यो गावाकडचा बायकांचा लॉकरच ओ. पूर्वीच्या काळची माणसं सोन ,चांदी, पैसा,आड़काच काय मौल्यवान वस्तू उतरंडीच्या तळाशी ठेवल्या जायाच्या त्यात सुरक्षितता हुती. आताच्यागत तीजुरी हुत्या वी तवा. आणि त्या असल्या तरीबी आता चोऱ्या करणारी माणस फोडत्यात.
पाच ते सात मड़कयांची उतरंड कडधान्यासह , राखत घाटलेल्या बी बियाणांनी भरल्याली असायची. ती येकप्रकारची बियाणं ब्यांकच हुती. राकत घाटल्याल आणि गाडग भरून ठेवल्याल बी माणसं पावसाळ्यात डोळ झाकून रानात पेराय न्हयायची. येवडा ईसवास गाडग्याव हुता. कधी बी, बेवळा किडत न्हवता, बी बाद होत न्हवत. घराघरात उतरंड्या भरल्याल्या आसायच्या. शेतात न्हवं गावात हाय न्हाय तेवढं धान्य, डाळी, बी भरून आसायच.
आगदी वाळकाच्या ब्या पर्यंत. पेरायच्या टायमाला गाडगी मुकळी व्हायची. गावातला माणूस बाजारात बी आणाय म्हणून कधी बाजारात गेला न्हाय. काळ बदलला बियांण संकरित आल. तसाच त्याचा दर्जा बी त्याच मापान हाय. वर्षभर गाडग्यात बी जपून ठेवणाऱ्या बायका, गडी गावाकडं बी आता घावत न्हायत. रानात कुरी घालायच्या आदल्या दिवशी बाजारात जाऊन बी आणायचं संपला विषय. गावाकडं बियाणं साठवण्याची व्यवस्थाच आता संपल्या. अपवाद एखादीच राहीबाई पेरें सारखी गरतुली आसत्या.
सोन व पैसा ठेवायसाठी घराघरात तिजूरी आल्या. गावोगावी विकासाच वार वाहू लागलय. आणि ग्रामीण भागच वैभव असणारी ही उतरंड गायब झाल्या. काय दिवसापूर्वी कवठे एकंद मधील आमचे मित्र संदीप तोडकर यांच्या घरी गेल्याव त्यांच्या पणजीन घेतलेल्या गाडग्याची उतरंड बघितली. त्यात धान्य भरून तेंनी बी त्याची चांगली जपणूक किल्या. जतन करून येणाऱ्या नव्या पिढीला उतरंड दावायच काम तेंनी केल्याल बगून भारी वाटलं.
खूप सुंदर माहिती आहे .
नव्या पिढीला जुनी संस्कृती परंपरा समजण्यासाठी उतरंड उपयोगी ठरेल .
मनापासून धन्यवाद🌿🙏