--------------------------------- ======================================

उपऱ्या दगडाला देवपण बहाल करणारा ‘कुमार’… बेहाल..!

उपऱ्या दगडाला देवपण बहाल करणारा ‘कुमार’… बेहाल..!

विनायक कदम:९६६५६५६७२३

जखमा अनेक सुगंधी, झाल्यात काळजाला…
केलेत वार ज्याने, तो ‘मोगरा’ असावा…!!

अशी मराठीत एक गझल आहे… का कुणास ठाऊक? पण मला नेहमी वाटतं; ही गझल निर्जीव दगडाला घाव घालून जिवंत व बोलतं करणाऱ्या वडर समाजासाठीच लिहिली गेली असावी. अनेक कवी, लेखक मंडळींनी वेगवेगळ्या पद्धतीने दगडात जीव ओतला व दगड जिवंत केले. आमी मात्र ..”तू नुसता दगडासारखा हायस..!” आसं म्हणत एकाद्याला नावं ठेवण्यासाठीच दगडाचा वापर केला. मात्र अशी एक व्यक्ती आहे, ज्यानं गेली ३९ वर्षे दगडावर प्रेम केलं..! सातासमुद्रापार त्याचा दगड गेला. मात्र “दगडाच्या काळजाचा, दगडाचा देव तू.!” या गाण्यातील शब्दांप्रमाणे त्या दगडातला देव त्याला कदी पावलाच न्हाय. त्या निर्जीव,निस्तेज दगडाला देवपण ‘बहाल’ करणारा कुमार मात्र … ‘बेहाल’ हाय….!

    'कुमार तायाप्पा पाथरवट' सांगली जिल्ह्यातील ऐतिहासिक मिरज नगरीत रेल्वेस्टेशन रोडला रस्त्याच्या कडेला गटारीजवळ सातत्यानं एकाग्र होऊन दगडावर घाव घालणारं नाव..! वय ५७ , डोक्याचं केस धुळीनं पांढरं पडलेलं. कचरा जाऊन लालभडक झालेले डोळे, मनगटावर घड्याळ, अंगात धुरळ्यानं भरलेलं बनेल, पायात साधी पँट, साधंच चप्पल आणि मोबाईल नंबरसह त्याची ओळख सांगणारा शासकीय भिंतीला टांगलेला फलक.! माहितीसाठी शोध घेत आम्ही कुमारला गाठलं ! नमस्कार चमत्कार झाले आणि उलगडू लागला कुमारच्या आयुष्याचा प्रवास..!

     ७ वी शिक्षण झालेला कुमार बापासोबत या धंद्यात आला. " कोरीवकाम करण्यासाठी 'कुरुंद' दगड वापरला जातो. हा दगड कर्नाटकातील गोकाक मधील अरबावी गावातून आणला जातो. दगडाचेही अनेक प्रकार आहेत... पांढरा, काळा, पिवळा, चॉकलेटी, जांभळा... कर्नाटकातून एक ट्रक ४० हजार रुपयांना मिरजेत येतो. त्यात कमीत कमी १०० दगड असतात. ५ प्रकारच्या छिन्नी, हातोडी, कटर, होनाळ, टेप, पार, गन या हत्यारांसह सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत काम चालतं. या काळात दगडावर कमीत कमी १ हजार घाव घातले जातात. एक तुळशी वृंदावन करायला १५ दिवस लागतात..! " कुमार आत्मीयतेनं सगळं सांगत होता.

     ३९ वर्षात कुमारनं २१ ते ४१ फूटांचे ७०-८० जैन मानस्तंभ, १६ धार्मिक लांचनं, विविध देव-देवतांची १५ ते २० मंदिरे घडवली. तसेच कर्नाटकने बेळगांव मध्ये उभारलेल्या विधानसभेसाठीही त्याने दगड घडवलेत. संपूर्ण देशभरात तर त्याचे दगड गेलेतच; मात्र त्याचबरोबर सातासमुद्रापार अमेरिकेलाही लहान बाळांच्या घुटीसाठी त्यानं घडवलेला दगड गेलाय.! दिवसभर दगडावर घाव घालून घालून छिन्नीची धार जाते, मग लोहाराचं कामही घरातच करावं लागतं. उन्हाळ्यात डोक्यावर आग ओकणारा सूर्य, खाली तापलेली धरणी व हत्यारे यांनी हात भाजून निघतात पण सांगणार कुणाला? पावसाळ्यात पावसामुळे नेम चुकतो व हातोडीचा चुकलेला घाव थेट हातावर येतो, जखमा होतात. तिथलाच पुढारीचा झाडपाला चुरगाळून जखमेवर पिळायचा आणि परत काम चालू! काम करताना सुरक्षिततेची कोणतीही साधने नाहीत; त्यामुळे अनेकवेळा दगडाचे तुकडे डोळ्यात जातात. जवळचं नारळाचं केसार घेऊन त्यानं ते डोळ्यातून ओढून काढायचं! नाही निघाला तर मग डॉक्टर गाठायचा.!

       "पूर्वीच्या काळी कलेला व कलाकारांना राजाश्रय होता, ते बरं होतं.!" आसं कुमार सांगत होता.! मिरजेत गेली ३०-३५ वर्षे ७०० ते ८०० लोकसंख्या असणारे ४ प्रकारचे वडर राहतात. यात मातीवडर, गाडीवडर, बंडिवडर व पाथरवट वडर.! आमचं मूळ आंध्र प्रदेश, भाषा तेलगू, जात भटकी. समाजानं अनेक किल्ले, मंदिरे घडवली; त्यामुळे कायम भटकंती चालायची.! मायबाप शासनाकडून आमाला ६१ वर्षांपूर्वीचा पुरावा मागितला जातो... कुठला द्यायचा? हा अगतिक सवाल.! कुमारला ३ मुलं, मात्र नवी पिढी या धंद्यात येत नाही. दिवसभर दगडावर घाव घातल्यानं अंग दुखतं. मग दारू ढोसून त्यावर उपचार करायचा आणि बऱ्याचदा बिन जेवताच झोपून जायचं. बराच त्रास होतो. व्यसनामुळं पोरं, ह्यो धंदा करायला नको म्हणतात...!

    मुलाखत झाली आणि लेखणीपूत्रांची कविता आठवली....

घडल्या अनेक मूर्ती… दिला आकार दगडाला…
प्रत्येक घावागणिक मात्र.. पडलीत भोके काळजाला..!
पाषाण पालवी फुटेल केंव्हातरी…
कडा ओलांडून पापण्यांच्या,धरण फुटेल जेव्हा कधी..!
होतील स्वच्छ, लख्ख मूर्ती अन् अभिषेक सद्भावनेला…
प्रत्येक घावागणिक मात्र.. पडलीत भोके काळजाला..!
हाती हातोडा… नजर छिनली कैकदा, बारीक खड्यांनी
ऊन, वारा भर पावसात… हसली जिंदगी येड्यावानी..!
केलं दान देवपण… त्या उप-या दगडाला…
प्रत्येक घावागणिक मात्र.. पडलीत भोके काळजाला..!
घडल्या अनेक मूर्ती… दिला आकार दगडाला…
प्रत्येक घावागणिक मात्र.. पडलीत भोके काळजाला..!

      माणसांच्या गर्दीत व वाहनांच्या गोंगाटात दगडासोबत दगड होऊन कुमार एकाग्रतेने घाव घालू लागला.... माझ्या काळजात मात्र कुमारच्या चेहर्‍याबरोबर, लेखणीपुत्रांचे शब्दघाव वर्मी बसत होते.....

” घडल्या अनेक मूर्ती… दिला आकार दगडाला… “

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *