--------------------------------- ======================================

उकरड्यातलं खात भराय:

उकरड्यातलं खात भराय:

विनायक कदम:९६६५६५६७२३

रब्बीच घव ,शाळू, मका, आसली पिकं काडून झाली की सा बैलाचा नांगूर घालून मानस रानाच पॉट फाडून टाकायची. तवा वरसातन दोनच पिकं घिऊन मानस रानाला ईसावा दयायची. रान नांगरून झालं की उनाळी पाऊस ताली फुटूस्त्रर पडायचा. गुडग्याच्या मापान झाल्याली नांगरट, रान हावरया गत पानी प्यायचं. ढेकाळ फुटून रान पुळीगत व्हायचं. जून म्हयना लागायच्या आदी पंद्रादी उकरड्यातल शेनखात रानात घालायला काडाय जुपी व्हायची.

तवा खात काडायला लाकडी, लोकांडी बैलगाड्या. ऊन झिंडू फोडतंय म्हनून झुंजूरकाचं खात काडताय मानस लागायची. तीन चार कळकाच्या पाट्या, दोन खुरी, उकराय कुदळ, पान्याची घागर, साकरची बारदानी पुती डोसक्याच्या चुंबळीला आनी डोसक्याव खॉळ घ्याय पुती आसायची. खात काडाय बैलगाडीचा बैलक्या उकरड्याजवळ बैलगाडी लावायचा. गाडीच्या चाकाला घुंन लावून कासर बावकाडाला बांदायचा. गाडीला आडकवल्याल्या वंगारीतन काळं मिट वंगान कन्याव सुडून चाकं हिसकं मारून सारीकडं वंगान गेलयका बगायचा. पटकाराची पुती लाऊन त्यो घरातनच याचा. काटी लावून माग बटार आसायचं.

पांन, तंबाकू खाल्ली की भराय जुपी व्हायची. नेटाक गडी पाट्या टाकाय व्हायचं. पाट्या भराय दोन गडी आसायचं. खात काडायच्या आदी मानस घुळून घुळून काटक्या बिटक्या काडून येवस्थित करायची. पयल्यांदा भरताना उनानं वाळून गेल्याल खात भराय मजा वाटायची. पयली पाटी साट्यात टाकली की तळपाटीवाला चारी कोपऱ्यान खात पसरून येवस्तीत करायचा. सकाळचं नेटानं तवा तवाच गाडी भरायची. पाटीला पाटी मारून, खोऱ्यान दाबून नायतर गाडी तुडवून खात भरायची.

गाडी भरली की चारी बाजूनी खोऱ्यान मारून खात वाटत ढासळाय नगू म्हणून काळजी घ्यायची. त्याच गाडीतल्या खाताव उलटं खोर मारून गाडीचं घुंन काडायच. बैलक्या दांड्याव उबा हून माग टेकायचा. कासरं सुडून छलं म्हनलं की बैल नादाला लागायची. तवा रस्त कूट सरळ्या मापाचं हुतं. वड्या खोड्यानी मूलकाच्या आडचनी. त्यात चड, उतार पन खाऊन पिऊन आसल्याली तावाची बैल कसलाबी चड आत्राळी काडायची.

रानात गाडी गिली की चाकं फुगल्याल्या रानात घुसायची. न्याट लागलं की बैल शेपाट वर धरायची, हागायची आनी चराचर लांबायची. कुटल्या बाजून टाकायचं हाय बगून गाडी लागायची.मागलं भटार काडून बारीक बारीक ढीग खाताच टाकायचं. माग खात वडाय योक शेपरेट मानूस आसायचा नायतर बैलक्याच ही बी काम करायचा. पयली ख्याप वतली की परत बैलासनी कूट जायाचं, कूट थांबायचं सांगताय लागत न्हवत. ती जाऊन जाग्याव थांबायची. चाकूरी पडल्याली वाट बगून चौकऱ्या उधळायची. वरचं वाळल्याल खात संपलं की आत कुजल्याल वल्ल खात लागायचं. तवा भरनाऱ्याची, उचलनाराची आनी बैलांचीबी फेसाटी व्हायची.

पाट्या भरायचं, उचलायचं ही सारं कलंन करायची कामं. तीत हुबलाकपना चालतं न्हाय. खात भरताना खातात ढीगभर हुमन्या, शिंगाचा गेंडा, पाली, सरडं, गोमा निगायच्या. ती धरायला बाजूला कावळं, कोतवाल डोळा ठिऊन टपून बसायचं. टप्प्यात आलं की झडप घालून कार्यक्रम करायची. सकाळच्या पारी कामं वसरायचं. हालावं गडी आनी वतायचा पल्ला जवळ आसला की काम वसरायचं. लय लांब पल्ला आसला की दोन बैलगाड्या लागायच्या. जनावर बक्कळ आसल्यानं उकरड्यात ढीगभर खात साटायचं.

दोन दोन तीन तीन दिवस खात काडायच काम चालायचं. उनाचा चपुटा लागला की गडी घामानं नितळायचं. आकरा साडे आकरालाच जेवाय सुट्टी व्हायची. दमल्याल गडी तोंडाला आल्याल्या हिरीत उडी टाकून हाळ्या देत पवायचं. कामाचा शिनुटा जायाचा.

झाडाखालीच धय,खर्डा, कोरड्यास, कांद, चटन्या, रताळ, काकड्या, पिरू,आंबं, जाम्बळ, गाडगाबर टाक खाऊन झाडाखाली आडवी व्हायची. बैलक्या बैलासनी पानी दाऊन रानातच बांदायचा. यिळ्यानच रानातली हिरवीगार वैरन खापलून तेच्याफुड गुडग्याचा ढीग लावायचा. दमल्याली बैल वैरनीव पालती पडायची. वैरन पोटात वडून रवत करत बसायची. तेच्या तोंडातन दुनी बाजूला फेस याचा, भारी वाटायचं.

खात भरायच मजी पुरशी पनाच लक्षन वाटायचं. जरा आंगात रग याय लागल्याव पयल्यांदा खात भराय जुपी किली. काय सांगायची आब्दा, खात यिकीकड आनी पाटी यिकीकड. गुडग्याला पाटी टिकवून टिकवून नळ्याचं साल्ट निगाल. बरं पाटी तर काय येक भरायची हाय वी. पाटीवर पाटी यायची. बरं नुसतं भरायचं न्हवत भरून पाटी उचलू लागायची. नरडीला यायचं. खोऱ्याच निगू म्हनलं आपुन तळपाटीला हुया. बा कडनं डोसक्याच्या मापाची चांगली चळचळीत चुंबळ करून घिटली. जवा भरलाल्या पाट्या उचलाय जुपी झाली तवा कंबारट्याच्या शिरा कोनतर वडतंय आस वाटाय लागलं.

बगनारी म्हनायची कवळा गडी कशाला पाटीला घाटलाय, लचकलं बिचकलं. सांगतुय पन गाबडं
आयकतय कूट.? बा म्हनायचा. पन बाला सुक लागावं ह्यो उद्देश आसायचा. सुट्टी झालं की शिनुटा जी याचा म्हनून सांगू, मेल्यागत झॉप लागायची. आंगातन घामावाटं घानं निगून जायाची, भारी वाटायचं. रानात वतल्याल खात परत साऱ्या रानांनी यिस्कटायचं. परत त्याव फन कूळवाची पाळी मारलयाव मातीत खात मिक्स व्हायचं. पेराय रान तयार करून मानस तंग बसायची.

उकरडं तरं तरंच. त्यातनं काय काय घावलं नेम नसायचा. बैलगाड्या नंतर ट्रॅक्टर आला. आता तर आमच्या गावात खात भराय बी जिसीबी मशीन लावत्यात. खात भराय नेटाक गडी कूट हायत आता. यंत्रांनी तुमची काम लगीच हुत्यात, पन कष्टाची कामं कमी झाल्यानं गावाकडचा खनखनीत मानूस बी आता दुबळा व्हाय लागलाय.

फोटो सौजन्य: गुगल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *