--------------------------------- ======================================

तंटामुक्ती करणारा ठाणे अंमलदार: हणमंत बोराडे

गर्दीतला आवाज…….

तंटामुक्ती करणारा ठाणे अंमलदार: हणमंत बोराडे

विनायक कदम:९६६५६५६७२३

दिस मावळतीकड झुकाय लागला की क्राईम बीट बघणाऱ्या बातमीदारांचं पाय पुलीस स्टेशनच्या मार्गाकड वळत्यात. दिवसभरात आपल्या भागात किती आणि काय भानगडी झाल्यात हेजी म्हायती घ्याची. ठाणे अंमलदार मजी पोलीस स्टेशनचा तसा मालकच. तेज्या शिवाय पानं हालत नसतंय. पण तसं ठाणे अंमलदार मजी लैच आवघडीतल काम.

कारण तालुक्यातला कुठला माणूस काय ईचारलं, कसला आसल, तेजी भाषा, तेजा प्रॉब्लेम बरच काय.
वर्दीत काम करणारी बऱ्यापैकी माणसं ठाणे अंमलदार म्हणून काम करायला नगु म्हणत्यात. पण तासगावच्या या गड्यांन ठाणे अंमलदारच काम मागून घेटलं. गेली दीड वर्ष सुट्टी वगळता कायम ठाणे अंमलदार म्हणून अनेकजनांनी या माणसाचा चेहरा बगिटला आसल. हा माणूस फक्त गुन्हच नोंदवायचं काम करत न्हाय. तर पोलीस ठाण्यात तक्रारी घिऊन आलेल्या आनेकांची समाधान हुईल आशी तंटामुक्ती करत गुन्ह कमी करायचं काम करतोय. मी बोलतोय तासगाव पोलीस स्टेशनच ठाणे अंमलदार हणमंत दत्ता बोराडे वय ४८ गाव रांजणी हेंच्याच्याविषयी.

लय दिवस या माणसाविषयी डोसक्यात घोळत हुतं. तालुक्यातन पोलीस ठाण्यात येणाऱ्या हरेक तरेच्या माणसाला ह्यो माणूस तोंड दीतूय. कसलाबी भडकल्याला माणूस ,कोणबी आसला तरी नम्र व संयम न सोडता ह्यो माणूस तेज्याशी बोलतोय. येवढा संयम या माणसाकड कुठंन आला. खून,मारामारी, चोऱ्या, अपघात ,मयत, विनयभंग, यासारख्या अनेक गुन्ह्यांच्या कागाळ्या दिवसातल्या १२ तास या माणसाच्या कानावर येत्यात.

पण या नकारात्मक वातावरणात काम करणाऱ्या या माणसाची मानसिक स्थिती काय आसल. गेली अनेक दिवस या माणसाच्या काम करण्याची पद्धत बघितली तर एखादा दिवस ठिकाय पण सलग दीड वर्ष ठाणे अंमलदार म्हणून कोणत्याही तक्रारीशिवाय काम करणं लय आवघड हाय. पुलीस ठाण्यात येणाऱ्या कुटल्याबी माणसाचा सामना या माणसाला करावा लागतोय. तोंडात साखर आणि डोसक्याव बर्फ ठिऊन.

ठाणे अंमलदार जर तापट आसल, त्यो लोकांशी व्यवस्थित बोलत नसलं तर त्याच्या वागण्याचा त्रास साऱ्या यंत्रणेवर होतो. साऱ्या पोलिसांकड माणसं त्याच नजरेतन बगत्यात. वादाच अनेक प्रसंग उभं राहत्यात. तोंडी संपणार वाद मग गुन्ह दाखल करून वरिष्ठांच्याकड ठाणे अंमलदाराच्या तक्रारी जात्यात. मात्र दीड वर्षात तासगावच्या पोलीस ठाण्यात ठाणे अंमलदार म्हणून आल्यापासन माणसांशी वाद कमी झाल्यात.

काय काय मानसासनी कधी कधी पोलिसांनी आमचं ऐकून घेटलं ह्यातच समाधान वाटत त्यांचं वाद मिटत्यात. या माणसावर जरा लिहावं वाटलं. शनवारी सकाळी साडेअकरा वाजता ठाण गाठलं तर माणसांच्या गर्दीतन गड्याचं तोंड दिसना. कामाची येळ हाय म्हणलं परत यिऊ. दुपारी तीनला गिलू तर माणूस जेवाय लागलावता. संध्याकाळी सात ला ठाण गाठलं. सायबाला भेटाय माणसं वरांड्यात घुटमळत हुती. कुणाचीतर फिर्याद कंप्यूटर वर नोंद करायचं झालत.

मोजून तीन मिनिटं मागितली बाजूच्या खुलीत बसलो. आणि मी माहिती विचारली बोराडे दादा सांगाय लागलं. ९२ ला पुलीस भरती झालू. या काळात जिल्ह्यातल्या साऱ्या ठिकाणी जित बदली हुईल तिथं चांगलं काम करायचा प्रयत्न केला. तासगावला आल्यावर सायबासनी सांगत मी ठाणे अंमलदाराचं काम मागून घेटलं. मला आवडत म्हणून.

ठाणे अंमलदाराचं काम म्हणला तर येणारा प्रत्येक फोन नमस्कार तासगाव पोलिस स्टेशन. ठाणे अंमलदार हणमंत बोराडे हवालदार बोलतोय आस म्हणत उचलायचा. पलीकडे कोण कसलाही भडकला आसला तरी नम्र भाषेतच बोलायचं. आसल फोन कमीत कमी ८०ते ९० येत्यात. मग त्यात कुठं गुन्हा घडलाय, आपघात झालाय, बंदोबस्त, कुठल्या सायबाचा नंबर पायजी, आणि आमच्यासारखी सात आठ जण काय दाखल हाय का हेज्यासाठी फोन करणारी.

तक्रार घिऊन ठाण्यात आल्याला माणूस त्याची तक्रार नोंद करून घ्यायची, काही गंभीर विषय आसला तर वरिष्ठांना त्याची माहिती दयायची. दाखल करून घेटलेल्या गुन्ह्याचा तपास त्या त्या भागातल्या पोलिसांच्याकड देणं. आणि साऱ्यात महत्वाचं पोलीस ठाण शांत ठेवण.

हा माणूस पोलीस ठाण नुसतं शांतच ठेवत न्हाय तर बऱ्याच लोकांच्या तक्रारी त्यांना समजून सांगून मिटवतोय. भावा भावातल वाद , पती पत्नीच्या तक्रारी व तुटाय आल्याला बरच संसार या माणसानं लोकासनी कायदा समजावून सांगत त्याच फायदे तोट सांगत ठाणे अंमलदारच्या खोलीत बसून गुन्ह मिटवल्यात. गुन्ह नोंदवून मानसासनी पोलीस स्टेशन, कोर्टाच्या वाऱ्या घालण्यापासन ह्यो माणूस परावृत्त करत तंटामुक्ती करतोय. मिबी माणूस हाय , पोलीस म्हणून या खुर्चीव बसलू तरी मलाही मन हाय. कुठलाच माणूस वाईट किंवा गुन्हेगार नसतो. तर त्याच्या भोवती आसणार वातावरण व परिस्थिती त्या माणसावर क्राईम करण्यास प्रवृत्त करते आस ते म्हणतात.

पोलीस ठाण्यात आल्यावर किंवा पोलिसांशी बोलताना सामान्य माणसाला आपलेपणा वाटला पायजी आस बोराडे दादा म्हणतात. सकाळी ९ वाजल्यापासन रात्री ९ वाजेपर्यंत किमान शे दीडशे माणसासनी ह्यो माणूस तोंड देतोय. एक दिवस सुट्टी सोडली तर कायम पोलीस ठाण्याच्या खुर्चीव तुमाला हाच माणूस दिसलं.

कसा ठेवत आसल मानसिक संतुलन व संयम काय माहीत. या कामाची सवय या माणसाला इतकी झाल्या की सुट्टी आसल तरीबी ध्येनात राहात न्हाय. निम्या रस्त्यातन आज सुट्टी हाय आस आठवल्याव परत घरला गेलाय. पोलिसांच्याकड बघण्याचा लोकांचा उद्देश चांगला न्हाय. काय आसतील बी नालायक पण प्रामाणिक काम करणाऱ्या बोराडे सारख्या असंख्य पोलिसांवर हयो अन्याय न्हाय का…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *