तमाशा बगायला:
तमाशा बगायला:
विनायक कदम:९६६५६५६७२३
डिशेम्बर म्हयना सुरू झाला की गावां गावातनी जत्रांची जुपी व्हायची. जत्रा म्हनलं की तमाशा आलाच की.(आता मी सांगतुय ही १० वर्षांपूर्वीच) पण तवा पोरांनी तमाशा बगायचा मजी नुसती बोंबाबोंब. तमाशाचं नुसतं नाव जरी काडलं तरी आंगाव पाल पडल्यागत मानसं करायची तमाशान पोरं बाद हुत्यात. त्यातल्या बाया चांगल्या नसत्यात, त्यातली मानस घान बोलत्याती, मग बायचा नाद लागतुय, प्रपंचाच वाटुळ हुतय. आसल्या चर्चा व्हायच्या. मला वाटायचं ह्या सुक्काळीच्यानी पिंजरा पिच्चर बगीटलावता का काय? थुरली मानस तर गाबड तमाशाला गेलं की बाद हुन सारं यिकून टाकतंय का काय आस त्यासनी वाटायचं.
तसं तवा आमीबी बोंबालभिक्यागत गावात हिंडत हुतू. काम घरातलं तेवड केलं तर केलं नायतर शाटमारी. घरातली नुसतं कुत्र्यागत बोलायची. हेज काय हुईल..? कडू बोंबलत फिरतंय मावा घुटका खात..? लोकाची पोरं बगा कूट निगाल्याती. पन्द्रा, ईस येका मांडच गडी. तोंडाव काय मिशी हुती वी तवा. साऱयांच्या घरातनी कोन सरळ बोलायची न्हायती. कुत्र्याला भाकरी गॉड टाकत आस्त्याली पन आमचं पोटाच हाल लय येगळ हुतं. आता पन्द्रा ईस गडी येका मांडच आसलं तरी आमच्यात तमाशा बगन्यावन दोन गट पडायचं. काय गड्यांच्याव सामाजिक दबाव आसायचा. कोन बगल, तमाशाला गेलाय म्हनलतर काय म्हनत्याली मानसं. आसल कायतर तेंच्या डोसक्यात याचं. ती तमाशाला याची न्हायत.
ती मग ऑर्केस्ट्रा आसला की बगाय जायाची. तवा काय मोबाईल बी तसं लय न्हवत. मग करमनुकीला आसलच की..? जत्रा आमच्या गावापासन जवळ म्हनलं तर चिचनी, सावर्ड, आरुड ही मुटी गावं. मग बाकीच्या बारक्या गावातनी बी तमाशा आसायचा त्यो आमी तर कवा सोडलायं वी. तमाशा उदया आसला तरी तेजी जुळणी आदल्या दिवशी लागायची. कवा जायाचं, कोन कोन,जायाचं, चालत जायाचं का सायकलीन जायाचं.? गोळा कूट व्हायचं, हितंन घरात कूट चाललायस म्हनून ईचारल तर थाप काय मारायची हितवर गच्च यंत्रणा लागायची. तवा मोटारसायकली बी लय न्हवत्या. सायकली हुत्या पन मानस येवस्थित वापरायची. कुनाला दयाची न्हायत.
आमी मग सायकल आसनाराला हुलीव घालायचू. छल की तमाशाला म्हनून. त्यो तयार झाला की तेज्यावन मग डबल ,टीबल बसून जायाचं. रस्ता चांगला लागला की येकाद्याला पळवायची कुरकुरी याची. येकादी सायकल कळाखाव आसली की कितीबी हाना आंतर वसरायच न्हाय. मागल्यानं पाय लावून लय न्याट लावलं तर चिन पडायची. चिन बसवताना हात डाम्बरागत काळ मिट व्हायचं. तवर पळवापळवीचा किडा जिरल्याला आसायचा. तमाशाचा ठिकान व टायमिंग जवळ यील तसं वाजाप वाली तयारी सुरू करायची. तेजा आवाज मैलावन याचा. आंग भरमायचं. पडल्याल्या चीनन जिरवल्याला किडा परत वळवालायचा. जाग्याव पुचलू की जरा फिरून तमासवाल्यांचं ट्याम्पू, मानस किती हायती, बाया किती हायत्या, गायक कोन हाय, गन गवळनीला कोन येनार हाय, भांडनाची काय परिस्थिती हाय, झाली तर पुलीस हायत का, मग पळायला रस्त कूट हायती, ही सारी पाहनी करूनच सायकली लागायच्या.
सायकली लावल्या की येक जागा हिरून सारी बसायची. लय फुड बी नाय आनी माग बी नाय. टायमिंग साडेनऊचं पन कवा टायमावनी तमाशा सुरू झालं न्हायत. खाली बसल्याल गडी शिट्ट्या मारून, हाळ्या दिऊन दमायचं पन बाय याची न्हाय. तवर यात्रा कमिटीच गडी पाच मिनटात कार्यक्रम सुरू होनार आहे. साऱ्यानी खाली बसा, आगावपना करनाऱ्यांसनी तडाकं बसत्याल आसा दम दयाची. शेंड्याव आल्यालं सारं. दम निगतुय वी. गावातल्या प्रतिष्ठित गड्यांचं नाराळ फुटोस्टर कसातर दम काडायची पोरं. नाराळ फुटलं की भकलं मानसात भिरकाटून दयायची. काय गडी आत्राळी झेलायचं. कार्यक्रम आपल्या गावात आलाय, तेला गालबोट लागलं आस कुनी काय करू नगा आस सांगत पंच स्टेजच्या बाजूला खुर्चीव टेकायचं.
सारं झालं की स्टेजवरली लाईट जायाची. निवेदक म्हनायचा चांगल्या कामाची सुरुवात गनेश पूजनांन व्हायची. मग गन गवळन सुरू व्हायची. आंधारातन येकापेक्षा येक देकन्यापान बाया पायात घुंगरू बांधून नौवारीत याच्या. तालासुरात वाजाप आनी घुंगराचा आवाज बगून आंग भरमायचं. काय नाचाय जुपी करायचं, काय गडी टावेल टुपी उडवायचं, बसल्याल गडी बाय बगायसाठी बगळ्यागत मान लांबवून आत्राळी व्हायचं. फुडल्यांचा धिंगाना बगून मागली धोतारवाली चिडायची. तुमच्या गांडी बगाय आलूय वी रं… आमी. रांडच्यानो खाली बसता का न्हाय..? नायतर माग व्हा म्हनत खडं फिकून मारायची. स्टेजवरला नाचनाऱ्यांचाच नाय तर खाली नाचनारयांचा बी कडावा व्हायचा. लाईटवाला मग मानसात कोन नाचतुय बगाय बाकशिरी मुटी लाईट लावायचा. सारी गप खाली त्वांड घालून भुई टोकरत बसायची. नाचल्यान नुसता उडल्याला धुरळा लायटीत लैच दिसायचा.
सोंगाड्या हासून हासून लोकासनी पालतं पाडायचा. मग गान्याचा कार्यक्रम मराठी, हिंदी गानी, लावन्या नुसता धुरळा उटायचा. तमाशाच्या कार्यक्रमात भांडन कवा होत आस्त्याल तर ती गान्याच्या कार्यक्रमाला. नाचताना पाय लागला, माज्या फुड का नाचायलायस. हेज्यागत ५०० कारन सांगून येकादयाला हानायचा. पन्नासभर पोरं येकाच्या आंगाव पडून तेला हुबाला मारं दयाची. यात्रा कमिटी ,पुलीस सोडवोस्तर त्यो आरदा कच्चा व्हायचा. मांनसातन तेला बाजूला न्हयायची. तवर बगनारी हातात पायतांन घिऊन रस्ता हुडकत आसायची. सारी उबा हुन ह्यो धिंगाना बगायची. ह्यात हाल व्हायचं माग बसल्याल्या म्हाताऱ्या मानसांचं. कळवंड लागल्याव ह्यासनी पाटकीरना उटाय येतंय वी.? पाय पसरून निवांत बसल्याल ही. ह्या धुमश्चक्रीत गाबडी तुडवून जायाची. म्हातारी आय भनीवन शिव्या दयायची.
पंधरा वीस मिनिट ह्यो धिंगाना सुरू आसायचा. मग यात्रा कमिटी गानी बंद करायची धमकी दयायची. मागन कोनतर म्हातारं म्हनायचं वग लावा वग कडूसनी मसत्य आल्यात. कोण कायबी बोलायचं. सारी शांत हुन परत चार गानी आयकायची आनी परत नाचायचा धिंगाना. गानी झाली की वग लागायचा. वगाला ठराविक म्हातारी, इजारवली मानस थांबायची. वग बगनारी आनी सादर करनारी ताक्तीची मानस आसायची. तमाशाचा खरा नादया वग बगिटल्याशिवाय जात नस्तुय. वग संपाय आडीच तीन वाजायचं. गारटा मरनाचा आसायचा. पोटात आग पडल्याली आसायची. बिड्याचा नाद आमच्यात काय जनासनी हुता. तेंच्या संग काड्याचीपिटी आसायची. वाटतं कुटतर जाळं करून शेकायचं. थंड जायाला बीडीचं झुरक मारायचं. मग काडाय आल्यालं कुनांचतर हारबरं कवळाबरं उपडायचं. बागातनी काडाय आल्याली द्राक्षी हातांनच वरबाडून खायाला घ्यायची. मक्याची कन्स, गाजरं काय घावलं ती हूदडायचं.
तमाशा बगून चेकाळल्याल गडी नुसत्या वाटनी आनी परत दोन दिवस साऱ्या चर्चा तमाशाच्याचं की.? घराकडं जायाला तीन साडेतीन वाजायचं. मानसाची वळक लागत न्हाय तवर कुत्री आरडत यिउन झोपल्याली सारी वस्ती जागी करायची. घरातल्यासनी कळुनी म्हनून हातरुन घराच्या भायर झोपाय टाकून जायाचं. आलं की हातरूनात घुसल्याव लगीच काय डोळं झाकत्यात वी. कानातलं घुमत आसल्यालं वाजाप आनी गारटा हेंन तासभर तसाच जायाचा. झोपा लागत्यात तवर कोंबडं वरडायचं. उटाय लवकर लागायचं. नायतर लय बूलून घ्याय लागायचं. दिवसभर रानात काम करताना डोळं तारवाटून जायाचं. डुलक्या लागायच्या. त्या जागरनात बी सुख हुतं. घरापासन तीस चाळीस किलोमीटर सायकल वरन थंडीत तमाशा बगाय लांब लांब गिलू. पन तमाशा कलेन कुनाला बाद केलं नाय. आता सारं मोबाईलवर येतंय. सायकली गेल्या मोटारसायकली आल्यात. गारट्यात तमाशा बगाय जानांरं गडी आता कमी झाल्यातं. पन आताचं तरनं गडी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाव उड्या घेत्यातं…?
जबरदस्त….हे चित्र आता हळूहळू कमी दिसू लागलंय पण विनायकराव या मध्ये जिवंतपणा दिसला
कमी अधिक प्रमाणात हे सगळ्यांनी अनुभवलेलं आहे त्यामुळे जुन्या आठवणी जाग्या झाल्या… खूप छान पद्धतीने लेखन शब्दबद्ध केले आहे…. ग्रेट 👌👌