ताक करायची ‘रवी’:
ताक करायची ‘रवी’:
विनायक कदम:९६६५६५६७२३
पूर्वीच्या काळी गावाकडं घरा घरातन दह्या दुधाचा महापूर हुता. मी यिकायच्या अर्थानं म्हनत न्हाय खायाच्या बाबतीत म्हनतुय. परतेकाच्या दारात चेष्टवारी पाच सा जनावर आसायची. गाय गुरानी गोटं भरल्याल आसायचं. चाऱ्यासाठी गया गुरांचं हांबारन, पानी, शान,घान, माजाव कधी आल्या?, कुटल्या रेड्याकड न्हयाची?, मस गाब कुठली हाय?, कितवा म्हयना हाय?, बोडाय आल्या, गाबाडली, उलटली, रेड्याकड कवा न्हेलती?, दूध किती दित्या?, फ्याट किती हाय?, तिज्या खोड्या, तिज्या दुधाला साय किती इत्या? आनी लूणी किती निगतय ही त्या जनावरातनी जनावर झाल्याला मानसाला हेळव्यागत तोंडपाठ आसायचं. मुबलक वैरन आनी हिंडाय चराऊ रान जनावरासनी आसायची. जनावर मनसोक्त खाऊन डिरकायची. सकाळी हिंडाय गेल्याली जनावरं सांच्याला घराकडं जाताना तेंच पाय उचलायच न्हायत येवडा चारा पोटात घिऊन घराकडं परतायची.
वाटत वड्याला पोटात जागा शिल्लक आसल तेवड पानी प्याची आनी पाच पन्नास फूट मुतत वाट चालायची. घराकडं जाताना गुर दमवत नसत्यात.निटघोल घराकडं जात्यात. म्हनून मागला गुराकी बी निवांत. मग जळान घी, शान उचल, बाय आसल तर राच्याला कोरड्याश्याला कायतर घी, वाळल्याल्या शेणाच्या पावट्याच झाल्याल शिंनकुट घिऊन वाट धरायची. त्यात नवी येल्याली तांनपी मस आसल तर काय ईचारु नका. रेडकासाठी ती रस्त्यातनच टोंगाळा करत्या. दिसभर मोकळा पडल्याला गोटा भरून जायाचा. रेडक प्याला दाव्यासनी हिसक मारायची. आनी घरातली कारभारीन भरड्याची पाटी, कासांडी , पत्र्याची किटली घिऊन याची. रेडाक कासला लावलं की मस पान्याव घालायची, दुधान भरल्याली थान तटतटीत व्हायची. मग मालकीन सार सार धार पिळायची. आकरी दुधाव पांढरा फेस निरम्याच्या फेसागत याचा. डीचकीत तट तट आसा त्या फेसाचा आवाज याचा.
रेडकाला तेज वय बगून किती थान दूध सोडायच ही गणित हुतं. भरल्याली कासांडी, तानप्या नायतर दुधाच्या दोन, तीन मशी तरी दावनीला आसायच्या. किटली भरून दूध घरात याच. सकाळी गवळ्याला घाटलं तर संध्याकाळी सार घरात ठेवत हुती. निगाल्याल आकरी दूध बिन पानी घालता भल्या मोट्या भगूल्यात तापवायसाठी वतायचं. ती तापवायसाठी ढनाका जाळं लावायचा.
रानातंन दमून भागून आल्याली मानसं जेवाय पालत पडायची. थाळ भरून चुलीव चांगलं लालभडक तापल्याल दूध भाकऱ्या कुस्करून हानायची. गडी, बायका, पोर, मुबलक खायाची. कुत्र्या मांजरासनी आता मानसं खात्यात तेवढं दूध त्याकाळी मानसं घालायची. संध्याकाळच भांडी घासून यिपर्यंत दूध खरपूस हुन त्याव भाकरीगत जाड शाय याची. मग मुरवान लावायला घ्याच. मुरवान ही परतेक घरात रोज बायका जपून ठेवायच्या. कुणाचं मोडलं आसल तर दिवस मावळायच्या आत ते कुणाच्यातन तर मागून आणाय लागायचं. आंधार पडला की माणसं मुरवान देत न्हवती. मुरवान मोडलं की सासवा सुनांची पच्ची करायच्या. मोठाल्या गाडग्यात नायतर डेऱ्यात मुरवान टाकून धय लावायचं. सकाळच घटमुट धय व तेज कवड्या दिसायच्या.
आताच्यागत मिक्सर तवा न्हवत्या. लाकडाच्या देकन्या रव्या त्याकाळी सुतार करायचं. त्याव नक्षी आनी मोट्या रवीला दुरी बांदाय गोल खाचा पाडायच्या. रवी छपराच्या मेडक्याला नायतर खांबाला बांधून ती गानी म्हनत ताला सुरात वडत ताक बायका करायच्या. धय कमी आसल तर हातान रवी फिरवून ताक केलं जायाचं. आर्ध्या तासात लोन्याचा मोटा थर त्या डेऱ्यात याचा. किलु दीड किलु लूनी याचं. आनी ताक पेनारा तर दारू पिऊन गुंगी आल्यागत पडायचा. सकाळी ९ वाजूपातूर लूणी काढायचा कार्यक्रम चालायचा. काढल्यालं लूनी तुळशीचं पानं टाकून कडवुन येका भांड्यात साटवलं जायाचं. आस्सल ओरिजनल व बिन भिसळीच ती तूप आसायचं. वरीसभर खायाला नायतर लिकी बाळी, बाळंतिनीला साटवलं जायाचं. काडल्याल ताक शेजा-पाजारी, भिकारी, दारात आल्याल्या परतेक मानसाला पॉट भरून दिल जायाचं. आता गावाकडं गोट्यातन मसर कमी झाली. जरशी गया आल्या. मशनीगत वरन घालायचं आनी खालन काढायचं. काडलं की दुसऱ्या मिनिटाला डिरीत. कुटलं खायाला आलंय?. आनी ती नुसत पांढर पानी. त्यात कायच न्हाय. लूनी, धय, ताक, तूप ,रवी ही सारचं गावाकडं बी गायब होत आलंय. आता बेकरीतन प्लास्टिक पिशवीतन धय आनी तूप गावातनी याय लागलंय. आनी रवी चं म्हणला तर आता मिक्सर आल्यात कशाला रवी लागत्या. येकादी हावसची बायंच कुटतर रवीन ताक घुसळत आसलं. आता रव्या मोडल्या नायतर त्या भिरडा किड्यांन खाल्ल्या. रवीवर येवढ रटाळ लिवायचं मजी आमच्यात रवी घावली…. म्हनलं जरा काढाव म्हनलं लूनी..
कदम साहेबांनी लिहिलेले लेख जुन्या आठवणींना उजाळा देतात सद्यस्थिती व जुन्या परंपरा आत्ताच्या पिढीला जागृत करण्याचं काम करतात त्यांच्या या लेखणीला मानाचा मुजरा
धन्यवाद दादा