३० वर्षे पंढरीची वारी करणारा … ‘ ताजुद्दीन तांबोळी..!’
गर्दीतला आवाज…..
३० वर्षे पंढरीची वारी करणारा … ‘ ताजुद्दीन तांबोळी..!’
विनायक कदम:९६६५६५६७२३
'खुजगाव'.... तासगाव-सावळज मार्गावरील लहानसं; पण अनेक कर्तृत्ववान लोकांची खाण असल्यालं गाव..! डोंगराएवढं कष्ट करणारा शेतकरी; पण पाण्यासाठी त्याची कायम फेसाटी..! सर्व जातीधर्माची माणसं अगदी गुण्यागोविंदानं राहणारी. गावाचं गावपण जपणारी. ग्रामीण भागात सकाळच्या पारी मंदिरांवर आणि मशिदींवर दोन्ही धर्माच्या प्रार्थना अगदी नित्यनेमाने सुरू आस्त्यात. कुठल्याही तक्रारीविना..!
'उठी श्रीरामा, पहाट झाली...' या भूपाळीसोबतच अनेक भजनं, भारुडं साखरझोपेतच, बांगडीवाल्या हिरालाल तांबोळीचा मुलगा 'ताजुद्दीन तांबोळी'च्या कानावर पडायची. वय अवघं १० वर्षाचं आणि नाद लागला भजनाचा..! गावातल्या भजनी मंडळाच्या तालमी बघायला ताजुद्दीन हजेरी लावाय लागला. त्या संगीताची, त्यातल्या आवाजाची त्याला गोडी लागली. कानाव आल्यालं ऐकता ऐकता, गळ्यातून सूर कधी निघालं? हे त्यालाच कळालं न्हाय. मग काय हे मुसलमानाचं पोरगं हिंदूंच्या भजनाला साथ देऊ लागलं..! भजनाच्या तालमी देवळात व्हायच्या. देवळानं आणि देवानंही आम्ही जशी हनुमानाची विचारली; तशी ताजुद्दीनची 'जात ' विचारली किंवा बघितली नाही.
हळूहळू दिवस सरकत हुतं. बांगडीवाल्या हिरालालच्या पोरानं आता चांगलाच ताल धरला हुता. त्याचा गोड गळा ऐकणाऱ्या प्रत्येकाला भक्तिरसात भिजवून टाकत हुता. भजनाला साथ-संगत करणारं पोरगं; भजन म्हणणारं प्रमुख पोरगं कधी झालं कुणालाच समजलं नाही. भावगीत, भजन, कीर्तन, सोंगी भजन, भारुड, हरिपाठ, काकडा, जे हाय न्हाय ते सगळं तोंडपाठ झालं.! 'हरिभक्त परायण सोंगी भजनी मंडळ, खूजगांव' हे सर्वात जुनं भजनी मंडळ पंचक्रोशीतच न्हवं; तर सांगली जिल्ह्यात जाळ काढत हुतं. १५ जणांची टीम, एकापेक्षा एक सरस कलाकार माणसं.! विरोधी गटाला भजनात भिडली; तर उजाडल्याशिवाय सोडत न्हवती. इतकी ताकतीची कला. मेंदूची साठवणूक क्षमता आजच्या आमच्या ३२ जीबीच्या मेमरीकार्ड पेक्षाही जास्त...!
भजनाच्या माध्यमातून नागठाणेचा श्रीकांत पाटील हा ताजुद्दीनचा जिगरी दोस्त झाला. अनेक नामांकित ठिकाणी कार्यक्रम करायची संधी मिळाली. त्याच्या आठवणी त्यांनी सांगितल्या. १९८५ ला मुंबईच्या रविंद्र नाट्य मंदिरात खूजगांवच्या मंडळाला भाग घेण्याची संधी मिळाली. सोंगी भजनाचा कार्यक्रम होता. प्रत्येकाला १५ मिनिटांचा कालावधी दिला होता. या सोंगी भजनात ताजुद्दीननं केलेली वाल्या कोळ्याची भूमिका फारच भाव खाऊन गेली. हुबेहूब वाल्या कोळी बघताना अनेकांच्या भितीचा थरकाप उडाला. १५ मिनिटांची २८ मिनिटं कधी झाली, आयोजकांनाही समजलं नाही. वाल्या कोळ्याच्या भूमिकेचं मोठं कौतुक झालं. मानसन्मान व प्रमाणपत्र मिळालं. राज्यभरात अनेक ठिकाणी या भजनी मंडळाचे कार्यक्रम झाले. भजनाचा नाद जपताना नागठाणच्या दोस्तासंगं वारीचा नाद लागला. श्रीकांतही भजनात ताकतीचा कलाकार. त्याला लांबलचक मिशा व ताजुद्दीनला लांबलचक दाढी..! जिल्ह्यात 'दाढी मिशीवाली जोड' या नावानं ते प्रसिद्ध होते. अनेक कार्यक्रमात या दोघांनी सांगितल्याशिवाय पान हालत न्हवतं.
३० वर्षांपूर्वी ताजुद्दीन व श्रीकांत यांची कसबे डिग्रजच्या दिंडीतून आषाढी वारीला सुरवात झाली. पांढरा शर्ट, पांढरी इजार, डोक्याला पांढरी टोपी, पायात साधी चप्पल, गळ्यात टाळ आणि तोंडात विठ्ठल नामाचा जप..! वारीत माणसं तोंडाकडं बघायची. 'जातीनं मुसलमान असणारा माणूस वारीत येतोय' याचं प्रत्येकाला नवल वाटत हुतं. अनेकजणांचा त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार.... "तुमी मुसलमान आसून वारीत कसं काय?" मग काय १० वर्षापासूनचा सगळा वृत्तांत त्यास्नी सांगावा लागायचा. चालत असल्यानं वारीला महिना-महिना घुमायचा. विठ्ठलाची भेट घेतल्यावर ताजुद्दीन धन्य व्हायचा. आषाढी, माघी व कार्तिकी या तिन्ही वाऱ्या वेगवेगळ्या लोकांसोबत..! कुठल्या हिंदूंनं कधी त्याला "आमच्या देवळात व वारीत येऊ नको." आसं म्हणलं न्हाय आणि मुसलमान मंडळींनीही त्याला जाऊ नको,असा अटकाव केला न्हाय. जातीपातीच्या भिंती इथं कधीच आडव्या आल्या न्हाईत. जातीपातीचं नाव घेऊन राजकारण करणाऱ्या, विचारानं खुज्या व दोन्ही धर्माचे स्वयंघोषित ठेकेदार असणाऱ्या मंडळींना ताजुद्दीन मुस्काडात देत होता..!
ताजुद्दीनच्या मंडळातले फक्त ४ जणच आता उरलेत. सकाळी ५ ला उठलं की सायकलवरनं रोज वाघापूरला,नायतर गावात येडा मारायचा. जेवण, आराम आणि रात्री १० वाजता झोपायचं. कुठं भजन आसलं की रातभर गळा काढून आरडायचं. वय ७० पण गडी अगदी तरतरीत.! ताजुद्दीनच्या विठ्ठल भक्तीनं विवेकानंद वास्कर म्हाराजांनी मानाचा पांढरा ध्वज व केशरी उपरणं या मुसलमान माणसाला दिलंय. मी त्यांना म्हंटलं, "भय... वारी आजून किती दिवस करायची?" भयचं उत्तर..."झोपवतूयबी त्योच आन् उठवतुय बी त्योच.! हातपाय चालत्यात तवर करायची वारी." भयचं उत्तर ऐकताना त्यांच्या तोंडून 'विठ्ठल'च बोलतोय; आसं वाटाय लागलं.
हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्माचे, स्वतःला कट्टर म्हणवून घेणारे ठेकेदार सोशल मीडियावर फालतू मेसेज पसरवून जाती धर्मात तेढ निर्माण करतात. खरंतर ते कुठल्याच धर्माचे सच्चे पाईक असू शकत नाहीत. कुठलाच धर्म दुसऱ्याच्या धर्माचा अनादर करायला शिकवत नाही. निवडणुका येतील तसा जातीपातीचा धंदा तेजीत चालंल आणि हिंदू-मुस्लिम एकमेकांचं जीव घ्यायला उतावीळ होतील. ग्रामीण भागात मात्र अजूनही सर्व जातीधर्मांचा आदर केला जातो. पण अलीकडं सोशल मीडियाचं भूत ग्रामीण भागातलंबी वातावरण प्रदूषित कराय लागलंय. आमच्या आलीकडच्या पोरांना सोशल मिडीयावरचाच धर्म कळतो; मात्र वास्तवातला माणुसकीचा धर्म समजत न्हाय, हे आपल्या सगळ्यांचंच दुर्दैव.!
सोमवारी रात्री सातलाच भयला शोधायला तौफिक मास्तर व सौरभ करोडे संग खुजगांवचा रस्ता धरला. भय घरात न्हवते. गावात पारावर चिंचेच्या झाडाखाली बसल्याचं समजलं. शांत ठिकाणी बसावं म्हणून गाडीवरन आम्ही भयला गावातल्या हायस्कूलच्या स्टेजवर बसवून माहिती घेतली. तासभर विठ्ठलच भेटल्याचं जाणवलं.! म्हणलं..." भय... आमाला ऐकवा की कायतरी.!"
आणि गोड आवाजात त्यांनी म्हणायला सुरवात केली.
‘प्रभू’ हा खेळ दुनियेचा, कशाला सांग केलासी..?
पहिला राहतो माडीत, नि दुसरा राहतो झोपडीत
तिसरा आहे ‘वनवासी’,कशाला सांग केलासी..?
पहिला खातो तूपरोटी, नि दुसरा खातो भाजीभाकरी
तिसरा आहे ‘उपवासी’, कशाला सांग केलासी..?
‘प्रभू’ हा खेळ दुनियेचा, कशाला सांग केलासी…?
त्या आवाजानं शाळंतला अंधार कापल्यासारखं वाटाय लागलं. त्या अंधारातच भयचा फोटो घेतला आणि त्यांना घरात सोडलं.
भयचं घर बघितलं आणि ‘प्रभू हा खेळ दुनियेचा….’ हे कडवं माझ्याच काळजात घुसलं..! शासन कलाकारांना मानधन देतंय. मात्र मातीतल्या या अस्सल माणसाला आजवर त्यातला रुपाया सुद्धा मिळाला न्हाय. अशा लोकांकडं कुणीच ध्यान देत न्हाय. ‘आभाळाएवढं कर्तृत्व..!’ कुणी दखल न्हाय घितली तर मातीमोल हून जाईल. “कलाकार मानधनाचा प्रस्ताव करुन देतो.” आसं सांगत गाडी सुरू केली. बोचऱ्या थंडीचा जोर वाढला हुता. थंडी आणि अंधाराला कापत आमची गाडी लोढ्याच्या दिशेनं धावत हुती…!
खूपच छान विनायक भाऊ
तुमचा हाच प्रतिसाद मला प्रेरणा देतो.
धन्यवाद दादा