तासगावच्या आर्वेंच्या द्राक्ष अभ्यासाची दखल पंतप्रधान इंदिरा गांधीनी घितल्या
तासगावच्या आर्वेंच्या द्राक्ष अभ्यासाची दखल पंतप्रधान इंदिरा गांधीनी घितल्या
विनायक कदम: ९६६५६५६७२३
भारत दरवर्षी द्राक्ष आनी बेदान्याची जगभरात हजारो कोटींची निर्यात करतोय. द्राक्ष व बेदाणा शेतीन करोडो लोकासनी रोजगार, या मातीला नावलौकिक मिळवून दिलाय. भारतात द्राक्षशेती व बेदाणा यांचा इतिहास जेंव्हा कधी लिहला जाईल तेंव्हा तासगावच्या आर्वे कुटुंबाशिवाय हा इतिहास लिहता येणार नाय. या कुटुंबानं द्राक्ष व बेदाण्यावर प्रयोग, विविध संशोधन, द्राक्षाच्या जाती, औषध ते तंत्रज्ञान शोधायला आपलं आयुष्य घालवलय. आर्वेंच्या द्राक्ष अभ्यासाची दखल खुद्द पंतप्रधान इंदिरा गांधीनी घेतलीवती. या कुटुंबाची तिसरी पिढी द्राक्ष क्षेत्रात प्रयोग करत्या. द्राक्ष व बेदाणा उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांपासून त्याव जगणाऱ्या, ती खाणाऱ्या साऱ्यासनी तासगावच्या आर्वेंचा इतिहास, द्राक्षशेतीव त्यांचं योगदान म्हायत पायजी.
सांगली जिल्ह्यातल्या तासगाव तालुक्यातलं बोरगाव मजी ऊस पट्टा. या गावात महादेव मळ्यात आर्वे कुटुंबाचं ३० एकर क्षेत्र हाय. मनोहर उर्फ वसंतराव आर्वे, पांडुरंग आर्वे, तुकाराम आर्वे, सुभाष आर्वे व नंदकुमार आर्वे पाच जण भाऊ. वसंतराव व सुभाषरावांना शितीचा दांडगा नाद. त्यातनच दोगांनी कृषी च्या पदव्या घेटल्या. दुष्काळ व नैसर्गिक संकट पचवणाऱ्या वसंतराव या जिद्दी माणसाने १९६५ला फळबाग प्रयोग म्हणून पहिली द्राक्षबागा लावली. माळा पद्धतीचा मंडप हुता. थॉमसन जातीच्या द्राक्ष बागेत त्यांचे प्रयोग सुरू झाले. द्राक्ष तसं नवीन पीक माहिती जास्त न्हवती. पण बागेत एक वेगळं झाड तेंच्या नजरेस पडलं. त्यांनी त्यांच्या काड्या काडून रोप तयार किली. १९७८ ला ती झाड सापडलं. मात्र १९७८ ते १९८४ पर्यंत तेज्यावर वसंतराव व शास्त्रज्ञ अभ्यास करत होते.
१९८५ ला तास ए गणेश या नवीन जातीच्या वाणाचा शोध वसंतराव आर्वेनी लावला. या वाणाच नाव तासगाव व तासगावचा गणपती यावरून ठेवण्यात आलं. थॉमसन पेक्षा तेजी साईज, वजन, शायनिंग व द्राक्ष, बेदाणा यासाठी ही जात चांगली असल्याचे द्राक्षगुरु सुभाष आर्वे नी सांगितले. १९८३ ला वसंतराव अमेरिकेला अभ्यासासाठी गेले. अमेरिकेत मोठ्या प्रमाणात द्राक्ष शेती होती. तिथे सात महिने राहून त्यांनी अभ्यास केला. येताना त्यांनी रेडग्लोब, सेंटिनेल या जाती भारतात आणल्या. बागचा मांडव कुठल्या प्रकारचा हाय ईचारल्यावर द्राक्षबाग शेतकरी सांगतुय टी, वाय, डब्ल्यू आकाराचा हाय. ह्यो मांडव व ही कृपा आर्वेंचीच हाय. अमेरिकेतून अभ्यासून त्यांनी ह्या पद्धती व प्रयोग स्वतःच्या शेतात सुरू केले.
त्यांच्या कामाची दखल देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधींनी घेतली. १९८६ ला त्यांना राष्ट्रीय हार्टीकल्चर बोर्डाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड केली. देशात ठिबक सिंचन व द्राक्षाच्या क्रेट खरेदीसाठी तुम्हाला जी सबसिडी आज सबसिडी मिळत्या ती वसंतरावांनी सुरू केल्या. १९९१ ला त्यांना ऑल इंडिया ग्रेप फेडरेशनचे अध्यक्ष झाले. १९८३ ते १९८७ सिमेंटची कमतरता होती. प्रयोग ,अभ्यास यासाठी देशभरातून माणसं यायची. त्यासनी राहायची सोय करणं गरजेचं होतं. चुन्याने केलेल्या बांधकामाच्या त्या खोल्या आजही सुस्थितीत हायत. व ते चुना मळायचं मशीन अजूनही आर्वेंच्या बागत हाय.
वसंतराव आर्वेंच्या द्राक्ष अभ्यासाची दखल राज्यासह देशांन घेतली. विविध शेतकरी,अभ्यासक, नामवंत नेते त्यांची बाग बगाय यायचे. आर्व्हे मजी द्राक्ष शेतीतला ब्रॅन्ड झाला. त्यांनी सांगितलेलं, अभ्यासलेलं फायनल म्हणून संमती मिळायची. यामुळच तासगावसह हळूहळू राज्यातल्या विविध भागात द्राक्षाच क्षेत्र वाढाय लागलं. द्राक्ष भारताच्या
बाजारपेठेत चांगली विकली जाय लागली. पण द्राक्षांवर आजून काय करता यील ह्यो प्रश्न हुता. वसंतरावांचे बंधू सुभाषराव आर्वे राहुरी विद्यापीठात एम एस सी एग्री शिकत हुते. विद्यापीठात त्यांनी अभ्यासासाठी बेदाणा विषय निवडला. घरच्याच द्राक्ष बागेत त्यांच्या टीमसह त्यांचा अभ्यास सुरू झाला. त्यावेळी भारतात कुठंही बेदाणा न्हवता. १९७५ ते १९७८ चार वर्षाच्या त्यांच्या प्रयोगाला यश आलं.
काठ्या मारून शेड उभारलं. निळ्या जाळ्या पसरून तेज्याव थॉमसन जातीची द्राक्ष टाकली. ती टाकताना ती सोडा व गरम पाणी यातून बुडवून काडली. हा प्रयोग उन्हाळ्यात सुरू हुता. ऊन कडाक्याच आसल्यान आठ ते दहा दिवसात ही द्राक्ष वाळली. तेला गंधकाची धुरी दिऊन १९८० ला भारतातला पहिला पिवळा ५० किलो बेदाणा तासगाव तालुक्यातल्या बोरगावात तयार झाला. बेदाण्याचा भारतातला प्रयोग सक्सेस झाला. पण तयार झाल्याल्या बेदाणा लय दिवस टिकायचा नाय. त्यात कीड पडायचं. त्यो थंड ठिकाणी ठेवाय लागायचा. त्यातूनच कोल्ड स्टोरेजचा जन्म झाला. आज तासगावसह सांगली जिल्ह्यास कमीत कमी १२० हुन अधिक बेदाणा स्टोरेज हायत. १९८० चा बेदाण्याचा जन्म १९९० पासून जास्त भरभराटीला आला. पिकवल्याला बेदाणा येपारी जनावरांचा दर ठरवल्यागत हातावर रुमाल टाकून ठरवायचे. शेतकऱ्याला कळायचं नाय. येपारी म्हणलं त्योच दर देत असल्यानं नुकसान व्हायचं. यातूनच वसंतरावांनी स्व आर आर आबा यांच्या सहकार्यातून तासगावला बेदाण्याच खुल्या पद्धतीने सौदे काढायचं सुरू केलं. राज्य व देशभरातील व्यापारी बेदाणा खरेदीसाठी तासगावला याय लागले.
सुभाषराव महाराष्ट्राच्या द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष झाले. संघामार्फत त्यांनी शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाची औषधे व खते अल्प किमतीत देण्याचे, शेतकऱ्यांना एक्स्पोर्ट, नवी माहिती व हवामान तंत्रज्ञान देने यासाठी बैठका सुरू झाल्या. पुण्याला द्राक्ष संशोधन केंद्र सुरू झाले. स्टोरेज नंतर शास्त्रज्ञानी बेदाणा मळणी मशीन साठी काम केले. आर्वेंची तिसरी पिढी आता द्राक्ष संशोधनात हाय. सागर आर्वे सॉफटवेअर इंजिनियर हाय. सागर सांगत हुता आता त्यांची ३०एकर बोरगावात व १३० एकर द्राक्षबाग पंढरपूरला हाय. तास गणेश, रेडग्लोब, माणिक चमन, सुपर सोनाका,जंबो सीडलेस या त्यांच्याकड प्रमुख जाती हायत. यासह द्राक्षाच्या विविध प्रकारच्या ५० जातींची चार ,चार झाड त्यांच्याकडं अभ्यासासाठी हायत. तेंच्या शेतात प्रयोग बगाय राज्यातील व भारतातील अभ्यासक,औषध कंपन्या येत्यात. पण पाण्याची त्यांची आटोम्याटीक यंत्रणा बगायला पीटर व मार्टिन परदेशी हे दोन परदेशी अभ्यासक आलते. द्राक्षबागेच्या दोन ओळींमध्ये जमिनीतून ड्रीप मधून पाणी देऊन उत्पादन वाढीसाठी काय फरक पडतो यावर अभ्यास सुरुय. सेन्सरद्वारे तो हवामान अभ्यास करतोय. द्राक्षबाग मंडप उभारणीसाठी लोखंड महाग झालंय. पण २५ वर्ष आयुर्मान असलेल्या बांबूचा तो मंडप उभारून प्रयोग सुरुय.
आर्वेंच ७४ जणांचं कुटुंब अजूनही एकत्र राहतंय हे विशेष हाय. द्राक्षशेतीबरोबर कुटुंबातला राहुल आर्वे टॉपचा स्त्रीरोग तज्ञ हाय. साऱ्यांच्या जबाबदाऱ्या सर्वांनी वाटून घेत काम सुरुय. जगात द्राक्ष उत्पादन व निर्यातीत भारत पयल्या नंबरवर हाय. भारतात १ लाख ४५ हजार हेकटर क्षेत्रावर द्राक्षबाग हाय. हजारो कोटींची द्राक्ष व बेदाणा निर्यात भारत करतोय. लाखो ,करोडो लोकांना रोजगार मिळालाय. पण भारतातल्या द्राक्ष व बेदाण्याचा इतिहास जवा लिहला जाईल तवा तो तासगावच्या आर्वे कुटुंबाशिवाय पूर्ण होणार नाय. आपलं आयुष्य खपवून द्राक्ष व बेदाण्याला सोन्याचं दिवस आनणाऱ्या आर्वेंचा इतिहास नव्या पिढीला कूट म्हायती हाय. द्राक्षपंढरी म्हणून तासगावची ओळख हाय. पण ही पंढरी वसवणाऱ्या पांडुरंगाचा आमाला विसर पडलाय.
आर्वे यांच्या ऐतिहासिक कामगिरीला उजाळा दिला, हे खूप महत्वाचे आहे. असा इतिहास नव्या पिढीसमोर येत राहणे आवश्यक आहे. धन्यवाद.
मनापासून धन्यवाद सर