तालीम:
तालीम:
विनायक कदम: ९६६५६५६७२३
ह्यो शिट्टी वाजवायचा फड न्हवं…? फड लै आस्त्यात. तमाशाचा फड, उसाचा फड, वारकऱ्यांचा फड आनी कुस्तीचा फड. कुस्ती मजी मर्दमुकी, कुस्ती मजी पुरुषार्थ… ही हामालाच पोरगं हाय… बा हामाली करायचा पोरगं नामांकित पैलवान झालंय. नायतर आमच्या पोरांच्या मांड्या मजी कुळवाच्या दांड्या. हायत्या का न्हायत्या ही बी कळत न्हाय. कुस्ती निवेदक शंकर आण्णा पुजारी यांचं आसल कानाव आल्याव राग याचा. म्हनलं करूया कुस्त्या आपुनबी. मग धा वर्षांपूर्वी आमच्या गावातली तालीम आमी व्यायामासाठी धरली.
तशी तालीम जुन्यातली. ठोंबऱ्याचा रंगाप्पा, भाव्या आनी दोनचार गंमत म्हनून येनारी पोर सुडली तर तालीम कायम नवा पैलवान कोन यितुय वाट बगत बसायची. कोन जात न्हवत. कोष्टयाच्या जाळ्या, साप ,बेडक, फुटल्याल्या फरशा, त्यात लाईट न्हाय. माती कवा न उकरल्यानं घट्ट झाल्याली. उनाळच दिवस हुतं. रानातनी बी काय काम न्हवती. आनी त्यात बोंबालभीक्या धा बारा जनांचं टोळकं. कचऱ्याच पितम्या, ठोंबऱ्याच भाव्या, भय्या, घुटूगडयाच आज्या, तळ्यातल सुरश्या, कदमाच यिन्या, इप्या, बाल्या, निकमाच संदया, तळ्यातल यिन्या सार उंडगाळ गडी… मजी त्या आर्थानं न्हवं, कुनाच्यातर खोड्या, कळवंडी, दात काडायच गावात बसून. हेंची तोंड बगितली की मानसांच्या डोसक्याची शीर उटायची. उनाच गारवा धराय पान्याच्या टाकीखाली दिवसभर बसायचा आमचा आड्डा हुता.
गावातल्या तातू आबाचा आमच्याव लय डोळा. पिचीक पिचीक थुकत हाताची गोपनमिठी बांधून धोतरावला तातूआबा आमच्या जवळ याचा. पोरानु काय काम न्हाय वी तुमाला. गाबडीबी लय कडू. म्हनायची हाय पन करायचं कुनी..? आनी ख्या ख्या दात काढायची. कडू वाईट वाईट म्हनत आबा रस्ता धरायचा . तंबाखू, घुटका, मावा खानार गडी तालमीत शड्डू ठोकनार हुतं. तालीम डोसक्यात बसलीवती. बंद तालीम घान काडून चकाचककिली. तालमीला जुपी झाली. बापजलमात कवा व्यायामाची सव न्हवती. रंगाप्पाच भाव्या तवा रटात हुतं. लय ठिकानी कुस्त्या मारायचं. व्यायाम ईचपाट करायचं. भाव्या सांगल त्यो व्यायाम कराय आमी जुपी किली.
भाव्या लंगुटा लाऊन आनी आमी बन्याल घालून प्यांट मुरगाळून व्यायाम. ते बी करंट यायसाठी तंबाकू खाऊन. फुटल्याल्या फर्ष्याखाली तम्बाकूच्या पुड्या. भाव्या बैटका अंगातन पानी पडूसतर मारायचा. पयल्या दिवशी केल्याल्या व्यायामान दुसऱ्या दिवशी उटाय ईना. पन व्यायाम करायचा म्हनलं. येक दिवस रंगाप्पा भायर न आलं. आनी खाड खाड दार उगडा म्हनून दार वडाय लागलं. आमची पाचाव धारन बसली. रंगाप्पाचा तवा लय सम्पर्क न्हवता. पल्लदार उंची आनी धिप्पाड रंगाप्पा व्हिलन गत वाटायचा. लय शिव्या दयायचा. हासायचा न्हाय. गंभीर आसायचा. भाव्या न दार उगाडल. आप्पा आत आल.
कोन कोन हायती गाबडी म्हनत नजर मारली. तुमच्या आयचा… प्यांटा घालून व्यायाम करत्याती वी रे आयघाल्यानो म्हनत शिव्या दयाय लागलं. मला म्हनला ये गाबड्या चांगला व्यायाम कर भरलास तर कसला दिसशील. होय होय म्हनत येळ मारून न्हयायचो. आप्पा बसून भाव्या आनी आमचा बी व्यायाम करून घ्याच. मातीत कुस्त्या लावायचं. कोन कायतर येगळच कराय लागलं तर आप्पा आय भनीवन शिव्या दयाच. परत परत आप्पा आलं की आमी व्यायाम बास करायचं. तालमीत पुस्तक वाचत बसाय चालू केलं. टीव्ही, डीव्हीडी आनी थेटर प्रिंट कॅशेट आनून उनाचं फुल्ल आवाज सुडून तामिळ पिच्चर लावायचं. बारकी पोर दाराच्या फटीतन बगायची. तवा टीव्ही लय न्हवत. मग वशीला लावत पोर आत घ्यायची. काम न्हवती तवा गमजा म्हनून व्यायाम केला. रानातली काम बागच्या छाटन्या सुरू झाल्याव कामाचा दट्या लागल्याव तालीम सुटली.
दोन दिसापूर्वी गावात तालमीफूड थांबलोवतो. तर आतन फुस्फुसायचा आवाज आला. आर आत कोण हाय. बगतुय तर बुध्या चा बंटी, निकमाचा सोन्या, वैभ्या, भय्या, सौऱ्या, आस चार पाच गडी मुसमुसाय लागलवत. आमची तालीम बंद झाल्यापसन कदी तालमीत जायाचा योग न्हाय आला. पण लोमकाळाय मी बांधल्याल जाम्बळीच लाकूड आजून खनखनीत हुतं. भारी वाटलं. गावागावातनी तालमी बंद पडल्या. पन गावात नव्या दमाच गडी व्यायाम करत्यात बगून बर वाटल. मन मिन्दू आनी मनगाटात बळ भरनाऱ्या तालमीकड आता पोर न जाता मोबाईल आनी पान टपरीवर रमत्यात. म्हशीच दूध डिरीला जातंय घरात कसा पैलवान व्हायचा. पैसा नसला तर चाललं पन शरीर संपत्ती चांगली पायजी आस पूर्वीची मानसं म्हनायची.
पैलवान वाल्याच्या नादाला लागताना मानस धा येळा ईचार करायची. गावात दबदबा आसायचा. आता पोरासनी पन्नास किलुच पोत उचलत न्हाय. जुन्यातली मासं शम्बर किलुच पोत पाटीला लाऊन पळायची. खाऊन पिऊन ,बिन रुगी, खनखनीत. कोरोनाच्या काळात लोकासनी तंदुरुस्त आसन व व्यायाम हेज म्हत्व पटलय. मानसं खुळ्यागत व्यायाम कराल्यात. व्यायाम करता करता तुमच्या गावातल्या जुन्या तालमी सुरू करता येत्यात का बगा की…