शिनकुटाचा हुडवा:
शिनकुटाचा हुडवा:
विनायक कदम:९६६५६५६७२३
येकत्र कुटुंबपद्धती, येळवर पाऊसपाणी, बक्कळ शिती, जिवडी गोट्यात जनावर , तिवडीच घरात पोर….बाळ. तवा ग्यास न्हवता, स्टो न्हवता, लायटीची शिगडी न्हवती, गोबर ग्यास न्हवता, राकील मोजकच मिळायचं. चुलीवरच धा…पंदरा खानाऱ्या तोंडाच्या भाकरी थापायच्या. झाड ढीगभर. त्यामुळं जळनाची काळजी न्हवती. कितीबी जळान जाळा.? जळनाला काय कमी न्हवती. आनी हाय म्हणून आताच्या लोकांगत सगळं जाळून फुढच्या पिडीच्या हातात कटोरा दयायची पद्धत जुन्या लोकांच्याकड न्हवती. जळान चांगलं, कटीन आसल तर बायला सयपाक भराभरा उरकायचा.नायतर फुलबाजागत जळनार आसल तर बायांच धुराडीत डोळ जायाचं, डोळ्यातन धुराच्या धारा लागायच्या तरीबी बाया धुराला मेचत न्हवत्या..पण जळनासंग शिंनकुट ग्रामीण भागात चुलीला, संसाराला हातभार लावायची.
ही शिंनकुट लाऊन तेजा हुडवा करायची पद्धत हुती. हुडवा पावसाळ्याच्या आगोदर तयार हुन वाळायला पायजी ह्या हिशोबान यंत्रणा लावली जायाची. दिवाळी आली आनी पाची पांडाव करायला सुरुवात किली की तितन शिंनकुट आनी हुडवा करायला गावाकडं बायका नादी लागायच्या. उनाळबर ही काम चालायचं. मानस कमी शिकली आसली तरी येवार, रितभात हुती. घरात कामाचं वाटप व्ह्यायच. जेला झेपल तीच काम दिल जायाचं. परतेकाच्या घरात येक बाय घर राकनीसाटी दळान, कांडान, शिवन, टिपन, पापड, भातुडया, सारवान, हेज्यासंग आल्या गेल्याला पावना, खळ्यावर वाळत घाटल्याल धान्य, कोंबड्याची पिल्ल, भिकारी, आकारी, बयतकरी, आनी नंतर ही काम आवरून शिंनकुट.
आंन खाऊन बाराच्या टोल्याला घरातला कोनतर गडी नायतर बाय गोट्यात जनावरांची बिरड फोडायची. मसर मुतत… शिंग हालवत माळाचा रस्ता धरायची. त्यात येकादी म्हस नायतर गयच्या पायाला खर यायची. ती पाय वडत… वडत साऱ्यांच्या मागंन चालायची. जनावर गिली की शेनाची पाटी घिऊन बाय तेंच्या पावटया गोळा करायची. शेनात बी लय तरा. काय जातींच श्यान नुसतं बिरबिरीत. हात घालून उचलोस्तर भुईला पडून मोकळं. आसल श्यान कलनचं भराय लागायचं. श्यान उचलाय मग पाटीत तळात चगाळ घालायचं. का?तर उचलल्यावर डोसक्यात पडाय नाय पायजी. तवा काय समृद्धीच्या प्लॅस्टिकच्या पाट्या हुत्यात वी. कळकाच्या नायतर निर्गुडीच्या फोकच्या पाट्या आसायच्या. पाटी लांब आसल तर दूनी हातानी पू भरायचा. आनी लांब ढेंगा करून पळत पाटी पातूर जायाचं. कायच शान मजी नुसतं गोलठेल. शिनकुट जाग्याव लावल्यागत भारी आसायचं. आनी बैलांची शेनाची पद्धत यिगळीच आसायची.
भरल्याली पाटी मग शिनकुट लावायच्या ठिकानावर न्यायची. ठिकान तस आडचणीतल आसायचं. कुनी जाऊ नये, चूरू नये, आनी म्हत्वाचं मजी कोंबड्या जाऊन इसकाटाय नगुत्या ह्यो ही डोसक्यात आसायचं. माती चिटकाय नगु म्हणून खाली टाकाय उसाचा पाला, नायतर बुस्काट आसायचं. जागा नसल तर आगोदर लावल्याली, वाळल्याळी शिंनकुट काडायची. आनी गावाकडची लोकगीत म्हणत थापटया घालायचं काम आनंदान चालायचं. वाळल्याळी ही शिंनकुट येक करून तेजा हुडवा करायचा. हुडवा पावसाळ्यात पाणी जाऊन भिजाय नगु आशा ठिकानी आसायचा. दगाड मांडून नायतर आडवी चार लाकड टाकून त्याव कडब्याच्या पेंढ्या, पटकार टाकून जागा करायची. गोलठेल पद्धतीन येकाव येक शिंनकुट रचत हुडव्याला बायका आकार दयायच्या.
दोनशे पासन येक हाजार शिंनकूटाचा हुडवा आसायचा. शिंनकुट रचून झाली की त्याला शेनान सारवून लेप दिला जायाचा. पावसाचं पानी आत जावयाला नगो ह्यो उद्देश त्यामान हुता. लय बारकाईन ही काम चालायचं. येकादया अद्भुत वास्तुकलेप्रमानच ही काम चालायचं. लिपल्याला हुडवा वाळला की काम संपायच. बायकासनी हायस वाटायचं. आता येवढ्यावर पावसाच पाच ते सा महिन आरामात निघत्यात आसा तेंचा अंदाज असायचा. पावसात जळान भिजल्याल आसायचं. पेटायच न्हाय म्हणून हुडवा. पाऊस रातभर पडायचा. चुलीत लालभडक झालेली शिंकुट घराला ऊब द्यायची. त्याव सयपाक व्हायचा. भाकरी ,कोरड्यास लवकर हुन तेला चव आसायची. त्यात येकादी बाळातीन बाय घरात आसल तर तिज्या शिगडीसाठी हुडवा मोटा करायचा.
बाळातीन व बाळाला धूर लागाय नगु म्हनून मग घराच्या भायर शिनकुट पेटवायची. लालभडक झाली की शिनकुट लोकांडाच्या पाटीत घालून खाटखाली थंडीच्या दिवसात ठेवायची. त्यात आयच्या मायेची ऊब हुती. बाळ..बाळतणीची गरगरीत झोप व्हायची. ग्यासच्या काळात आता हुडवा राहिला न्हाय. शेनात हात घालन तर लांब पोरींसनी आता शिती आनी शेतकरी नवराबी नकोय. पन शहरात राहून चुलीवरच मटन व भाकरी खायची तलप हुत्या. गांधीजींनी सांगिटलं खेड्याकड छला. आमी शहरात धावतोय. साऱ्यांच्या धावन्यान शहरांच आरोग्य बिघडलय. आता ग्रामीनता जपायला आमाला कमीपना वाटतोय ही दुर्दैव. गावातल्या संतोष पाटील या मित्राच्या घराफूड हुडवा दिसला आनी लिकानाची यिडीवाकडी शिंकुट त्यात रचली.