--------------------------------- ======================================

शिकारीला:

शिकारीला:

विनायक कदम:९६६५६५६७२३

धा,पन्द्रा वरसापूर्वी आमच्या रानात आनी आजूबाजूच्या रानातनी बी ऊस, हाब्रेट, घव, मका, जुंदळा, हाळदीच फड, सुर्यफुल, आसली ढीगभर पिकं. बागायती पिकांच्यामुळं साऱ्या रानातनी नुसती दडन हुती. मग ससं, लाव्ह, चितार, कुली,घोरपडी, रानडुकरं, मुंगस, ईजाट,सायाळ, तरुस, खोकाड, आसली ढीगभर जनावरं ह्या पिकातनी आपला संसार करायची. साऱ्या शिवारात खायाला मुबलक आसायचं. उसाला ऊस, मक्याला मका आशी पिकं बांदाला बांद ठासून साऱ्या रानातनी आसायची. मग मानस मटनासाठी सशाच्या, डुकराच्या, घोरपडीच्या,लाव्हार,चितारं हेंच्या शिकारी करायची.

शिकारं करायची मजी सोपं काम न्हाय. ती बी कलचं काम हाय. शिकार करू जानं सावरड्याच्या रामुशानीच. आमच्या घराच्या माग वडा. आनी पलीकडं सावरड्याच्या रामुशाची वस्ती. खाऊन पिऊन निवांत आसायचं गडी. शिकारीला दिवस बी ठरल्याल आसायचं. तवाबी आनी आताबी दिकनी कुत्री बगायची तर तेंच्याकडचं. घरटी दोन दोन कुत्री ओ. तेंचा पळं बगायचा तर सशाच्या मागं फट माळालाचं. कुत्र्यांच्यासंग वागर , वागर ऊबी राह्यला सताट बारीक मापाच्या काट्या, पिशवी त्यात जेवान, पान्याची बाटली(तवा दारूच्याच बाटल्या भरून पोरं प्याला पानी घ्यायची). धरल्याल ससं उलगडाय सूरी, ठेवाय पिशवी. टकुरी बराबर काट्या, कुत्री धराय दोऱ्या.

येवड्या साऱ्याची जुळवाजुळवं झाली की तंग जुळनी व्हायची. मग शिताराम आन्नाचा संबा, शिवा, सुबराव आन्नाचा ताना, उत्तम, पोपट आप्पाचा बाळू, म्हार्ती आन्नाचा आंक्या, उमाजी, रंगा मास्तर, सागर, राम आन्ना,सुबास आन्ना, आशोक आन्ना, शरद, तानाआन्ना, संदीप, निवास, भगवान, तुकाराम आसं धा ,पंदरा गडी शिकारीला निगायचं. पळं जमनारी हालाव, तरनी पोरं शिकारीची म्होरक्या आसायची पोक्त गडी मागं थांबून तरन्यासनी मार्गदर्शन करायची. कूटल्या रानात जास्त सशाचा वावर हाय ही नदार काय गड्यासनी सारी रानं फिरल्यामुळं आसायची. मग जुपी तितंन व्हायची.

वागर येका बाजूला लावायची. तीत दोन गडी काट्या घिऊन हुब राह्याचं. मग त्या उसाच्या फडाच्या भायर दोनशे फुटाव कुत्री घिऊन गडी फडाच्या दुनी बाजूला नदार दिऊन तयारीत आसायची. मानस ऊबी करून झाली की मग उरल्याल सताट गडी कुत्री उसात घालून उसात शिरायचं. हा….हा, आलं बग… गेलं बग, …आसल्या हाळ्या चालू व्हायच्या. हाळ्या दयायचं कारन ही हुतं की शिकारीचं जनावरं फूड वागरकडं जावावं. मागं थांबाय नाय पायजी. वाळल्याल उसाच पालं गडी फूड चालला की वाजायचं. पन हाळ्या कमी न्हवत्या. ह्या माहोलन आत घुसल्याली कुत्री बिथरायची. तोंडाला रगात लागूस्तर तेंचा जीव सुदीत नसायचा. नाकान हुंगत सारा फड पालता घालायची.

ही सारं कोयाळ उटल्याव भेदरल्याल ससं, बाकीची जनावरं पळून जाऊन त्या वागरत आडकायची. मग गडी वागरत जाऊन धरायचा. सुरीन सुलून सशाला रक्ताची आंगुळ घालायची. काय ससं बी तयारीच आस्त्यात. ह्यो फड सुडून बाजूच्या फडात शिरून पळ काडायचा. मग शिकारीचं गडी परत त्या फडाला वागर लाऊन कुत्री घिऊन आत शिरायचं. कदी कदी ससा लगीच घालवायचा. कवा कवा दांडगा पळ झाल्याशिवाय ससं घावायचं नाय. उनाळंच जरा लोकांची बागायत पीक कमी आसायची. दडंन कमी आसायची. ससं लवकर घावायचं. फडातन उटल्याला ससा मग मोकळ्या रानांनी दडाय पळायचा. माळाला पळत सुटल्याला ससा आनी हातभार जीभ भायर काडून हेला कवा धरतूय ह्या हिशेबानं भूलल्याली कुत्री बेभान हुन पळायची. जिवाच्या आकांतानं फूड पळनारा ससा दडाय कूट घावतय ही बगत बगत कुत्र्यासनी चकमा दयायचा.

पळून पळून कदी कदी कुत्री सशाच्या बोचाला चिटकायची पन ससा हुलकावनी दिऊन निस्टायचा. कुटंतर दगडाचा खिळा, झुडूप, येकादी पाईप, घुसाय घावल त्यात घुसायचा. हाताच्या आंतरावरली शिकार कूट गिली म्हनून कुत्री येरबाडायची. तितच हुंगत घुटमळायची. माग काडनारं गडी मग यिऊन दिशा बगायचं. कुत्रं कूट घुटमाळतय ती जागा काट्या आपटून चापचायचं. त्यात ससं आसल तर निगुन परत हुबाला पळ सुरू व्हायचा. आदीचं सशाच्या नादान येरबाडल्याली कुत्री सशाला तोंडात धरून चेलमडायची. शानी कुत्री ससं मारून पायात घिऊन बसायची. कुत्र्यांच्यासंग काट्या घिऊन दिवसभर हुबाला पळ व्हायचा. तवाच गडी आस सापतीच्या वादीगत लवचीक हुतं. जरा कमी कुत्र्यासंगच पळायचं. ससा उटला कुटन आनी दडतुय कूट हेज ध्यान ठेवाय लागायचं.

शिकारीला म्होरक्या आसनारं आनी बाजूला कुत्री धरून थांबल्याल गडी हेंची साऱ्याव शिकारीव नदार आसायची. ससा दुसऱ्या फडात पळाला की मग परत नव्यानं जुपी कराय लागायची. माग थांबल्याल पोक्त गडी मग वागर, काट्या सारं सामान घिऊन याचं. तवर फुडलं गडी ईसावा खायाचं. पानी प्यायचं, कुत्र्यासनी पाजायच. येकादा ससा मैलभर तानाय लागायचा. शिकारीच्या हाळयांनी सारं शिवार जाग व्हायचं. पीक मोडतंय म्हनून काय जन पिकात घुसून द्यायची न्हायत. पालं कापत भर उनात उसाचं फड चापचायचं मजी लय आवगड काम. दिवस येका बाजूला कलायचा.

पिशवीत चार पाच ससं, पारवं, चितार साठायचं. ती पिशवी कुनालाबी बगायची परवानगी नसायची. पन ही गडी आमचं शेजारीच. संध्याकाळी सारं मटन एकत्र करून शिजायचं. नायतर लय आसलं तर वाटं घालून घरात जुळनी आसायची. सुट्टीच मिबी हेंच्यासंग शिकारीला रानूमाळ बोंबलत फिरायचं. फिरून फिरून पायासनी कड याचा.

शिकारीला गेल्याव मग कोंबड्या न्हेनाऱ्या मुंगसांचा, इजाटांचा कोल्ह्यांचा बी बंदोबस्त व्हायचा. द्राक्षपट्ट्यात बागायती पिकांची संख्या कमी झाली. शिकारीला आता बंदी हाय. आनी आता म्हागाईचं जेचं तेला जगायचं फुरं झालंय आनी आता शिकार कायमची संपल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *