शालनच्या आयुष्याचाच तमाशा झालाय:
शालनच्या आयुष्याचाच तमाशा झालाय:
विनायक कदम:९६६५६५६७२३
कोरोना आला तसा तमाशा बंद झाला. दोन वर्षे झाली पोटासाठी तमाशा कलावंतासनी भिक मागायची येळ आल्या. फडावर कलावंत आसणाऱ्या या माणसासनी शेताभातातल काय येतंय. म्हनून मानसं कामाला सांगत न्हायत. ‘दोड’…’भिकारी’ म्हणून कोण उसन पासन बी आलीकडं देत न्हाय. कोरोनात कँसर च ऑपरेशन झालं. पोरग न्हाय, नवरा वारलाय, दोन पोरी, परिस्थितीच बेताचीच. ऑपरेशन कस तर केलं.पण जगायचं कसं या प्रश्नाचं उत्तर सापडना झालंय. आयुष्यभर कलेची सेवा केलेल्या शालन तिसंगीकर या तमाशाच्या फड मालकिणीच्या खऱ्या खुऱ्या आयुष्याचाच तमाशा झालाय.

सांगली जिल्ह्यातल्या कवठेमहांकाळ तालुक्यातल्या तिसंगीची ही शालन सध्या वय आसल ६० नायतर ६५. शाळा जुन्यातली १ ली. बा शंकरराव तिसंगीकराचा नावाजल्याला तमाशाचा फड हुता. आय, भनी, भाऊ, मिळून सारयांच घरचाच फड हुता. ढोलकी पासन नाचाय पर्यंत सारी काम साऱ्यासनीच याची. तवा तमाशा फडाची सुपारी ५०० रुपय आसायची. आजूबाजूच्या गावात तमाशा करायला जायाचं तर डोसक्यावन पेट्या न्ह्याय लागायच्या. ढोलकी, हालगी, तुणतुणे,टाळ, स्पीकर, माईक सार डोसक्यावन. कार्यक्रम लांब आसला तर मग बैलगाडीशिवाय पर्याय नसायचा. बाळकडू घरातच मिळत हुतं. वयाच्या १० व्या वर्षी पायात चाळ आलं.

शालनचा आवाज गोड हुता. रूपवान शालनची कला फडावर बगताना पब्लिक घायाळ व्हायचं. तवा तमाशा शिस्तबद्ध हुता. आताच्यागत नुसती पिच्चरची गाणी न्हवती. शंकररावांचा तमाशा राज्यात फेमस हुता. लोकं सन्मानानं सुपारी दयायची. शालनबाई कलेन राज्यात फड गाजवत हुती. तमाशातच काम करणाऱ्यासंग तिज लगीन ठरलं आणि बाप देवाघरी गेला. बापांन आयुष्यभर खपून उभा केल्याल्या फडाच आता काय व्हायचं.? साऱ्यासनी कोड पडलं. पण थोरली म्हणून फड आपुन मोडायचा न्हाय उबा करायचा. ती जिद्दीला पेटली. आजपातूर बऱ्याच फडाच मालक पूरुष हुतं. महिलेनं फड सांभाळणं सोपं काम न्हवत. त्यात फूड आसल्याल तमाशाच हुबलाक प्रेक्षक. त्यासनी आवरन, कार्यक्रम करणं, कलाकारांची जबाबदारी काम सोपं न्हवत.

पण शालन बाईनी बापाचा फड जिवंत ठेवायचा या जिद्दीन आल्याल्या असंख्य अडचणींवर मात किली. जवळच्याच एका गावात तमाशा हुता. तमाशात काम करायला काय कलावंत पोरी कोल्हापुरातन येणार हुत्याल. गावात फड पोचला. आठ वाजल, नऊ वाजल, दहा वाजल, आकरा वाजल तरी पोरी ईनात. पब्लिक पिसाळल. साऱ्या तमासगीरासानी कुंडून घाटलं. पब्लिकच्या फूड यात्रा कमिटीन हात टेकल. पोरीचं काय झालंय बगाय गावातन १ गाडी गिली. उजाडता उजाडता ती आली. गाडी मिळाली नसल्यानं सारा गोंधळ उडलावता. दुसऱ्या दिवशी तमाशा केला.
मुंबई, पुण्यापासन राज्याच्याच काय देशाच्या काना कोपऱ्यात कार्यक्रम केलं. फडाच कौतुक होत हुतं सुपाऱ्या येत हुत्या. बरं चाललं हुतं. २ वर्षापासुन कोरोना आणि लॉकडाउन मुळ तमाशा बंद झाला आणि राज्यातला किमान ७० ते ८० हजार तमाशाव जगणाऱ्या मंडळींची जगन्याची फेसाटी सुरू झाली. कोण रुपय ची मदत कराय तयार नाय. तमाशातल्या माणसांच हाल कुत्र खायना झालय.

कोरोनान आदी उपासमार त्यात मला कँसरच निदान झालं. पैस न्हायत कुणाला हात पसरायच. भायर लॉक डाउन. कुणाला सांगायचं. १० बाय १० च्या खुलीत एकटीच राहणारी मी. पोरासनी कळाल. तेंनी गाडी करून सांगली गाठली. तेंच्या जवळचा हाय नाय त्यो पैसा माझ्या दुखण्याव घाटला. छातीची एक बाजू काढली. मरणाच्या दारातन भायर आल्या. कलाकार मानधन ची पेन्शन चार महिने झाली आली न्हाय पण म्या कुनाफुड आजून हात पसरला न्हाय ही अभिमानान सांगताना तीज्या डोळ्यात पाणी आलं. मलाबी गलबलून आलं. १० बाय १० च्या कौलारू, गळक्या घरात एकटीच राहणाऱ्या शालन बाईच जगणं पुस्तकात न मावणार हाय. त्यासनी कुणाची भीक नगोय तर तमाशा सुरू व्हायची प्रतीक्षा हाय आयुष्यभर स्वाभिमानान जगलेल्या या फड मालकिणीच्या खऱ्याखुऱ्या आयुष्याचा तमाशा झालाय. पण तींन आजून झुंजण सोडलं न्हाय.
खूप भयाण वास्तवता आहे… तमाशा कलावंतांची…