चालता..बोलता ‘इतिहास’ मजी सावंत गुरुजी
चालता..बोलता ‘इतिहास’ मजी सावंत गुरुजी
विनायक कदम:९६६५६५६७२३
कचरेवाडी तासगाव तालुक्याचं शेवटच गाव. शांत, संयमी व गावचा सरपंच ४९ वर्ष गावच्या पारावर बसून ठरवणारं , कोकणातल्या डोंगर दऱ्यात जणू आलोय का ? आस गावच राहणीमान, आगदी भाषेसह. आमच्या गावात इतिहासाच्या पाऊलखुणा तोंडपाठ सांगणारा एक माणूस हाय अस संपादक दत्तकुमार खंडागळे व सराफ व्यावसायिक संतोष सूर्यवंशी यांच्याकडून समजलं.
उत्सुकतेपोटी कचरेवाडी गाठली. गावात शिरताना गावाच्या तोंडालाच उजव्या हाताला दुधाची डिरी व डाव्या हाताला हिरवंगार चिचच झाड. जिल्हा परिषद सदस्य प्रमोद आप्पा शेंडगे यांच्या फ़ंडातून आस नामकरण केलेल्या दोन लालभडक बाकड्यावर तीन माणसं पेपर वाचत हुती. धोतरवाल्या एकाला म्हणलं मामा, सावंत गुरजी कुठं राहत्यात. मीच सावंत गुर्जी. पांढऱ्या शुभ्र कपड्यात गुरुजी अगदी शिस्तीत बसले होते. मी म्हणलं गुर्जी जरा माहिती सांगा की तुमची आणि गुरुजींची स्टेनगंन धडाडू लागली.
माझं नाव पांडुरंग रामचंद्र सावंत. जन्म तारीख २ जानेवारी १९३१. वय ८९ वर्ष. १९४७ ला सातवी पास रयत शिक्षण संस्थेत. ११:८:१९४७ ला सोमवारी शाळेत शिक्षक म्हणून हजर झालो. शेडगेवाडी तालुका खटाव ही पहिली शाळा. १९४८ ला तिथंन हजारवाडी. १५:९:१९४८ तिथून जावळी यथे प्रतापगडाच्या पायथ्याशी दोन महिने नोकरी, तिथून कडेगाव जवळ बोंबाळेवाडी येथे एक महिना नोकरी.
जून १९५१ ते १९९३ आष्टा येथे रयत शिक्षण संस्थेचे ट्रेनिंग होते. १९५२ ला बेंदराच्या सणाला बैल पोळ्या दिवशी कर्मवीर भाऊराव पाटील व संस्थेतील ४९ शिक्षक व प्राध्यापक वर्ग आम्ही एका पंक्तीत जेवलो. तिथून सातारा येथे संस्थेच्या शाळेत हजर.११:११:१९५४ ला कुंभारी तालुका जत येथे चार वर्षे नोकरी. तिथून पहिले मतदान १९५७ साली कुंभारी येथे केले. जतचे डफळे राजे त्यावेळी पहिल्यांदा उभे होते. स्वतंत्र पक्षातर्फे त्यांच्याविरुद्ध कळंन्द्रे आक्का उभी होती. राजेसाहेबांनी त्यावेळी प्रल्हाद केशव अत्रे यांची १९५७ ला जतला सभा घेतली होती. या सभेला मी प्रत्यक्ष हजर होतो.
२६:७:१९५८ ला कुंभारी येथून बदली सुलतानगादे येथे झाली. तेथे सहा वर्षे नोकरी. १४:७:१९६४ रोजी घोटी खुर्द तालुका खानापूर या माझ्या गावापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या गावात माझी बदली झाली. या गावात शिक्षक म्हणून मी २३ वर्षे नोकरी केली. १९६८ ला फक्त सातवीचा वर्ग एकट्याने शिकवला. व त्याचा शंभर टक्के निकाल लागल्याने मला त्या काळी १५ रुपये बक्षीस मिळाले होते. सांगलीच्या भावी नाट्यमंदिरात विलासराव शिंदे यांच्या हस्ते माझा सत्कार करण्यात आला होता. १:९:१९८६ ला हिवतड तालुका आटपाडी येथे हजर झालो. तिथे दहा महिने नोकरी केली. पुन्हा १२ जून १९८७ ला मांजर्डे तालुका तासगाव येथे तालुका मास्तर म्हणून काम केले.
मांजर्डे येथून घोटी खुर्द गावाने मला पुन्हा मागून घेतले. १९९० ला मी रिटायर झालो. गेली २९ वर्षे मी पेन्शन घेत आहे. दररोज मी साडेचार किलोमीटर चालतो. मोठ्या कुराडीन जळनही फोडतो. २५ डिसेंबरला विट्यात पेन्शनर लोकांची सभा झाली असताना त्यात मी पाच मिनिटे भाषण केले होते. शेडगेवाडी तालुका खटाव या ठिकाणी असताना महिन्यातून एकदा मी शेडगेवाडी ते कचरेवाडी असा पायी प्रवास करत होतो. असा पायी प्रवास मी दहा महिने करत नोकरी केली. सांगली जिल्ह्यात १९५२ ला पहिली एसटी आली.
हेळव्याच्या उताऱ्यावर आमच्या गावाचं नाव लिमगाव असे आहे. परंतु काही कारणाने या गावाचं नाव कचरेवाडी असे पडले. साडेचारशे वर्षांपूर्वी हे गाव वसलेले आहे. १९६९ साली माझ्या आईच प्रेत मिरजेहून घोटी बुद्रुकला आणलं गेलं. व तिथून रस्ता नसल्यानं कचरेवडीला ते दुसऱ्या दिवशी बैलगाडीतून आणले. छ. शिवाजी महाराज कधी जन्मले , शिवाजी महाराजांनी कुठे ,कधी, कशा स्वार्या केल्या. किती किल्ले जिंकले हे गुरुजींच्या अगदी तोंडपाठ.
महाराष्ट्रावर शंभर वर्षे मराठ्यांनी राज्य केलं. पेशव्यांनी शंभर वर्षे राज्य केले. मुसलमानांनी सहाशे वर्षे राज्य केले. इंग्रजांनी दीडशे वर्षे राज्य केले. अठराशे अठरा ला ब्रिटिशांचा युनियन जॅक शनिवार वाड्यावर फडकला. अठराशे दोन ला दुसऱ्या बाजीराव पेशव्याने तह केल्यानंतर इंग्रजी राज्य सुरू झाले. स्वातंत्र्याआधी लॉर्ड माऊंट बॅटन हा शेवटचा व्हाईस रॉय होता. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर राजगोपलाचारी, पहिले राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद, उपराष्ट्रपती राधाकृष्ण हे झाले. नेहरूंची कारकीर्द ते आज पर्यंत किती पंतप्रधान झाले. राष्ट्रपती किती झाले हे सर्व तोंडपाठ. आणीबाणी कधी लागली, पाकिस्तानशी युद्ध करून त्यांचा पराभव किती साली केला , गांधीजींची हत्या, इंदिराजींची हत्या, मंत्रिमंडळ, राजीव गांधीची हत्या, लंकेतला संघर्ष,
तासगाव तालुक्याची स्थापना, तासगाव चे पहिले आमदार जी डी बापू हे मंगसुळीचे होते. त्यांनी कुणाचा पराभव, किती मतांनी केला, त्यानंतर कोण आमदार झाले , पंचायत समिती सदस्य ते जिल्हा परिषद सदस्य या सर्वांची आकडेवारी ,नावे तोंडपाठ. गावातील लोकांच्या लग्नात लिहिलेल्या याद्या, साखरपुडा , लग्न, मृत्यू अगदी तारीख वार तोंडपाठ. गुरुजींच्या बरोबरचे सर्व मित्र आज वारलेत पण गुरुजी रोज चार किलोमीटर चालतात . बिन चष्मा वापरता पेपर वाचतात. गुरुजींना तीन मुली आहेत. मात्र मुलगी नसल्याचे दुःख त्यांनी बोलून दाखवलं. एवढ सार धेनात कसं राहत याचं त्यांनाही कळत न्हाय.
गुरुजींच्या वयापर्यंत ठणठणीत जगण आता मुश्किल हाय. स्मरणशक्तीच तर सोडूनच दया, ५ मिनीटापूर्वी कोण समोरन गेलं विचारलं तर आमच्या लक्षात रहात न्हाय. सर्व इतिहास पुस्तकातच वाचायला मिळत न्हाय?…. तो तासगाव तालुक्याच्या कचरेवाडीतही मिळतो चालत्या बोलत्या सावंत गुरुजींकड…