पडद्यामागचा नायक आनी खलनायक…. संज्या बकरा….!
पडद्यामागचा नायक आनी खलनायक….
संज्या बकरा….!
विनायक कदम:९६६५६५६७२३
शाळा म्हनलं की जीव नकात यायचा, गुरुजीचा मार लै हुबाला.! नगु वाटायची शाळा. त्यापरीस मेंढरं राकायला बरं वाटायचं ..! त्या नादानं घरचा मेंढराचा कळप सुडून मांजर्ड्यातनं येका कळपातलं आडीच म्हयन्याचं पिल्लू आनलं. बाटलीनं दूध पाजून तेला मोट केलं. नाद म्हनून आनल्याला तेजा बकरा आता लोडं ती सावर्ड फाटी ही आंतर मालकासंगं सायकल काय..? मोटारसायकलपेक्षाबी जोरात कापाय लागला..! तेज्या आसल्या मूलका येगळ्या नादान आनी त्या बकऱ्यामुळं तेज नाव पडलं… ‘संज्या बकरा…!’ धाडसी, निडर, बेधडक, खुनशी, तितकाच हाळवा, शाळा कमी शिकल्याला आसला तरी मानूसकी जपनारा, मुक्या जिवांसनी जीवापाड जीव लावनारा पडद्यामागचा नायक आनी खलनायक…..संज्या बकरा.!
संजय सुभाष चवान ऊर्फ लोड्याचा संज्या बकरा.! ही नाव आनी तेज्या उचापती आयकल्या तरी आंगावर काटा यील, आसला ह्यो गडी. साडेपाच फूट उंची, डोसक्याला कायम टूपी, त्याव गॉगल, गंदाची नामाटी, गळ्यात काळा, पंचरंगी, लाल दोरा, सोन्यागत दिसनारी चेन, बदाम, मनगटात बेंटेक्सचं चांदीचं कडं, काळं रबर, काळ्या मन्याची ३ पदरी माळ, हातात धा ती पंधरा प्रकारचं दोरं, डाव्या हातात घड्याळ, पाची बोटात पाच येगयेगळ्या प्रकारच्या आंगट्या, आंगात हरेक तरची कापडं, किशाला पेन, २ मोबाईल, डाव्या पायात काळा दोरा, पायाच्या अंगठ्यात तांब्याचं कडं, केसांसनी चपचपीत वासाच त्याल, कायम पावडर-शेंटचा घमघमाट, पायात कातडी चप्पल, पाकिटात हाय न्हाय तेवढ्या पिच्चर मधल्या नट्यांचं फुटू.! आसला ह्यो संज्या…!
तेज हात बगीटलं तर दगडावानी झाल्यालं.! म्हित्तीच्या कामानं हाताला घट्ट पडल्याली.! बेंदराच्या बैलागत सजवल्याली तेज्यासारकीच जगायिगळी तेजी गाडी व सायकल. संज्याला येकादी गोष्ट आवडली की यिषय संपला. बाजारात आसल नसल ती वस्तू तेज्या गाडीव, हातात दिसनार.! कोन काय म्हनल? मानसं हास्त्याल? आसला गड्यानं कदी इचार केला न्हाय. वाऱ्यागत बेफाम आनी बेधडक काम हाय तेज.
काट्याच्या झाडाव चडायचाय, साप मारायचाय, हिरीत बुडून कुनाच मडं काडायचाय, पान्यात पडल्याला फुटबॉल, मोटार काडायची हाय, नारळाच्या झाडाव चडायचाय…. बोलवा संज्याला…! धाडसाच आनी आडचनीतली काम आसली की संज्यालाच बोलवाय लागतंय .! आसा जीवाव उदार हुन जगनारा, ३४-३५ वयाचा तिसरी शाळा शिकल्याला, ३ लेकरांचा बाप आसल्याला ह्यो संज्या…. शाळा जरी कमी शिकला आसला तरी शिकल्याला जी आक्कल, येवार ज्ञान न्हाय ती तेला हाय
मेंढरंवाल्या डिगू बाबाचा नातू आनी थोरल्या सुबासचा पोरगा मजी संज्या.! तवा सारी राह्याला येकातच. बारका आसताना संज्या घरादाराचा लाडका. शेरडा-मेंढराचं घरात बक्कळ दूद हुतं. नातू मागं सरोस्तर डिगूबाबा दूद पाजायचा. शेरडात, मेंढरात तेला बरं वाटायचं. शाळा म्हनलं की संज्याच्या डोसक्याव आट्या पडायच्या. बानं संज्याचं नाव शाळंत घाटलं. संज्याचं आय-बा तेला सोडायला शाळंत जायाची. त्यास्नी धरूनच त्यो दुपारपर्यंत शाळंत कट काडायचा. शाळा चुकवायचा तेला दांडगा नाद, दांडी मारायला तेज्याकड कारन बी लै आसायची. रडत-खडत पयली झाली, दूसरी झाली… पन शाळा म्हनलं की पिंजऱ्यात कोंडल्याल्या वागागत गड्याची आवस्था व्हायची.! गावात आधीच पोरं कमी आनी त्यात हेज्या आसल्या दांड्या मारन्यान मास्तरबी वैतागल्यालं..! येक दिवस संज्या आला न्हाय; मग ४ नेटाक पोरं घिऊन चिचनीचं काळे गुर्जी तेज्या घराकडं गेलं. पोरांसनी आनी गुर्जींना बगून संज्यानं पळाय जुपी किली. तानून धरला. तशी तेंन आरडाय- वरडाय जुपी किली. दोगानी हात, दोगानी पाय धरून पाळना केला. खाऊन पिऊन ताकतवान गडी किरपान पोरास्नी त्यो रेटंना. पाय झाडताना पोरांच्या हातातनं तेजा येक हात सुटला. जसा हात सुटला तसा हाताला घावल त्यो दगुड भिरीरा त्यो हानाय लागला. योक दगुड काळे गुर्जीच्या दंडाला घासून गेला. दगडाच्या मारानं पोरं पळून गिली. गुर्जी पिसाळलं. शाळतनं आनीक पोरं बुलवून तेला उचलून शाळंत आनलाच. कम्बरत वाकवून गुर्जीन तेंच्या स्टाईलनं बदा…बद मारला..! मार खाल्ला.परत दुसऱ्या दिवशी दांडी.
घरची शाळंत जा म्हणायची; पन तेज मन रमायचं न्हाय. शाळंतबी लय उसाबरी करायचा. हेज कंपास तेज्या पिशवीत, तेजी पाटी तिसऱ्याच्याच पिशवीत ठिऊन भांडनं लावायचा. हेज्या आसल्या उद्देगानं पोरांच्यात भांडनं लागायची. माजी वस्तू चुरली; म्हनून पोरं येकमेकाच्या उराव बसायची. आनी ह्यो गडी गालातल्या गालात हासत गमजा बगत बसायचा. आसल्या आजून बऱ्याच उसाबरी त्यो करायचा! आज्यासंगं सुट्टीच्या दिवशी मेंढरामागं रानूमाळ हिंडायचा. संज्याच्या कुरापती शाळंत, शाळंच्या भाईर वाडत हुत्या. चिचनीचं इनामे गुरजी, काळे गुरजी, सावर्ड्याचं माने गुरजी आनी मंडले गुरजी ही सारीजन पोरास्नी वळान लागावं म्हनून हाग्या मार द्यायची. तरीबी संज्या काय सुदरायचं नाव घेत न्हवता.
‘आता उठवू सारे रान । आता पेटवू सारे रान ‘ ही गानं खड्या आवाजात मंडले गुरजी पोरास्नी शिकवायचं.! गुर्जींच्या मागं पोरं गानं म्हनायची. ११ ला शाळा भरल्याव हाजरी हुन गानं सुरू…. संज्याच्या हिंडाय सुटल्याली शेरड शाळंचं भिताड घासत यायची. तेंच्या मुताच्या वासानं संज्या आत येरबाडायचा.! शाळंतनं भायर पळून जावावं आसं व्हायचं.! शाळा न्हवं तेला ती बंदीशाळा वाटायची. ह्यो कावराबावरा व्हायचा आनी गुर्जी गानं थांबवून “संज्या हिकडं ध्यान दी न्हायतर तीत आल्याव पेकटात लाथ घालीन म्हनायचा .!” खिडकीतनं भायर त्वांड काडत गुर्जी संज्याच्या बा ला म्हणायचं,”सुबास… तुला चारा शाळंच्या मागंच लय लागलाय काय? ही गाबडं आसलं आनी तू आसला लगा! शेरडं तर हितनं हान, न्हायतर पोराला तर शाळंतनं घिऊन जा. ही चुळबुळ करून साऱ्या वर्गाला घोडा लावतंय.!”
संज्याच्या उचापती थांबत न्हवत्या. येका रविवारी डिगू बाबाच्या किशातल पाकीट आसल्याली पिशवी तेंन हानली. चुरी करावी म्हनून नाय, तर त्यात काय आसंल हेज्या उत्सुकतेपोटी.! संज्याचा बा लोकाच्यात कामाला हुता. कॕनलच्या बाजूनं रस्ता. जाताना संज्यानं पिशवी उगडून बगिटली. त्यात म्हत्वाची कागदं आनी ४० रुपय हुतं. तवा ४० रुपयला लै किंमत हुती. तेंन कागदं पाक फाडून टाकली आनी नंबरच्या धोंड्याखाली पाकीट ठेवलं.! राती घरात बोंबाबोंब सुरू झाली. पाकीट कुनी हानलं? साऱयांचा संशय संज्याव..! संज्याच्या आयनं शाळंत इनामे मास्तरला सांगिटलं. मास्तरनं सकाळी ११ ती संध्याकाळी ५ पातूर पायात काटी घालून खोडा घाटला आनी शाळंच्या तूळीला उलटा टांगला; तवा कुटं त्यो कबुल झाला.
शाळपाय मास्तरांचा मार सोसना. मग मारनाऱ्या मास्तरासनी आद्दल घडवायला शाळा फोडायची म्हनला. परीक्षा सुरू हुत्या परीक्षेची ७०० रुपय फी शाळंत जमा झालती..! संज्यानं त्योच डाव साधला. ह्या कामगिरीसाठी तेंन नायकाच्या उमया मंडलेला ईश्वासू म्हनून संग घेटलं. लाकडी खिडक्यांच गज कापायला एक्सा पान घेटलं. सामसूम झाल्याव घरातनं शाळंचा रस्ता धरला. गज कापून दोगांनी आत उड्या टाकल्या. कपाटाचं कुलूप तोडलं.! आत परीक्षेचं पेपरच.. गठ्ठं भायर काडलं आनी मास्तरांच्या माराचा राग तेज्याव काडला. पेपर टराटरा फाडून तिरगान्या केल्या. पैसं किशात भरलं. पन येवड पैसं गावात कसं खर्चायचं ह्यो प्रश्न पडला. मग किशातलं सारं पैसं, हुतं तसं परत ठेवलं.! शाळंतच रात काडली. कोंबडं वरडल्यावर शाळतल खेळायचं लाकडी प्राणी घिऊन पळ काडला. दुसऱ्या दिवशी शनवार… मास्तर लवकर आल्याली.. सारी बोंबाबोंब उटली..! गज कापून शाळत चूरी.. सारा गाव बगाय पालता पडल्याला.!
शाळा समितीचा अध्यक्ष तवा शेस पाटील हुता. संज्याची आय ‘नमू’ नमू गिरनीतनं दळनाचा डबा काकला लाऊन घरला चाल्लीवती. शिसूनं तिला सांगिटलं,” चिंगा पोरांन कायतर भानगड किल्या. बलामत माज्याकडं आल्या. घरात येऊन आयनं खाली पाडून धोपाटला आनी खिळनी घिऊन शाळंत दिली. मास्तरला शिसू म्हनला,” ही रामुशाचं गाबडं… शाळंत येक मेंढरु ठेवलं तरच बसंल.!” कितीबी उचापती केल्या तरी शाळा काय सुटत न्हवती.! मग संज्यानं अपहरनाचा डाव टाकला. शाळंला दांडी मारून कडब्याच्या बुचाडात पिशवी टाकली. हाताला चाऊन दात उटवलं. चोरांनी पळवून न्हेल्याचा बनाव केला. पन कांबळ्याच्या छबा काकूनं तेला बगिटलं हुतं. तिनं सांगिटलं…” ह्यो बुचाडात हाय, ह्येला कुटला चोर न्ह्यायचा?” डाव फसला, पन त्या दिवपासन शाळा कमी होत-होत कायमची सुटली.
शाळा नसल्यानं गडी आता कानात वारं शिरल्याल्या वासरागत बेफाम झाला. दिसभर शेळ्या-मेंढ्या चाराय कदी बा बराबर तर कदी आज्या बराबर रानोमाळ हिंडू लागला. हातात कुऱ्हाड, खांद्याव ढाळं पाडाय आकडी आसा आवतार करुन त्यो आता शेरडंवाला झालता. मुक्या जीवांचा आता तेला चांगलाच लळा लागलावता. काल परवाचा संज्या आता वयात यायला लागला. २५ शेरडा-मेंढरांचा स्वताचा कळप तेंन आता केला. रानात बी दिवसभर गड्याच्या उचापती चालूच…. हातातल्या कुऱ्हाडीनं कुठंबी कच घालायचं! पारवं, ससं, चितार, लाव्हार, आसलं येका दगडात तो टिपायचा..! येवडा तेजा नेम झालता. वाटंनं येता जाता सरडं किती मारलं आसत्याल ही तर इचारूच नका.! काय मळकरी रानाच्या कडंला शेरडं हिंडऊ द्यायचं नायत. जातीवन शिव्या दिऊन मालक शेरडाला दगाड घालायचा. शेरडाला दगाड मारल्याल तेला सोसायच न्हाय.. राग गिळायचा आनी इसरी पाडून संज्या बार भरायचा.! तेज्या रानातल पीक उपडून टाकायचा. कुऱ्हाडीन,कोयत्यान कच घालून पीक हुत्याचं न्हवतं करायचा.! नुकसान केल्यावरच तेजा राग शांत व्हायचा.
आरवड्याच्या हाद्दीत येकदा संज्या शेरडं चारत हुता. भूक लागल्याव येका शेतकऱ्याचा ऊस मोडला. फाटकाळ तोंडाचा शेतकरी न्हाय तसल्या शिव्या देत आला. तोंडचा खात असल्याला ऊस तेंन हिसकाऊन घेटला. संज्या कायच बोलला न्हाय. दोन म्हयन जाऊन दिलं. संज्या ऱ्हायाला लोढयाच्या तळ्याजवळ आनी शिव्या घालणाऱ्या मानसाचं रान तळ्याच्या पलीकडं आरवडं हाद्दीत. फिरून जायाचं म्हनलं; तर त्या रानापातूर जायाला लै येळ लागनार हुता. मग काय आर्धा किलोमीटरचा तलाव पवत जायाच तेंन ठरवलं. कोयता कमरंला बांदला. पायाला येका दोरीनं २० लिटरचं प्लास्टिकचं २ क्यान बांदलं. काळ्याकुट्ट आंधारात सातच्या टायमाला तेंन तळ्यात उडी मारली. तळं काटूकाट भरल्याल. पानी दिवसा बगिटलं तर भ्या वाटाव आसलं; पन डोसक्यातल्या संतापाच्या फूड तेला कायच वाटत न्हवतं. पाऊन तासात पवत तेंन कड गाटला. कोन हाय का? आंदाज घेटला. चांगलं २५-३० ऊस तोडलं. तेजी केनांसंग मुळी बांदली. मुळी पान्यापशी आनून ठिवली आनी परत फिरला. हिसकावून घेटल्याल्या उसाच्या ठिकानी कोयत्यानं अर्ध्यातनंच कचा…कच चांगला गुंटाबर ऊस तोडला. मोहीम फत्ते करून पान्यात उडी मारली. ऊसाचं शेंडं वडत कड गाठला. तवाच त्यो शांत झाला..!
संज्याचा बकरा आता तेज्या सायकलीसंगं घोड्यागत पळत हुता. गावात बाजार आनाय गेल्यावर संग, कुनाच्या रानात कामाला गेलं तरीही त्यो संग आसायचा. दोगासनी येकमेकांचा चांगला लळा लागलावता. बऱ्याच गावांच्या जत्रंत तेंन टकरी केल्या. नंबर काडलं. खाऊन पिऊन मातालल्याल ती जनावर हुतं. ‘जवानीची मस्ती आनी म्हातारपनाचा खोकला कितीबी दाबला तरी उसळून वर इतुयच.’ या म्हनीप्रमाणं संज्या आनी बकरा दोगासनीबी जवानी छळत हुती. तेज्यासंग कामाला जानाऱ्या गावातल्या बायकांसंग तेज नाव जोडलं हुतं. बकराबी आता झिंगल्यागत करायचा. कुनीबी दिसलं तर धडका माराय बघायचा. बा नं सांगिटलं, “संज्या, हेजा बाजार कर आता..!” गड्यानं लाडक्या बकऱ्याचं फोटो काडलं आनी १० हजारात तेजा बाजार केला. बायकांच्या चर्चा घरापातूर आल्यावर तेज लगीन केलं. 3 पोरांचा बाप झाला; तरी आंगातली पोरडकी काय जात न्हवती.
कवलग्याला ३ वरसाच्या पोरीला गाडीव घिऊन दवाखान्यात दावाय गेलता. परत येताना बाबू नायकाच्या वस्तीजवळ रस्त्याकडंला झुडपाच्या दाटीत हिर हुती. शेरडासाठी ढाळ बगताना रस्त्याच्या काठाचा आंदाज चुकला आनी गाडी पुरगी सकट हिरीत पडली. डोळ्याफुढं आंधारी आली. काय झालं कळंना..! तवर पुरगी पान्यात बुडत चालली हुती. बाका प्रसंग हुता; पन तेंन धीर सोडला न्हाय. गाडीनं तळ गाटला हुता आनी पुरगी तेज्यामाग चालली हुती. ह्यो गडी पट्टीचा पवनारा… पाण्यात बुडून पुरीला वर काडलं. येका झाडाच्या मूळीला धरून पुरीला उलटं केलं. पोटातलं पानी भायर काडलं. त्या बारक्या जीवाची तगमग, भिती व रडन्यान बापाचबी काळीज चिरलं.! त्या हिरीतल्या येका भसक्यात पोरीला ठेवलं. जवळ कोन न्हवत. हाका मारूनबी कोन आलं न्हाय. पान्यात दोन जीवांची जगन्याची लढाई सुरू झाली. संज्या हार माननाऱ्यातला न्हवता. शर्ट फाडून पुरगी पोटाला बांधली आनी झाडाच्या मुळ्या धरून त्यो वर आला. दैव बलवत्तर म्हनूनच त्यो पोरीसह जगून वाचून परत आला. घरात न्हाय तसल्या शिव्या बसल्या. आसा ह्यो संज्या..! तळ्यात तर कायम तेच्या नावानं बोंबाबोंब. कुनाची पाईप कापून मोटार हिरीत ढकलली, कुणाच्या केबलचं तुकडं केल्यात, पान्याच्या पायपा फोडल्यात… आसलं लई उद्योग संज्यानं केल्यात. पन काय येळा त्यानं न केलेलं गुन्हंबी तेज्या माथी बसल्यात.
जीवावर उदार होत कसल्याबी ऊच नारळाच्या झाडाव घोरपडीगत चडनारा संज्या आता आधुनिक होत यांत्रिक शिडीच्या मदतीनं नारळ काडतूय. गड्याला नटन्या-मुरडण्याचा लय नाद..! शाळा शिकल्यावरच मानूस शाना हुतो आसं कुनी सांगिटलं? संज्याचा प्रपंचा बगिटला तर येखाद्या चार बुकं वाचून नुकरी करनाऱ्याचा संसार तेज्याफूड फिका हुईल येवड सारं येवस्थित तेज्या घरी हाय. धाडसाचं कुटलंही काम आसलं की, या पडद्यामागच्या नायक आनी खलनायकाला गाव आजबी आवाज देतंय आनी संज्याबी कायम ओ दीतूय….!
पुस्तक: गोतावळा
लेखक:आनंद यादव
२२ खुटयांची दावन ४ वर आली. पिपळाच्या झाडा बरोबर सारी झाड तोडून हिरवागार मळा बोडका केला. पिपळ तोडताना त्याला लावलेल्या दोरयांच वर्णन गुन्हेगाराच्या देहास लावलेल्या काढण्या अस लेखक करतो. आणि रो रो आवाज करत एक दिवस ट्रॅकटर येतो मालक खुश हुतो. त्याच्या डायवरचा तालही लेखकान मस्त चितारलाय. डायवरला चाण्या खोंडान लाथ मारल्यावर त्यानं काठीन दिलेला मार व त्यावरून नारबाच्यात व त्याच्यात झाल्याला वाद. लेखक लिहतो जीवाची माती करून मोठं केलेल्या जनावराला मारताना त्याच्या डोसक्यात धोंडा घालावा वाटत हुता. परत काठी लावलीस तर याद राख हा भरलेला दम. व चाण्या मेला तर दुसरा यील पण डायवर मिळायचा न्हाय. आणि सोसत नसल तर वाट धर हे मालकान वापरल्याल शब्द वाचकाच्या काळजाच पाणी करतात
वाचक मित्रांनो गोतावळा हे पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील पुस्तकावर क्लिक करा👇