‘संजू मेजर’: “तमाशाचा आश्रयदाता”
‘संजू मेजर’: “तमाशाचा आश्रयदाता”
विनायक कदम:९६६५६५६७२३


तमाशा आस नाव जरी कुणी घेटल तरी काय जनासनी आंगाव पाल पडल्यागत हुतय. मात्र आसलीच भोळवाट उंडगी माणसं दार झाकून मोबाईलवर पॉर्न व्हिडीओ चवीनं बगत्यात. कमरखालची भाषा असत्या म्हणून आमचा तमाशा अनेकांनी बदनाम केला. कोण भांडाय लागला तर आमी आर… काय….तमाशा लावलायसा आस म्हणतूय.
तमाशातली भाषा ही ग्रामीण भागातली गावगाड्यातली रसभरीत भाषा हाय. भाषाशुद्धीच ‘धड’ वाचणाऱ्यासनी त्या भाषेच अप्रूपच वाटणार की. आजबी ग्रामीण भागात ज्या शिव्या दिल्या जातात त्यात प्रेम, गोडवा हाय. पण जेला कावीळ झाल्या तेला शिवी देणारा माणूस मजी ‘लय’ वाईट बोंबलभिक्या माणूस वाटणार.
तमाशाकड कला, कलाकार म्हणून आमी कधी बघिटलच न्हाय. त्यात बाय किती दिखनी हाय, तिच कापडातन काय अवयव दिस्त्यात का ? हेज्याव लोकांच ध्यान. तमाशाच्या बाबतीत आमच्या मनात जे भरवलय त्यामुळं ही महाराष्ट्राची कला भविष्यात संपणार हाय. त्यात काम करणाऱ्या हजारो कलावंताची उपासमार होणाराय हे तितकंच गंभीर हाय. पूर्वी राजा महाराजांच्या काळात लोकासनी कलेची जाण हुती. राजाश्रय हुता. राजदरबारी कलाकारांचा योग्य मानसन्मान होत हुता. मात्र आत्ता उलट परिस्थिती हाय. कुटल्या गावात तमाशा आसल तर तिथं राजकारणाची खूजली आसल्याल गडी कुरापती काढून दंगा घालत्यात. तमासगिरांचं सामान पेटवायच. दगडफेकच काय.? काय ठिकाणी महिला कलावंतांवर अत्याचार बी झाल्यात. तमाशा कलावंत मजी बोलना त्यो आळशी. कला म्हणून तमाशाकड नाय तर वासनेच्या नजरेनं त्याकडं बगिटल जातंय. आलीकडल्या आती शिकलेल्या पिढीनं तर थोडीफार जिवंत आसल्याली ही कला बंद पाडायचा ठेका घेतलाय आस वाटतंय. त्यासनी तमाशा व ऑर्केस्ट्रा यातला फरक कळत न्हाय. तमाशात नुसती गाणींच वाजली पायज्यात नायतर दंगा.
बिकिनीत नाचणारी करीना कपूर , आणि फडावर नऊवारी निसून धा…धा किलुच पायात चाळ घालून नाचणारी मंगला बनसोडे ह्यात काय.? फरक हाय का न्हाय.? पण करिनाच्या कलेला आमी दाद दीतूय कमी कापडात नाचणारी बाय मजी उत्तम कलावंत ही व्याख्या झाल्या. तमाशांन माणसं कधीच बिघडली न्हाईत ओ. पण माणसांनी तमाशा बिघडवला. त्यातली गणेश वंदना, गण गवळण, वगबाजी, फार्स, वगनाट्य आता ठरावीक ठिकाणीच हुत्यात. कलेची जाण नसणारी तरुणाई आता फक्त तमाशातल्या गाण्यावरच थिरकत्या. चिंचणीच्या गणपत व्ही माने यांनी इंदिरा पुन्हा जन्माला ये हे वगनाट्य बघून पंतप्रधान राजीव गांधी यांच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्यावत्या. इतकी ताकत कलेत ,कलावंतांच्यात हुती. आता गावोगावी यात्रा, जत्रा सुरू झाल्यात. पण ठराविक गाव सुडली तर बाकी कुठं तमाशा हुताना दिसंत न्हाय. पण तमाशा कला व कलावंतांना गेली २० वर्षे गावात स्वखर्चाने तमाशा भरवून संजू मेजर यांनी तमाशाला लोकाश्रय दिलाय.
संजय बाळाराम पाटील. वय ६०. गाव वाघापूर. लष्करातला निवृत्त अधिकारी असणारा माणूस कलेला आश्रय देतोय. तिबी स्वखर्चांन. आस आमच पत्रकार दत्ता पाटील सायबानी सांगिटल. आणि बऱ्याच दिसानंतर गुरुवारी रात्री तोफिक मास्तरला घिऊन वागापूर गाठलं. दोन हजार लोकसंख्येच ते शांतता प्रिय गाव. मेजरनी सांगितलं आमच्या घराण्याला भेदीक, ब्यांड, तमाशा आसल्या कलांची आवड हाय. ती बारक्या पणापासन. आठ वरसाचा असताना मी पयल्यांदा तमाशा बगीटलावता आस तेंनी सांगिटलं. बारावी झाल्यानंतर ९:६:१९८० ला तासगावच्या पंचायत समिती जवळ लष्कराची भरती आलती. तवा भरती झालू. मात्र तेज्यानंतर थोडं कलेकड दुर्लक्ष झालं. १९९७ ला निवृत्त झालू. आणि तमाशा कलेसाठी कायतर करायचं ही ठरवलं. एप्रिल महिन्यात गावात जत्रा असती. आणि यात्रेनंतर आठ दिवसांनी संजय पाटलांनी स्वखर्चांन पहिला लता.. लंका व जयसिंग पाचेगावकर यांचा तमाशा २००१ ला वाघापुरात आणला.
तमाशा आणायचा तेबी पदर खर्चांन. पण तेलाबी लय झोंब्या हायत. तमाशा ठरवणं, पुलिसांची परवानगी, परत गावातल पब्लिक गप बसलं का? दंगा, धोपा , व कलाकारांची सर्व जबाबदारी हेंच्यावरच.काय हुईल, जरा धाकधूकच हुती. पण स्वताचा तमाशा म्हणून ते स्टेजवर नारळ फोडायला कधी गेले नाहीत. तर गावातल्या चार चांगल्या माणसांकडन नारळ फोडला. कार्यक्रम सुरू झाला. पब्लिकन खुळ्यागत गर्दी करून तमाशाला दाद दिली. बिन दंगा, धोपा हुता आगदी येवस्थित पार पडला. मेजरला बर वाटलं. गिली २० वर्षे ते स्वतः पैसे घालून गावात तमाशा आणत्यात. त्यातील कलावंतांच्या कलेला दाद म्हणून पुरुषांना फेटे बांधून तर महिलांना साडी देऊन त्यांचा सन्मान करत्यात. गेली २० वर्षे पाटे ४ पर्यंत त्यांचा तमाशा चालतो. परिपूर्ण तमाशा बगायचा आसल तर त्यातलं दर्दी गडी वाघापुरच गाठत्यात. तासगाव पोलिस स्टेशनचा आमच्या गावावर, व हिथल्या कार्यक्रमावर लय भरोसा आसल्याचं सांगितलं. कधी तक्रार झाल्या आस २० वर्षात झालं न्हाय. मानलं पायजी पब्लिकलाबी. लष्कराची शिस्त पाटलांच्या बऱ्याच गुष्टीतन जाणवली.प्रत्येक वर्षीच्या कार्यक्रमाचं फोटो फोटोग्राफर कढून काढून नाव टाकून त्यानी व्यवस्थित आलबम केलता.गेली २० वर्षाच्या आठवणी त्यांनी फोटो रुपात जपल्यात.
वाघापुरच्या मातीत तमाशा करायला अनेक तमाशा कलावंत उत्सुक आस्त्यात. आमच्या लोकसंस्कृतीच प्रतीक आसल्याला तमाशा जगला , जपला व तुमी आमी जपला पायजे. पण साठ, सत्तर हजार घालून गेली २० वर्ष तमाशा कलेला लोकाश्रय देणाऱ्या संजू मेजरच मनापासन कौतुक करावं वाटलं.