सहनशीलतेच दुसरं नाव: दयानू मावली
सहनशीलतेचं दुसरं नाव….. द्यानू ..! (माऊली)
विनायक कदम:९६६५६५६७२३
रेशनिंगचं दुकान मजी ग्रामीण भागात वादा-वादीचं, भांडणाचं ठिकाण.! तिथं कसलबी वाद न हु देता काम करणं मजी लै आवगड काम. साऱ्यासनी आसंच वाटतंय. बऱ्याच गावांतनी ही दुकान मजी बापाची जहागिरदारी व राजकारण्यांच आड्ड झाल्यात.
यातून मग ही दुकान चालवणाऱ्याला मुंडक्याव ऊब करणारी लै आस्त्यात. “तू राजकारण कर्तुयस, रेशन बाहेर काळ्या बाजारात यिकतूयस, आमाला जाणीवपूर्वक कमी धान्य दीतूयस, टायमाला माल देत नाहीस…” यासारखे ढीगभर आरोप तेज्याव. त्यातनं मग वादावादी, मारामारी मग तक्रार करून पुरवठा आधिकारी, तहसीलदार यांच्याकडून ती रेशन दुकान चालवणाऱ्यावर कारवाई.! मग तेज्या जागी दुसरा नवीन माणूस.
रेशनिंगच्या या भानगडींमुळं आजपर्यंत अनेकांवर कारवाया झाल्यात. लयत लय २ ती ३ वर्षंच दुकान चालतं.! पण आमच्या लोढ्यात ''ज्ञानदेव कांबळे'' उर्फ साऱ्या गावचा 'द्यानू ..! (माऊली)' एक दोन नाही तर गेली ४० वर्षे कुठल्याबी तक्रारी , लडतरीविना ही दुकान चालवतूय. माणसाची सहनशीलता काय व किती आसू शकती, सहनशीलता कशी ठेवायची आणि थंड डोक्यानं कामकाज कसं करावं ही वयाची साठी पार केलेल्या या खत्री माणसाकडनच ...!
डोसक्याला पांढरीशिपत टूपी, टुपीखाली पिकल्यालं पांढरं क्यास, खुरटी पांढरी दाढी, गळ्यात काळा दोरा, आंगात निळा शर्ट, खिशात एक डायरी, तेला पेन, मनगटात दोरा, काळी न्हायतर तपकिरी कलरची प्यांट, कमरंला किल्ल्यांचा जुडगा, पायात पांढरंशिपत शिलपर, प्रेयसीसारकी कायम संग पाटीवर आसणारी वायरची पिशवी आणि त्यात साऱ्या गावाची असंख्य महत्वाची कागदं..!
दयानू माऊली मजी लोढ गावचा तहसीलदारच..! आसं गड्याचं वटात काम..! फुढच्यानं तोंडातन शिव्यांचा पाऊस पाडला, कुणी कसलबी आरोप केल, आपल्यापेक्षा कमी वयाच्या.., पोराच्या वयाच्यानं जरी तिरका शब्द वापरला; तरी थंड डोक्याचा ह्यो माणूस कधी फिरून शिवी देणार न्हाय, तेला उलट बोलणार न्हाय.. तेला रुचल, पचल आसचं उत्तर देणार. माऊली मजी तसा दारूचा लाडका गडी. कायम येणाऱ्या- जाणाऱ्यांसनी त्या दारूचा वास येणार ! पण कवा कुणाला वाईट बोलणार न्हाय, कुण्या बाईकडं वाईट नजरेनं बघणार न्हाय..!
रस्त्याच्या कडेला उकरडयात ठेवल्यालं राकीलचं तीन ब्यारल गेली ४० वर्षं तितचं हाईत. बायका, तरणी, म्हातारी माणसं धान्य घ्यायसाठी दुकानाफुड तळ मारायची; पण मावलीचा ठावठिकाणा लागायचा नाय. मग कोणतर घरला जायाचं, “द्यानु ये द्यानु… आरं यिकी रं…. ” आशी रस्त्यावरनंच हाळी द्यायचं.! आतन आवाज याचा… “घरात न्हायती..!” माणस दुकानाकडं परत याच. तित कोणतर सांगायचं…. “जा रामुसवाड्यात म्हाद्या, इज्या नायतर उस्माण्याच्यात बसला आसल ढोसत.!” पोरं परत मावलीच्या मागावर. तवर गडी दिशी मारून निकमाच्या दारात चडाला लागल्याली आणि बाजूला कुत्री आंगावर तुटून पडल्याली….!
दुकानाफुड आल्याव मग काय द्यानूचं सरळं हाय व्हय.... तासभर ताटकळत वाट बघत बसल्याली धा-पंधराजण गप कशी बसत्याली? ज्यो त्यो तोंडाला यील त्या भाषेत आपला राग काढणार..... " दारू सुडून ....चं प्यायचं रं... आमाला कामं न्हाईत का?" परत्येकाच्या माग काय ना काय याप आसतंयच की... कामाला जायाचं हाय, पाण्याव जायाचाय, दूध घालायचाय, म्हसरं सोडायची हायत, कोळपाय जायाचाय तर कुणाला म्हत्वाच्या कामाला..! आशा कोयाळात मग द्यानू कम्बरच्या चावीनं दुकान उगडायचा. दुकान उगडत-उगडतच म्हणणार, "तुमचं सगळ्यांचं खरं हाय..? पण मलाबी कायतरी कामं आस्त्याती की..!" "जळूद्याती तुजी कामं, आता आवर.." माणसांचं उत्तर ठरल्यालं आसायचं. मग काय, स्वारी चप्पल येका कोपऱ्यात काडून भितीला आडकवल्याल्या लक्ष्मीच्या फोटुला उतकाडी लावली की काम सुरू..! तवर राकील संपल्यालं आसायचं.... "पोरानु राकील काढाय लागतंय बरका..." गरज पोरासनी आसत्या, मग २०-२० लिटरच्या २ केनातून राकील काढायला ताफा घराकडं... राकील आणून ती येका फुटक्या केनात वतलं की काम सुरू व्हायचं. गिली ४० वर्षे ही आसंच चाल्लय..!
दुकानात कुनी गव्हाच्या-तांदळाच्या पोत्यावर बसल्याला, कुणी साखरंच्या पोत्यातली साखर खातूय तर कुणी गहू-तांदूळ कसाय हेजी क्वालिटी बघतुय..! बायका भितीला पाट लाऊन, काय आत ऊब्या तर काय पायरीवर भायर..! वजन करायला कोणतर पोरगं मदतीला घिऊन, सगळी यंत्रणा बसवून मग वाटप सुरू.. परत दंगा... " मला ही कमी आलं, ती कमी आलं. राकेल हाय तर तांदूळ न्हाय. आमाला देतच न्हायस. मोठ्यास्नी तेवड बिनमापाचं घालतूयस..!" त्यात शांताबाय आली की काय खरं न्हाय; मग मावलीच्या शर्टाला धरूनच..., "आयघाल्या कवातर राकील जास्त देत जा की..!" आशी बाचाबाची प्रेमानं चालायची.! आख्खं गाव द्यानूला शिव्या द्यायचं मात्र प्रेमानं..! कायदा व व्यवहाराची सांगड घालून मावलीबी साऱ्यासनी बिना तक्रारीचं रेशन दीतूय. खुलेपणानं, " होय.. तवा मी राकेल यिकलं.!" ही सगळ्या गावाला सांगत चूक कबूल करणार..! त्यामुळं तक्रार बिक्रार आसल काय प्रकार कुनी कधी केल न्हायत. गेली ४० वर्षे त्याच ही काम सुरूय.
कुणी, का रं... म्हणलं तर आमाला सन होत नाय.. पण द्यानू साऱ्यांच्या भाराबरं शिव्या खाऊन साऱ्यांच आयकून घितुय. रेशनिंगचा उत्तम कारभार कसा चालवावा? ही शिकावं तर द्यानू कडूनच..! "सहनशीलतेचं दुसरं नाव मजी.. द्यानू माऊली..