सा बैलांचा नांगूर
सा बैलांचा नांगूर:
विनायक कदम: ९६६५६५६७२३
‘जीवा शिवाची बैल जोड़ ‘…..ही भारदस्त आवाजातील गाण आता फक्त कानाला आयकायलाच बरं वाटतय. यंत्रयुगात माणुसच आता येक चालत बोलत यंत्र झालंय. पूर्वीच्या काळी दृष्ट लागावी आशी सर्जा राजाची पांढरीशुभ्र जोड़ प्रत्येक शेतकऱ्यांच्या दारी आसायची. मालक पोटच्या पोरांगत तेंचा सांभाळ करायचा. लग्नाच वराड, मोटन हिरीतन पाणी काढायचं, रसाच्या घाण्यापसन रानातली सारी कामं बैलांशिवाय होत न्हवती. गावाकडं घरटी देशी गाय हुत
ती. त्याच गाईचा देखणा खोंड वयात आला की शेतकरी शेतातल्या कामासाठी वापरायचा. बैलान साऱ्या भागाची मेहनत व्हायची. आदी लाकडी सामान हुतं . कालांतराने लोखंडी अवजारे आली. आणि चिवाट रानात मग सा बैल जुंपत १०० नंबरी नांगूर घालू रानाचा भुगा केला जायचा.
शेतकऱ्याची आणि बैलक्याची सकाळ पाटे ४ लाच सुरु व्हायची .सकाळी सहा वाजता चार ते सहा बैलांचा १०० नंबरी नांगूर जुपला जायचा. कवा कवा शेजारच्या बैलजोड आसणाऱ्या शेतकरयाशी उसना पैरा केला जायाचा. ताक्तीचा बैल, तरण खाँण्ड, भुजार बैल, कुणाला कुठं जुपायच, खीळ कुठं घालायची, कोण आत पडतुय, कोण बाहेर पडतुय अशी सारी बारीक सारीक माहिती शेतकऱ्याला असायची.भल्यामोठ्या नांगराला लांबलचक येटाक घालून बैलांच्या गळ्यात शिवळ घाटली जायाची.
ह्यो भलामोटा नांगूर धरायला योक ताकतीचा गड़ी, नांगरावर बसायला योक पोरगा व बैल हाणायला दुनी बाजूला हातात चाबुक घिऊन उभ आसणारं दोन बैलक्या. आसा सारा गोतावळा झाला की नांगूर चालू व्हायचा. सुरवातीला तास पडोस्तर बैल सरळ चालत न्हाईत. मग शेतकऱ्याची पल्लदार हाळी कानावर येत पाठीवर चाबकाचा धडूका बसला की बैल चराचरा लांबत नांगूर वडायची. हातभार रान फाटत जायाचं. ढेकळाच्या थापी च्या थापी बाजूला पडायच्या. रामाची चांगली मेहनत व्हायची .कोण किती ताकतीचा बैल हाय ही दिसुन यायच. बैलांच्या शिरा तनानून त्यातनं तेंचा रक्तप्रवाह सुरळीत व्हायचा, भूक चांगली लागायची परिणामी तब्येत चांगली होत बैल दणदणीत व देखणा दिसायचा. दहा ते साडेदहा वाजता पैरा आसणाऱ्या बैल वाल्यांच्या घरातून त्यांच्या भाकरी गोळा करण्याच काम बारक्या पोरांच्याकड असायचं. बैल थांबवून मग येकादया सावलीच्या झाडाखाली बसून सारयांच जेवाण व्हायचं. जेवणा झालं की तासभर हाणून बारा साडेबाराला सकाळी नांगराला जुपलेला बैल सोडला जायाचा . वड्यालाच कुटतरी पाणी पाजून झाडाखाली वैरण टाकत बैल मालकबी ताणून दयायचा. आसा सारा प्रत्येक शेतकऱ्याचा दिनक्रम. बेंदराच्या सणाला व श्रावणाच्या प्रत्येक सोमवारी बैलाना जूपत नसत्यात.
त्याकाळी पाउसपाणी येळवर पडत हुता.एकत्र कुटुंब पद्धती आसल्याण शेताची वाटणी न्हवती. प्रत्येक हंगामात शेतात एग येगळा मुबलक चारा हुता. त्यो खाऊंन बैल डिरकायची. गरजा कमी हुत्या शेतकऱ्यासह बैलबी समाधानी हुती. काळ बदलत गेला. दुष्काळ पडल्याव अन्न धान्यासह ,जनावरांच्या चारयाचा प्रश्न गंभीर झाला. माणसाची जगण्याची पद्धत बदलली, यांत्रिकीकरणाच वाऱ वाहू लागल. आणि बैलजोड़या कत्तल खान्याकडे जाऊ लागल्या. कमी कष्टात कमी वेळात ट्रॅक्टरन बैलांची जागा घिटली. नांगरापासन द्राक्षबागेस औषध मारन्यापातूर ती उस फोडण्यापर्यतच काम व्हाय लागलं. शर्यतीही बंद झाल्याव तर बैलासनी पाळन नाईलाजानं शेतकऱ्यांनाही नकु वाटाय लागल. आता ग्रामीण भागातनबी गोठयातून बैल कवाच गेलं आणि त्यांची जागा ट्रॅकटरन घिटली.