“रेंज बाहेरची ‘शिराळ्याची’ सावंतवाडी”….
“रेंज बाहेरची ‘शिराळ्याची’ सावंतवाडी”….
विनायक कदम:९६६५६५६७२३

शिराळा मजी तसा डोंगरी तालुका. मनमुराद निसर्ग व डोंगर. कोकणी माणसागत हीतल्या माणसांच्या जिभेवरबी गोडवा. सावंतवाडी तशी मनसेची पश्चिम महाराष्ट्रातील मनसेच्या ताब्यातली एकमेव ग्रामपंचायत म्हणून प्रसिद्ध. मनसेचे सांगली जिल्हाध्यक्ष फायटर तानाजी सावंत यांचं ती गाव. गावाबद्दल बरंच आकर्षण हुतं आणि आमचा मित्र कुमार सावंत न अनेकदा गाव बगाय या आमचं म्हणून सांगितलं हुतं. शनवारी मिरजेचा आमचा पत्रकार मित्र लक्ष्मण हुलवान संग मोटारसायकल वरून सावंतवाडीची वाट धरली. डोंगरी तालुका. का ?म्हणत्यात ही रस्त्यावरन जाताना समजत हुतं. सका सकाळी शेतातली काय माणसं पाखर हाणत हुती, काय जणांनी उसाला पाणी लावलं हुतं, काय जण वैरण काढत हुती. उनाच्या आधी कुणी जनावर सोडायच्या नादात हुतं. शहरातल्या गोंगाटातन बरं वाटत हुतं. वळण घेत जाणारा रस्ता, हिरवीगार शेत, आणि सगळ्यात जास्त मनाला भावला आसल त्यो मजी काटेसावर. गुलाबी फुलांनी भरल्याल काटेसावर शेतात, रस्त्याच्या कडला फुलल हुतं आणि फुल खायाला पाखरांच थव च्या थव झाडाव पडलं हुतं. रस्त्या कडेला डोंगराव अनेक ठिकाणी आसा फुलला हुता की बघणाऱ्या माणसानं प्रेमात पडावं. बिचाऱ्याला पानं न्हवतंच नुसती फुल, आणि फुल खायाला पाखरांच थवच्या थव झाडावर हुतं.

झाडाखाली टवटवीत पडल्याली फुल किती घिऊ आस झालं. निसर्ग न्हयाळत न्हयाळत सावंतवाडीच्या येशीवर आलो. आणि चारी बाजूला डोंगर आणि त्यात कौलारू घरांची शांत सावंतवाडी नजरेला पडली. वळण घेत गाडी गावात शिरली साडेअकरा पावने बारा झालत. गावात यिऊन गाडी महाराष्ट्र नवनिर्माण सेना , जनसंपर्क कार्यालय सावंतवाडी हित थांबली. कार्यालयासमोर मनसेचा झेंडा डौलात फडकत हुता. चौक सुशोभीकरण , यांसह बरीच काम चालू हुती. दोन तरणी पोर बाकड्यावर बसली हुत. वसंत सावंत कूट भेटत्याल कुमारनी पाठवलंय सांगितलं. तस शाखा उपाध्यक्ष आबा चव्हाण पावन आल्यागत आमच्याकडं धावल. या बसा म्हणत शाखा उघडून बसाय सांगितलं. तवर सांगलीतन कोणतर आलंय म्हणून वसंतरावांना निरोप धाडला. आबा लस्सी च्या २ पिशव्या घिऊन येत म्हणलं जेवाय जाऊ घराकडं चला. गावात आल्याल्या परक्या माणसाचा येवढा पाहुणचार गाव किती प्रेमानं करतंय त्यो सुखद अनुभव हुता. नायतर आमी च्या घेणार का? आस ईचारून आल्याली माणसं कधी वाटला लावीन आस हुतय.

तेवढ्यात शाखा अध्यक्ष वसंत सावंत व ग्रामसेवक गणेश पेटकर आले. वसंतरावांना मी गावाची माहिती ईचाराय सुरवात किली. १३०० ते १४०० लोकसंख्येच गाव. गावात पावसाच्या पाण्यावर शेती . भुईमूग, शाळू, भात, मका, ही पावसाच्या पाण्यावर येणारी पिकं. रोजगाराच काय साधन नसल्यानं तरणी पोर मुंबईत आणि म्हातारी माणसं फक्त गावात हायत. गावाच्या मालकीचा ३०० हेकटर डोंगर. त्या डोंगरावल गवत कापून जनावर दुधासाठी पाळली जात्यात. जलसंधारणाची काम म्हणावी तशी न झाल्यानं भरपूर पाउस पडूनबी पाण्याची टंचाई उन्हाळ्यात हुत्या. सकाळ, दुपार व संध्याकाळ आशी ३ वेळा एसटी गावात इत्या. चवती पर्यंत गावात शाळा, तितन फूड शिकायच म्हणलं की २ किलोमीटर पोरासनी चालत जायाला लागतंय. शासकीय म्हणला तर ग्रामपंचायत इमारत व शाळा. मास्तर आणि ग्रामसेवक सोडलं तर गावात कोण येत न्हाय. आता न येण्याला मोठं कारण मजी गावात मोबाईल ला रेंजच येत न्हाय.

शनिवार सुट्टी आसताना बी ग्रामसेवक गावात हुतं मला आश्चर्य वाटलं. आस काम करणारी सरकारी माणसं तुरळकच. म्या म्हणलं का ?ओ आज कस काय गावात तुमी. म्हणले माझ्याकड २ गावांचा चार्ज त्यात सावंतवाडीत मोबईल ला रेंज येत न्हाय. हितल्या माणसासनी तलाठ्याला दाखला काढायला शिराळ्याला जायला लागतंय. आणि ग्रामपंचायतीच दाखल दयायला मला १० किलोमीटरवर शेडगेवाडीच्या ग्रामपंचायतीत जावं लागतंय. त्यात बी काय अर्जंट आसल तर लॅपटॉप घिऊन गावामागच्या डोंगराव जाऊन रेंज हुडकाय लागत्या.
गावातल्या मानासासनी फोन करायला रेंज साठी ३ किलोमीटर वर जायाला लागतंय. प्रशासनाच महत्वाचं तात्काळ काय निरोप असल की दुसऱ्या गावातल ग्रामसेवक सांगायला येत्यात. रेंज नसल्यानं, गावाला शासकीय योजना समजत न्हायत , समजल्या तर गावात रेंज न्हाय आणि आर्ज भराय जाउपर्यंत तारीख संपल्याली असत्या.

सरकारी काम आता ऑनलाइन झाल्यात पण ती करताना ग्रामसेवकची फक्त मोबाईलची रेंज नसल्यानं किती तारांबळ हुत्या हे समजलं. गावातल्या मानासासनी तर काय अडचण हाय ईचारु नका. साधा फोन कराय ३ किलोमीटर जायाचं. अन्न ,वस्त्र,निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा हायत. पण आता मोबाईल आणि रेंज बी मूलभूत गरज हाय. रेंज नसल्यान, जगाशी संपर्कच न्हाय ओ. गावात सर्पदंशाच्या बरयाच घटना हुत्यात , तशाच अवस्थेत मोटारसायकल वरन कराडला ४० किलोमीटर दवाखान्यात न्हयाव लागतंय. मनसेच्या शाखेतन गावाला मदत केली जाते. शाखेत बसायला खुर्च्या हायत, पंखा ,टीव्ही हाय, दुनियेत काय घडतंय हे सारा गाव शाखेत बसून बगतोय. शाखेत गेल्याव आपलं काम हुणारच ह्यो गावाला विश्वास हाय, प्रत्येकजण हक्कानं आपली काम शाखेत जाऊन सांगतो. ती काम तालुका स्तरावर जाऊन तात्काळ केली जातात. माणूस आजारी आसल तर दवाखान्यात घिऊन जाण्या पर्यंत ते मेला तर मुंबईला निरोप देण्यापासन सगळी जुळणी करण्या पर्यंत मनसेची शाखा चांगलं काम करत्या आस गावकरी सांगत हुतं.

८ जनांची बॉडी व गावात मनसेची गेली १३ वर्ष सत्ता हाय. बारीक गाव निधींबी मोजून मापून येनार आणि त्यात सत्ता दुसऱ्या पक्षाची, विकासनिधीला अडथळा, मग राजकारण हुतय. शाखेच्या माध्यमातून अनेक शासकीय योजनांचा लाभ गावाला दिल्याचं व शाखेत आला की तेजा प्रॉब्लेम संपला आस वसंतरावांनी अभिमानानं सांगितलं. जानेवारीत निनाईदेवीची यात्रा असती व त्याला सारा गाव जमतूय. गावात ३० मोटारसायकली हायत, तींनचाकी १ व चारचाकी १ गाडी हाय. सागवान, आंबा,जांभळं, फणस,आईन, हेळा बिब्या,काटेसावर, पळस, रांनवडी, यांसह अनेक झाड हायत. तर ससा, मोर, भेकर, डुक्कर, व बिबट्या बी हाय. रताळागत असणारी बिरमूळ्या नावाची जात रानडुकराणी नष्ट केल्याचं त्यांनी सांगितलं. माहिती घेतली, फोटो घिऊन जरा गाव फिरतो म्हणून भर उन्हाचच वाट धरली.
कौलारू घर दिखणी हुती, काय ठिकाणी चांगली घर बांधाय सुरू हुतं, काय घरासनी सारीच मुबैला आसल्याण कुलप हुती. एका घराफूड सात आठ म्हाताऱ्या पापड करत हुत्या. माणसं राणातली काम उरकून खाऊन झाडाखाली रानात डुलक्या काढत हुती. जनावर दावणीतला चारा खात तर काय खाऊन डुलक्या काढत हुती. शिंकुटाच हुडव, भाताचं पिंजाराच ढीग जागोजाग हुतं. डोंगर चढाय लागलू तर झाडांखालन मोरांच थवच्या
थव निवांत फिरत हुतं.

एकच्या टायमाला डोसक्याव ही शिनकुटाच पोत घिऊन एक म्हातारी भर उनाचं डोंगर उतरत हुती. अनेक वाटा डोंगराव हुत्या , गवत कापून न्हेल्याण व झाड नसल्यानं डुंगुर बोडका हुता. भर उन्हाय चढाय ईना, नरड कोरड पडाय आलं. वर गिलू आणि वार आलं बर वाटलं. अख्खा गाव भारी दिसत हुता. आंब्याच्या झाडाखाली दोन गुराखी झोपलवत गुर जवळच हिंडत हुती. गावाचा भारी नजारा दिसत हुता. डोंगरगाव मोठ्या पवनचक्क्या गावाव लक्ष दिउन हुत्या. डोंगर उतरून खाली आलो. सगळं गाव सुनसान हुतं, शाखेच्या समोर आबा सावंत आपल्या कामात हुते. बारकी पोर शाखेसमोरच्या झाडासनी आपल्याच नादात पाणी घालत हुती, भर उनात गारवा देणार चित्र हुतं. तीनचा सुमार झाला हुता आता निघावं म्हणलं. आबांना भेटू परत म्हणून निरोप दिला. मोटारसायकल सांगलीच्या दिशेनं सुसाट निघाली.
ही धरती आपल्यासह पशु पक्षांची बी हाय आस मानणार प्रेमळ गाव तसं अपवादच एकाद. रेंज न्हवती तरी कुणाविरुद्ध त्यांची तक्रार न्हवती माणसं समाधानी हुती. हाताला रोजगार नसल्यानं मुंबईला होणार स्थलांतर धक्कादायक हुतं. गाव ओस पडून शहरांवर भार वाढतोय याकड गंभीरतेन बघणं गरजेचं हाय. खेड्यात रोजगार तयार केला तर शहरांच प्रश्न आपोआप मिटतील. पण तेवढी मानसिकता कुठल्याच राजकीय पक्षाकड न्हाय. सावंतवाडीच्या आठवणी काळजाच्या कप्प्यात बांधून घेटल्या आणि गाडी वार कापत सांगलीकड धावत हुती….