रंगा मास्तर:
गर्दीतला आवाज…
रंगा मास्तर:
विनायक कदम:९६६५६५६७२३
आंगात पांडरा शर्ट, पांडरी इजार, पांडरी टुपी, केसाला दिवाळी आसल्यागत कायम वासाच त्याल, पायात चकचकीत कातडी चप्पल, कानात आत्तराचा बोळा, खिशातन त्वांड भायर काढल्याला पांढरा तक रुमाल, काकत दुमडून घेटल्याली काळी पिशवी, तोंडात शिग्रेट, आनी सा फूट उंचीचा पल्लदार गडी मजी सावरड्याचा कडक शिस्तीचा रंगा मास्तर. लोढ्याला मराठी शाळत मास्तर मला आनी माझ्या आदीच्या पिढीला मराठी ,इतिहास ताला सुरात शिकवायचं.
आता उठवू सारे रान.. आता पेटवू सारे रान… ही गान मास्तर पल्लेदार आवाजात म्हनायचं. शाळतंच काय निम्म्या गावात आवाज जायाचा. फूड मास्तर आनी माग पोर म्हणायची. पण शिकवताना कुनी आगावपणा केला तर मास्तरच डोसकं फिरायचं. मास्तर हागोस्तर मार दयायच. लांब लचक हात, मजी पाटीवर हातुडी फिरवुन मारल्यागत लागायचं. पोर आरडायची, रडायची, कोन रेटना की मास्तर पायात धरायचा आनी वरन हुबाला मार दयाचा.
मास्तरची लय दहशत. नुसता मास्तर आलाय म्हनलं तर पोर घालून घ्याची. कुट त्वांड दडवू करायची. तळ्यातल्या संज्यांन कायतर उद्देग केलता मास्तरन कौलारू शाळत संज्याला कासऱयांन उलटा टांगलावता. मास्तर मार हुबाला दयाच. पन शाळत जीव तुडून शिकवायचं. मार खाल्ल्याल गडी घरात सांगायचं न्हायत. कुणी बा ला सांगिटलं तर मास्तरला का मारलस म्हनून ईचारायची तेंची हिम्मत व्हायची नाय. आपल्या पोरांच्या चांगल्यासाठीच मारलं आसल म्हनू न बाप ईचारायबी जायाचा न्हाय. मास्तरला साऱ्या पोरांची परिस्थिती म्हायती आसायची. कुनाची फी, कुनाला कापड, पुस्तक गरीब पोरासनी मास्तर पदरच्या पैशांन घिऊन दयाचा. मास्तरच्या हाताखाली बरीच पोर शिकली. चांगल्या हूदयावं गिली.
मास्तर शाळतन निवृत्त झालं. पन जगण्याची ती स्टाईल कवा सूडली नाय. मास्तर आजूनबी फूड आलं तर मला आदरयुक्त भ्या वाटायच. बोलताना शाळतल्यागतच मोजक बोलायचं. मास्तर कड बघितलं की वाटायचं साला जिंदगी जगावी तर मास्तरगत मनसोक्त आनी मनमुराद. मास्तर हार्टअटयाकन जाऊन वरीस झालं आनी मास्तर डोळ्याफूड तरळला. आसा मास्तर होने नाय.
विनम्र अभिवादन मास्तर.