--------------------------------- ======================================
Uncategorizedगावाकडचं फोटो

रानातलं खोपाट: 

रानातलं खोपाट: 

विनायक कदम:९६६५६५६७२३

 खोपाट मजी आताच्या पोरासनी कळायचं न्हाय. त्यासनी टेंट मारून राहयाचं म्हनून सांगाय लागलं. टेंट ही तशी खोपटातली आधुनिक आवलाद. पन खोपटातल सुखं काय निराळंच राव. जुन्या पिडीनं रानातनी बांदावल्या त्या खोपटलं सुंदर जग नुसतं बगीटलं नाय.? पन ती आनुभवलंय बी. खोपटाचा उपेग रानातल्या मळंकऱ्याला बारा म्हयन व्हायचा. तवा काय आताच्यागत गांडीखाली गाड्या हुत्या वी. धुरळा उडवत जायाला आनी यालाबी. मानस रानांत मैल, मैल चालत न्हायतर बैलगाडीतनं जायाची. 

मग रानात न्हेल्याल सामानं ठेवायचं कूट.? तर खोपटात. उनाळा सोडला तर काय गडी कायम खोपटात. साऱ्या शिवारात जेचं तेंन आपल्या बांदाव खोपाट केल्याल आसायचं. तवाची खोपाट काय दाताड ईचकी न्हवती. तर त्याव पावसानं सुपान पानी वतलं तरी आत पावसाचा योक ठयोम्ब याचा न्हाय. शिवारातन ऊस कारखान्याला, गुराळाला गेला की भर उनाळ्यात आनी पावसाळ्याच्या तोंडाव मानस खोपटाची दरवर्षी नव्यानं शेकरायची. उसाचा लांबलचक पाला, दोन दनकाट मिडकी, कळाक, निर्गुडीच्या बंदाट्या, कळकाच पांजरान, हुंबऱ्याला बाबळीच लाकूड आसलं सामान लागायचं. रानांत टेकावली जागा बगून मानसं खोपाट घालायची. का.?  तर …साऱ्या शिवाराव खोपटातंन ध्यान ठेवाय याय पायजी.,(  तवा काय गुंठामंत्री न्हवतं. चालून दमायची मानसं येवडा शिवार आसायचा)

तवाची मानस आताच्यागत बांदाच्या बाबतीत दळींद्री न्हवती. तर बांदावन बैलगाडी जायाची  आसला बांद आसायचा.  खोपाट करायला कुनाला येत न्हाय आस न्हवत. ज्यो त्यो आपापल्या  बुद्धीन खोपाट घालायचा. पन  जमत नसनारं गडी आक्कल आसनारी मानस खोपाट करायला आनायची. खोपटाला तयार करायला दोन गडी  लागायचं. जागा फिक्स झाली की मापं घिऊन पारंन निटघोल डबरी काडायची. त्यात मिडकी दगडांन चांगली कुचायची. दुनी लाकडाव खेलात कळूक घालून आवळायची. तेला घोडंखोप बी म्हनत्यात. मिडकी आनी कळकाला  टिकवून दुनी पाक्याला काट्या नायतर कळाकच पांजरान तुडून मानसं मापान लावायची. लावलं की तेज्यावन बंदाटी घ्यायची. बंदाटी घ्यायला लोकांडी सळीला मानस सुवा म्हनायची. सुव्याच्या फुड नाक आनी तेला भोकं आसायचं. भायरनं बंदाटीच्या वरनं खुपसल्याला सुवा खोपटातला आतला गडी त्या सुव्याची तार बंदाटीच्या खालंन वऊन सुव्याच्या नाकातन वऊन दयाचा.

बंदाट्या झाल्या की कळकाच पांजरान खोपटाव घालायचं. ती आस आकीव रिकीव दाट गंजान घालायची. पांजरान घालून मग तेज्याव आनीक बंदाटी याची. पांजरानांनच खोपाट येवड गच्च व्हायचं की त्यातन भायरल काय दिसायचं न्हाय. मग वरन शेकराय काय जन गवताच्या पेंड्या, भाताचं पिंजार, कापून ठेवल्याल्या पानकनसाच्या पेंड्या, मक्याचा न्हायतर हाब्रेटच्या कडब्याच्या पेंड्या लावायची. पन कंडका खोपाट करणारा गडी उसाच्या पाल्याशिवाय कशाला हात लावायचा न्हाय. पांजरान झालं की उसाच्या वाळल्याल्या पाल्याच्या पेंड्या शेकारनारा मागायचा. लांबलचक उसाच्या पाल्याच्या पेंड्या त्यो ठासून लावायचा. पेंडया लावायची बी कला हुती. वरच्या पिंडी व पडल्याल पावसाचं पानी खालच्या पिडींवन नितळून जायाचं. आनी वर शेंड्याला पाला घालून त्याव परत बंदाटी याची. पाला उसाचाच पन कूट येक टोपान सुदा यिस्काटल नसायचं. 

खोपाट झालं की खोपटाला आत याय जायाला दरवाज्याच्या मापान लावाय झापाटी करायची. तिबी पाला आनी बंदाटी घिऊन येवस्थित. मानस चांगलं खोपाट करायला दिवस घालवायची. खोपाट तयार व्हायचं. तयार झाल्याव आत बसून करनारा कुट काय कामं चुकीचं झालंय का? वारं आतं येतंय का? बगायचा. दार झाकून आत बसलं की खोपटात गुंजबर वारं यायचं न्हाय. बाळातीन बायन बी आत बसलं तरी तिला गारवा लागायचा न्हाय येवडा उबारा त्यात याचा. पाऊस कितीबी पडुदी पानी आत याच न्हाय आसलं देखनं खोपाट शिवारात साऱ्या मळंकऱ्यांच्या बांदाव उनाळा,पावसाळा,हिवाळा बारा म्हयन आसायचं. सुगी आसल्याव आनी नसल्याव बी खोपटात मानस मुक्कामाला आसायची.

 खोपटात नुसतं सामान न्हवत. तर धन्याचा व रानातल्या रोजगारयांच्यासाठी जेवनाचा डालगा घरातली कारभारीन शिग लाऊन आनायची. त्यात कोरड्यास ,भाकरी,त्याल चटणी,भुयमुगाच्या शेंगा,मक्याची कन्स, बाजरीच्या,जुंधळ्याच्या भाकरी,उपास आसला तर भगर, रताळ ,काकड्या,ताकाच डिचक, दह्याचं गाडग,खरड्याचा डबा, वल्ल्या कांद्याच्या पाती आनी रानात कुत्र्याला भाकरी आसं धा पन्द्रा गड्याच जेवान आनी काकला पान्याची किळी घिऊन बाय आब्दत आब्दत यायची. हाळी जायल येवड्या आंतराव आली की मग कारभाऱ्याला हाळी मारायची.

कारभारी नायतर कोनतर मग आडवं पळत जाऊन तिज्या काकची किळी घ्याचा. खोपटापशी यिउन डालगा हात लाऊन उतरायचा. वज्यांन मान आवगाडल्याली बाय भुय धरायची. ईसावा घ्यायची. कुत्र डालग्यातल्या भाकरी बिकरी पळवलं, किळीत त्वांड घालंल म्हनून ती खोपटात ठेवायची.  थंडीत आनी पावसात शिवारात काम करनाऱ्या, राकनीला आसल्याल्या लोकासनी खोपाट भारी वाटायचं. खोपटात झोपाय वाकाळ, हातराय,पांगराय ,उसुशीसकट आसायचं. आड्याला आडकवल्याला खंदील , उशाला काटी, कोयता, यीळा, भाला नायतर कायतर हात्त्यार आसायचं. कुडात खुरपी, खोरं, कुदळ, पान्याची किळी, तांब्या, परसाकडं जायाला डिचक नायतर जर्मलचा मोटा तांब्या ठेवायची. रानातलं बरंच सामान तीत आसायचं. नुसतं मानुसच नाय तर मोराला आंडी घालाय सुदा खोपाट जागा दयायचं.! खोपाट ही सारं आपल्या आंगा खांद्याव घिऊन बसायचं.

सुगीच्या टायमाला वस्तीला मुक्कामाला आसल्याल्या मानसाची भाकरी दयाय खंदील लाऊन आंधारी वाट तुडवत जायाचं मजी लय सुखं. त्या मुक्कामी मानसाच्या जवळ खोपटात बारक आसताना झुपू वाटायचं.पन थुरली मानस खवळून हाकलून दयायची. जरा पोक्त झाल्याव वस्तीला खोपटात राह्याच्या स्वर्ग सुखाचा आनंद  घेटला. खोपटात हुरडा पार्ट्या, मटन पार्ट्या व्हायच्या. म्हातारी मानस खोपटात बांदाव बसून सुयरीक ठरवायची.  काळ बदलला. दळणवळणाची साधनं वाडली आनी बांदावल खोपाट गायब झालं. गाडीवन शून्य मिनटात रानात कवाबी येता जाता येतंय. मुक्काम करून रात्रीच रानाला पाटानं पानी पाजायचं दिवस संपलं. आता ठिबक सिंचन येत घरात बसून मोबाईलवर हिरीतली मोटार चालू, बंद हुत्या. रानातनी शीमेट वतून बंगला आनी फार्महाऊस आमी बांदलाय पन खोपटातल सुखं त्यात कूट हाय.

फोटो : तासगाव तालुक्यातील सावर्डेतील दत्तात्रय मंडले या शेतकऱ्याचं ही देखणं खोपाट.सहा वर्षांपूर्वी फोटो काडलावता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *