--------------------------------- ======================================

रानातल कडब्याच बुचाड:

रानातल कडब्याच बुचाड:

विनायक कदम:९६६५६५६७२३

गावाकडल्या नव्या पिडीच्या पोरासनीबी आता बुचाड नावाचा प्रकार कायतरी येगळा वाटतूय. कारन बुचाड लावायला आता बागायती पट्ट्यात ती पीक रानातच न्हायत. पूर्वीच्या काळी दोन…दोन चार….चार येकऱ्यात हाब्रेट, जुंधळ, बाजरी, शाळू मानस करायची. दावन कमीत कमी १०ते १५ जितराबाची आसायची. शेनखात मुबलाक हुतं. मग पीक नुसतं उसळायचं. हातभार कनीस आनी डोसक्याच्या वर पल्लदार पीक. तवा पाऊसपानी येळवर हुता. हाळी दिऊन पाऊस याचा. त्यामुळं पीक काडायच्या कामाचं तलाल उटायचं. मानसच काय जितराबासानी मनगंड माग सरुस्तर खायाला मिळायचं. पीक काडनी, खुडनी व खळ्यात मळनीच काम पंदरादी म्हयनाबर चालायची. कधी पाऊस येनाराय तर सावरड्याच्या भवानीच्या जतरला हमखास पाऊस आसतुय ही सूत्र हुत. अंदाजपंचे धागोदरशे आसला हवामानाचा अंदाज सांगायला तवा हवामान खात न्हवत. वार कुठल्या दिशेन सुटलं, आभाळ लाल झालं, कोकन्या उठल्या, घोड सुटलं, की पावसाची याचाय म्हनून मानस कामं आवराय लागायची.

हाब्रेट काय सारीच पीक तवा खुरपुन नायतर बेडग्यान काडायची. आताच कापून काडायच सुरू झालंय. हेन रानाची म्हेनत हुन रान सोजाळ व्हायचं. काडून टाकल्याल्या पिकाची खुडनी बायका लाऊन किली जायाची. हाजरी ह्यो प्रकार न्हवता. खुडनाऱ्या बायला डालगाबर कन्स घालून वैरनीचा उचलनीचा भारा दयायची. भाराबर वैरन व कोरड्याश्याला रानातल कोरड्या वल्ल्याश्याच मानस दयाची. खुडनी झाल्याव गड्यांच काम पेंड्या बांधायच. पेंड्या बांदायच्या मजी लय कलन काम कराय लागायचं. त्यात शिंगल कटी, डबल कटी आसा प्रकार पीक किती पल्लदार हाय बगून हुता. पेंड्या बांदायचं काम झुंझुरकाच सुरू व्हायच. का.? तर सकाळचं बांदाय आवरतंय. त्यात लय वाळल आसलं तर सकाळचं बांदाय बर पडतंय. लवचीक ताट घिऊन गडी बांदायच. उनाच्या आदी ह्यो सारा खयोळ चालायचा. कारण उनाच ताट तुटत्यात. बांदायला येत न्हाय.

कडब्याच्या पेंडया बांदायच काम आमचा ‘बा’ कंडका करायचा. दिवस मावळायला शिवारात येकच पात कशीतर व्हायची. उनांन झिंडू फुटायचा. बा आवरायचा नाय. तू लय नकसगिरी करतूयस लगा म्हनतं मागं राह्याल्याली बा ची पात बगून डोसक फिरायचं. पन साऱ्या रानात बाची पात लोकांच्या नजरत भरायची. कुरून बांदल्यागत पेंडया. पातीच्या माग कुनी साळूत्यांन लुटून काडल्यागत चोक आसायची. पाच पाच पेंडयाची खून करून बा पेंडया ठेवायचा. बा.. ची पिंडी मजी ताट मुजून घेटल्यागत साऱ्या येका मापाच्या पेंडया. आमच्या पेंडया मजी वैरनीचा भारा घाटल्यागत. हाताला घावल तेवड पिंडीत बांदायच. आमच्या पिंडीच आवाळल्याल ताट आमी कुटबी खुपसायच. ती बगून कुटल्यातर आपघातात मोडल्याल्या गाडीगात पिंडी दिसायची. उचलून बुचाडापातूर जास्तुर आमच्या जिवात जीव नसायचा. कवा कवा भाऱ्यात डोसक्यावच पिंडी तुटून खाली याची. कवा भारा टाकला की बा फुडचं पिंडी तुटून पडायची. लै आपमान वाटायचा. है तेज्या आयला आसल्या बांदनीच्या. बा म्हनायचा. बा ची पिंडी फिकून दिली तर सुटायची नाय. वैरनीला तोडताना कट कोयत्याशिवाय तुटायचं नाय. तवा कळायचं बा ह्यो बा आस्तुय.

पेंड्या बांदल्या की मग बांदावर बुचाड लावाय जागा करायची. तवा बांध बैलगाडी जाईल ह्या मापाचं हुत. आता बांद कुरून कुरून पायवाट बी राह्यल्या न्हायत. बांदात शिती करायचा नवा उद्देग मानस करायल्यात. बुचाड लावायला जरा आक्कल आसनाराच मानूस लागतूय. कारन उन्हाळच सुटनार वार व आवकाळी, मान्सूनच्या पावसात पानी आत जाऊन कडबा काळा व्हाय, कुजाय नगो हेची खबरदारी मानस घ्यायची. बुचाड लावयच्या आडी चार पेंड्या उब्या करून तेजी केकत्यांन शिंडी लावायची. त्येज्या भवतनी पेंड्या आनी मग थरावर थर लावलं जायाचं. जड पेंड्या खाली आनी हालक्या पेंडया वर शेंड्यावर मारल्या जायाच्या. शेंडा खाली आनी बुडका वर करून बुचाडातल काय आक्कल आसल्याल गडी शेंड्यावर जाऊन डबल मजली बुचाड बगनाऱ्यांन डोळ्यात साटवाव आस लावत्यात

पन बुचाड शेतकऱ्याला गंजी करायला जवर सवड न्हाय तवर रानात रानाला जागता पहारा देत आसायच. घव, हारभरा पेरला आनी पान्यावं पानक्या आल्यावर पानक्याच्या चपला, खोर, कुदळ ह्यासनी मग बुचाड आसरा द्यायचं. बुचाडाच्या शेंड्यावर मोर आपली अंडी घालायला जागा करायचा. बुचाडात कुत्री बाळत व्हाय जागा करायची. गावातनी दिवाळीच्या हंगामात कुत्र्या बुचाडात यायच्या. तेंची दिकनीपांन पिल्ली बगायला, ती पाळाय न्हायला पोर बुचाडाच्या भायर कुत्रीला दिसलं न्हाय पायजी आशी आडचनीची जागा धरायची. दडून कुत्री कदी जात्या वाट बगत बसायची. त्यातली काय आगाव गाबडी कुत्रीला डवचुन भायर काडायची आनी पिल्ली पळवायची. मीबी ह्यो उद्देग लय येळा केला. पिल्ली काळी,पांडरी, दिकनीपान आसायची. पन घरातन लै इरोद. नकु तसल्या शिव्या घालायची. तेंची आय वडाळ हाय. कापड,भाकऱ्या चुरून न्हेत्या. पिल्लू बी आयच्या वळनाव जायल म्हनून पिल्लू परत सुडून याय लागायच. लै वायट वाटायचं. मोडा व्हायचा. पाळायला कुत्र न्हेन्याकडं मानसांचा लय कल. कुत्र्या न्हयायला कोन धजायच न्हाय. नायतर आयमागन फिरून खात कुत्र्या मोट्या व्हायच्या. आलीकड बुचाडबी कमी झाली. आनी आता कुत्र्याबी कूट बुचाडात दिसत न्हायत.

बागायती पिकामुळ काडनी ,खुडनी,मळनी ह्या साऱ्यातन शेतकरी आता भायर पडलाय. काय जन पोटापूर्त पिकवत्यात तर कायजन ईकत आनत धन्यता मानत्यात. बागायती पिकांच्याकड लोकांचा लय कल हाय. काळ बदलला. चाऱ्याची पीक रानातंन हद्दपार झाली. या पिकावरची अन्नसाखळी तुटली. तसंच
दावनीच्या जनावरांचा गोतावळाबी आता संपलाय. उनाचं सावली, पावसाचं आडूसा आनी गारट्याच उबारा देत बांदाव बसून राकन करनारं बुचाड आता गावाकडं बांदाव दिसत नाय.

फोटो सौजन्य : गुगल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *