--------------------------------- ======================================

रानात सड येचायला:

रानात सड येचायला:

विनायक कदम:९६६५६५६७२३

उनाळी पाऊस ढासाळलं की रानातनी म्हिनतीला जुपी व्हायची. कुनाला उसाच, कुनाला, हाब्रेटच, कुनाला मकयाच, कुनाला बागायती कशाचं तर रान तयार कराय जुपी व्हायची. सारा बैलांचाच कारबार. नांगुर, फन, कुळव, पंका, इचडी, ना.. ना तरची आवजारं.

चैतातच चार नायतर सा बैलाचा नांगूर घालून शेतकरी रानाच पॉट फाडून काढत हुता. मी मी म्हननारी रगील बैल गुडग्याव याची. नांगूर गुडग्याच्या मापान लागायचा. आरडून ढेकळ फाळावन बाजूला पडायची. सा बैलांच्या माग नांगरीवाला, तीन बैलकी, आनी नांगरीमाग गोमा, बेडक, साप, कीड खायाला कोतवाल, बगळं आवत सुटुस्तर मागन हालायची न्हायत.

कोतवाल लय लापाट. बैलक्याच्या जवळ यिऊन झडप घालाय त्यो हायगय करत न्हवता. नांगारल्याल घव, हार्बर, मक्याचं रान दोन म्हयन चापून ऊन खायाच. नांगरट झाली की शेतकऱ्याला उनाळी सुट्टी मिळायची. मग लगीन ठरीव, घर बांधाय काड, कवा कवा बैलाची जोड बदलायचा. लिकी, सूनाबाळी हेंच्याकडन हिंडून याच, आंब ,जुंधळ, कडधान्य, शेतातल पिकल्याल पय पावन्यासनी दयाच.

कुरुड्या ,भातुड्या , चटन्या, लुंची बाया घालायच्या. पोरं मामाच्या गावाला याची. पवाय, झाडावनी चडाय शिकायची. पिवळ हाडुळ झाल्याल आंब पोरांची वाट बगत लोम्बकळत बसायचं. आंब्यान झाड भरली की घरादारातनी आंब्याची शेंनसड उटायची घरातनी चगाळ घालून ठेवल्याल्या आड्यांच घमघमाट सुटायच. आंब्याचं देखनपन बगून तेला खायापेक्षा नुसतं बगत बसू वाटायचं.

तवा उनाळी पाऊस हुबालं पडायचं. ईजचा कडाडान धडाडा हुन काळ ढग भ्या दावायचं. आता चुपतूय का मग चुपतूय आस व्हायचं. गंभीर वातावरन झालं की वारा जुपी करायचा. लोकांची घरं, छपर, गंज्या, बुचाड आत्राळी व्हायची. आर दार झाका म्हनून मानसं आरडायची. तवर घरात वार घुसून भिंगरी उटायची. कवा कवा छपराच्या मिडी, कळाक मुडून म्हसरांच्या आंगावनी पडायचं.

जनावरं आरडायची. आनी वरुनराजा निष्ठुर हून सुपान पानी वतायचा. खरी आब्दा व्हायची रानात घावल्याल्या गड्यांची. कोरड्याश्याला भाजीपाला,जळान काटूक डालग्यातन घिऊन घरला निगालेल्या बायांची पाचाव धारन बसायची. वारं पाय उचलून दयाचा न्हाय आनी पाऊस थापडा दिल्यागत लागायचा. कूटतर झाडाखाली उबं राव्हावं तर झाडचं मायकल जॅक्सन गत नाचायच. त्याव इज पडायचं लय भ्या.

म्हसर, शेरड, आनी मुंगा घिऊन भरल्याल्या बैलगाड्या भरून वैरन घिऊन यायला लागल्याल्या मानसांची निबार आब्दा व्हायची. हुबाल पाऊस बगू बगुसतर वड्यासनी पानी यिऊन मानसांच्या वाटा बंद व्हायच्या. पावसात वारं झाडाचं हाय न्हाय तेवड आंब खाली घ्यायचा. मनसोक्त चुपुन झालं की गडी थांबायचा. रानातनी सारीकड पानीच पानी. रानाची तळी व्हायची. बांध, ताली फुटून चिंद्या उटायच्या. रानात घाटल्याल शेनखात रानात तरंगायच. वड्यानी खडूळ झार पानी धाड धाड जागा घावल तिकडं पळायचं.

लोकांनी वड्याकडला घाटल्याल जळनाच फ्यास, लाकडं पानी संग घिऊन याचं. काय गडी पुरात शिरून वडन्या टाकून लाकडं धरायचं. पान्यातन खवळून आल्याल साप, गोमा, ईच्चू जागा घावल त्या झाडाव जीव वाचायला चडायचं. रांन घावल्यागत पानी प्याच. ढेकळं पाक यिरगाळाची. रान भुसबुशीत हुन ब्या ची वाट बगायचं.

उनाळी पावसान शेतकरी हारकायचा येळंव काम व्हायची. मग फन कुळव घालून रान पूळीगत करायचा. फन कुळवाव बसायचं मजी लय भारी वाटायचं. बैलांच्या माग बगळ चिमण्या, कोतवाल रानातंन निगलेल्या कीड मुंग्याव झडप घालायचा. बगळं तर साप आकंड गिळायचं. फन कुळव मारल्याव सड , काड्या, कस्पाट येचाय सारट धराय लागायचं. मामाच्या गावाला आल्याली पोरं घावायची. सड यिचून ढीग लावून पेटवायचं नायतर फुटकी ताल बगून त्यात टाकायचं.

ईच्चू चावा चावीच लय प्रकार व्हायचं. गावातनी दिशी आवशीद दिऊन ईच्चू उतरायचा. रानात वल्ल्या मातीत पाय घालून केल्याल मातीच घर मोडायचा मजी काळजाच पानी व्हायचं. मातीत खेळं रंगायचं. डालगं भरून रानात भाकऱ्या, भाज्या, खरडं, धय, चटन्या, कांद, भरीत, उसळी आंब, लोनचं जेवान याच. काय खावं काय नगु घावल्यागत व्हायचं. ताट वाटीचा ताल रानात कुठला ओ. मांनस घावल तेज्याव घिऊन नायतर हाताव भाकरी घिऊन खायाची. त्यात,प्रेम, चव, गोडवा हुता.

झिंडू फोडनांर ऊन आता न्हवत काळं कुट्ट आभाळं नुसतं वाऱ्यासंग वाह्याचं. कुकीळा आरडून आरडून टाळा फोडायची. मानूस स्वतःला जनावरासनी छपरं कराय चालू करायची. पाकरं बी घरटी घालायची. जेची तेजी जुळनी चालू आसायची. पान्याचं ढग फूड आनाय वारं जीव तुडून व्हायाचं. आताच्यागत आज बाजाराव जाऊन बी बेवळा आनून उदया पेरायच न्हवत. तर रानात पेरायला बाया बी बेवळा वरीसबर राकत घालून ठेवायच्या.

कूट कूट काय ठेवलय काडून पिरनीची तयारी व्हायची. कामाच तलाल उटायचं. निसर्गाव आमी आळीपाळीन बलात्कार केलाय. जून म्हयन्यात हाळी दिऊन येनारा पाऊस आता जुलै म्हयन्यात बी पडंना. बैल कमी झाली म्हिनतीला ट्रॅक्टर आला. ठराविक भाग सोडला तर आज रानातली ती धांदल, प्रेम ,गोडवा गावाकडं दिसत न्हाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *