पोत्याची थाप :
पोत्याची थाप
विनायक कदम: ९६६५६५६७२३
गावाकडं फिरताना आता धान्याच्या पोत्याची थाप्पी कूट दिसत नाय. कूट दिसली तर उगच सताट, धा पोत्याची दिसत्या. ती बी कटाकटी. येकादयाच शेतकऱ्याच्या घरात. येकर बरातल ती धान्य आसल. पूर्वी धान्याचं खंडीत मोजमाप व्हायचं. पिकायच बी मुबलक. पिरणी करतानाच तवा माणसं ईचार करून पेरायची. आपल्या घरात माणसं किती?
किमान दोन वरीस घळघळीत पुरल येवढं धान्य साठवून ठेवायची. हाब्रेट, जुंधळा, कार ज्वारी, बाजरी, खपली, मका माणसं तीन…तीन, चार..चार येकर पेरायची. तेजा दुहेरी फायदा आसायचा. येक तर गोठ्यात चार चार भारदस्त बैल ,खोंड आसायची. दूध दुपत मुबलक देणारी जनावर डिरक्या टाकायची.

पाच पाच म्हयन्याची पीक दमदार याची. कन्स ताटाला झेपायची न्हायत आसल याक याक कणीस. दाट गंजाण पिरणी आसायची. पीक कापायला आणि कडब बैलगाडीन वडायला. आट आट धा धा दिवस लागायचं.
पीक काय जण वर शेंड घ्यायची तर काय जण बेडग्यान पीक काडायची. खुडनी झाली की भलामोठा कनसाचा ढीग लागायचा. खळ्यानंतर मळाय मिशनी आल्या. मिशनी न तीस चाळीस पोत्याच्या मळणीला दिवस घुमायचा. सताट माणसांची बीजमी हुयाची. कुशीत माणसं भुलून जायाची.
आताच्यागत पन्नास किलुची पुती न्हवती तर साकऱ्याच शंभर किलुच बारदानी पोत आसायचं. ती वडायला बी मनगटात रग आसणारच गडी लागायचं. आताच्यागत लय वाळवायची भानगड तवा न्हवती. कारण रानातच पीक खणखणीत वाळल आसल्यामुळ तेला वाळवायची गरज नसायची. मग काय जण दाबनान तितच पोत्याची तोंड शिवायची. तर काय जण त्वांड बांधून आणायची.
आता गाडीत भराय मनगटावर पोत घ्याला लागायचं. दोन ताक्तीच गडी त्यासाठी लागायचं. उच्चालल की पलटी मारायला मागं योक माणूस ढकलायला आसायचा. घरातल्या तरण्या पोराची पुती उचलाय तीत कसब लागायचं. लाकडी बैलगाडीच्या कटाटत पाच सा खेपा व्हायच्या. बैल काकुलतीला याची गाड्या वडून. धान्याची पुती घरला आनताना रस्त्यात आनी दारात आल्याव बी शेतकऱ्याचं मन भरून याच. आजूबाजूचं शेतकरी ईचारायचं गड्या किती पिकलं? त्यो खंडीत सांगायचा.

पुती घरला याची. घराजवळ पोत्याची थाप ठेवाय लाकडाच माचान माणसं करायची. उंदीर घुशिन पुती फुडूनी. कीड लागूंनी हिजी काळजी घिऊन जागा तयार कराय लागायची. गाडीतली पुती काय गडी पाट लावून उचलायच.
त्यासाठी आंगात बळ लागायचं. माचावर येवस्थित पुती ठेवायची ती ठेवताना दोन पोत्याच्या मदी हावा खिळती पायजी. दोन पोत्याव येक पोत टाकायचं. आनि पाच पोत्याच्या वर आजिबात थाप्पी लावायची नाय आसा नियम हुता. कारण खालची पुती फुटून जात्याला हेज भान मानसासनी असायचं. तीस चाळीस पोत्याची भरदार थाप्पी बगून मन गार व्हायचं. शेतकऱ्याच्या कष्टाला निसर्ग दुनी हातानी भरभरून द्यायचा.
ही थाप्पी वरीसभर घरच्या माणसांबरोबरच भिकारी, आकारी, नडल्याल्या मानसासनी धान्य पुरवायची. उनाळबर दारात पडल्याली थाप पावसाळ्याच्या तोंडाव घरात याची. घर भरून पुतीच. तीन तीन वर्षे धान्य पुरायच. येगदा आमच्या घरात पंधरा वीस पोत्याची थापी लावायच सुरू हुतं. मला ताक्तीपेक्षा काम लोड झाल्त. उनात झिंडू फुटलावता. चिडचिड व्हाय लागली. वरच्या शेंड्याव पुती जायनात. आमचा बा म्हणला तेला दूध खायला लागतंय गाबड्या.
नुसतं आमट्या खाऊन बळ येतंय वी. तवा डोसक्यातन मुंग्या आल्या. पण खरं हुतं. रसायनाचा मारा सुरू झाला. तीन म्हयन्यात पीक यायला लागली. येकऱ्यात तीस चाळीस हुणारी पुती आठ दहा वर आली. मुळात बागायतदार माणसं आता धान्यच करणात. आता शेतकरी सुदा बाजारातन धान्य यिकत आणत्यात.

धान्या न केल्याने निसर्गाची एक अन्नसाखळी आमी तूडली. धान्याची पीक केल्यान जनावरांसाठी मुबलक चारा मिळत हुता. शितीला बैल मिळायचं. जनावरांच दूध खाऊन पोर हात्तीसारखी ताकतवान व निरोगी आसायची ,खात मुताण रान रंगायची. रसायनाची वळख न्हवती, पाखर , निसर्गात मुक्त भटकणारी जनावरबी जगायची. मधमाशा, गोरगरीब, भिकारी, जगायची. शेताच्या कामासाठी पैरा पद्धत केल्यान शेजाऱ्यांसंग नातेसंबंध चांगलं आसायचं.
ही चेन तुटली. आता पन्नास किलुची पुती आली. तीबी यिऱ्याची. कारण गडीच त्या ताक्तीच हायत. बागायती पीक वाढलं. शेतकरी बी धान्य पिकवायच कमी झाल्यात. ईकास आनी प्रगतीच खराय ओ. पण त्यासाठी पोटाला खायाला धान्य लागतंय आनी ती पिकवाय लागतंय.
आता आपवाद सोडला कुणाच्याच दारात भरदार पोत्याची थाप्पी दिसत न्हाय.