--------------------------------- ======================================

पोरांनी “पुतळा” उभारून जपल्या शेतकरी बापाच्या “स्मृती”

पोरांनी “पुतळा” उभारून जपल्या शेतकरी बापाच्या “स्मृती”

विनायक कदम:९६६५६५६७२३

शुक्रवारी कामानिमित्त महेश गुरवसोबत मित्रासोबत इस्लामपूरला जाण्याचा योग आला. मोटारसायकल वाळव्याच्या जवळ आली आणि रस्त्याच्या कडेला एक दृश्य बघून आपोआप गाडीच ब्रेक दाबल. रस्त्याच्या कडला गाडी लावली आणि डोळ भरून समोरच चित्र डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न केला. का कुणास ठाऊक मात्र या दूषित वातावरणात ते चित्र डोळ्यासनी भर उन्हात गारवा देणार होत. ब्राँझ च्या पुतळ्याच्या रूपातील २ व्यक्ती आणि समोर नजर पोहोचणार नाही इतक्या दूर द्राक्षबाग. उंच उभं राहून चोवीस तास ही दोन मानस या बागला जागता पहारा देत होती. रस्त्यावरून गाड्या धुरळा उडवत जात होत्या . माहिती घ्यावी म्हणलं पन त्या ठिकाणी कुणी न्हवत. वेगवेगळ्या ठिकाणाहून त्या पुतळ्याचे फोटो काढले. काही मिनिटं थांबून पुतळे जवळून न्याहाळल.

आता तर त्यांच्याविषयी जास्तच कुतूहल निर्माण झालं.! कुणाकडून माहिती मिळालं यासाठी कुणी येण्याची वाट बघितली मात्र कुणी आलं नाही. मग बागेच्या त्याच परिसरात एक फलक दिसला विठठलं कृष्ण चमन त्यावर मोबाईल नंबर होता मग जरा हायस वाटलं. पण परत डोक्यात विचारांचं थैमान सुरू झालं. हे नाव नेमकं कुणाचं आसल, शेतकऱयांन तयार केलेल्या द्राक्षाच्या जातीच नाव असेल का? की पुतळ्यातील त्या २ माणसांची नाव असतील. दिवसभर डोक्यात तोच विचार रेंगाळला होता. मिळालेल्या नंबरवर संध्याकाळी फोन केला व सकाळी पाहिलेल्या त्या दृश्याच वर्णन सांगत पुतळे कुणाचे आहेत अशी विचारणा मी केली. समोरची बोलणारी व्यक्ती होती विलास शामराव माळी. त्यांनी सांगितलं पुतळ्यातील दोन व्यक्ती राजाराम विठोबा माळी व शंकर विठोबा माळी या दोघांचे आहेत. ते माझे काका असून दोघेही द्राक्ष क्षेत्रातील योगदानासाठी कृषिरत्न व कृषि भूषण पुरस्काराचे मानकरी आहेत. त्यांच्यामुळे आमच्या १ एकर द्राक्षबागेची ९० एकर द्राक्षबागा त्यांची आठवण सदैव राहावी म्हणून आम्ही पुतळे उभारल्याचे सांगितले.

विलासराव सांगायला लागले ६ जण भाऊ, त्यांची १५ मुलं व २० मुली अस कुटुंब आता १०० जणांचं कुटुंब झालय. सर्व मुलं पदवीधारक पण शेतीत. वाळव्यासारख्या पाण्याच्या पट्ट्यात माळी यांची १९६४ पासून द्राक्षबागा आहे. त्यावेळी एक एकर द्राक्षबागा होती. राजाराम व शंकर द्राक्षबागांचा स्वता अभ्यास करून आपल्याच बागेत विविध प्रयोग करायचे. शेतात अनेक प्रगतिशील शेतकरी, अभ्यासक, गावकरी, शास्त्रज्ञ, यांसह अनेकांच्या बैठका व्हायच्या. द्राक्षशेती करणाऱ्या शेतकऱ्याला दर्जेदार माहिती द्यावी यासाठी त्यांचा कायम आटापिटा चालायचा. द्राक्षातून आम्ही मोठी प्रगती केली. आज ९० एकर द्राक्ष शेती आहे. ही प्रगती बा नंतर पोर राबली म्हणून झाली.

राजाराम व विठोबा यांचा ४ महिन्याच्या अंतराने मृत्यू झाला. आणि सर्व कुटुंबच काय सारा गाव शोकसागरात बुडाला. द्राक्ष शेतीत आभाळा एवढं मोठं कर्तृत्व केलेली ही मानस यांच्या स्मृती कशा जपाव्या हा मोठा प्रश्न होता. आणि सर्वानुमते ठरलं की या दोघांनी ज्या मातीच्या सानिध्यात आयुष्य घालवल त्या मातीत या दोघांचे पुतळे उभारूया.! आणि ५ वर्षांपूर्वी या कर्तृत्ववान माणसांच्या कर्तबगार शेतकरी पोरांनी आपल्या शेतकरी बापांचे पुतळे उभारून स्मृती जपल्या. दोघा भावाचं सूर्य उगवतीच्या दिशेला तोंड व समोर द्राक्षशेती .! या भावनिक प्रसंगाच एखादा कवी अगदी रसभरीत वर्णन करू शकेल. या पुतळ्यांच्या पाठीमागे भल मोठं बांधकाम सुरू आहे. विलासरावांनी सांगितलं. द्राक्षशेतीला लागणाऱ्या सर्व गोष्टी इथं करणार आहे. अगदी माती परीक्षण ते सर्वकाही या दोन भावांच्या नावान आम्ही हे ट्रस्ट तयार करतोय. तेही कमी किमतीत . या ट्रस्टला प्रवेश करायचा तर या कर्तृत्ववान शेतकऱयांच्या पायाला माथा टेकूनच पुढं जावं अशी रचना केलीय.

शेतकरी व त्याची दुःख शेतकऱ्यालाच माहीत. पण मनोमन या शेतकरी पोरांना सलाम केला. म्हातारी मानस आता आम्हाला जिवंतपणीच नको वाटायला लागलीत. म्हणून वृद्धाश्रम वाढायला लागली. ग्रामीण भागात याच लोण आलं. सध्याच्या राजकीय घाणीत आमची शेतकरी पोर पार अडकून गेलीत. बा मेला तर चालेल पण नेता जगला पायजी या मनोवृत्तीची पोर.! शेतकरी बापाचं कष्ट काय समजणार. ते समजायचं , समजून घ्यायच आसल तर वाळव्याला माळी बंधूंच्या शेतीला एकदा भेट द्या.! आणि पुतळ्यांच्या बाबतीत म्हणाल तर त्यांनी अजूनही त्याच राजकारण केलं नाही…!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *