पर्यटकांना खुणावतय शुकाचार्य:
पर्यटकांना खुणावतय शुकाचार्य
विनायक कदम:९६६५६५६७२३
भावना संवेदना आसणाऱ्या माणसाला रोजच्या धकाधकीच्या जगण्यातन मुक्तपणे शांत निसर्गात जायला कुणाला आवडणनार नाय. कुटुंब जोड़ीदार, मित्रांसोबत सुट्टीच्या दिवशी मस्तपने दऱ्याखोऱ्यात भटकत निसर्ग, प्राणी ,पक्षी हेंच्याशी बोलावं आस साऱ्यासनी वाटतंय. मन, भावना, संवेदना जागृत असणारा माणूस निसर्गाच्या कुशीत आपली सारी दुःख विसरतो म्हणत्यात.
पण आस ठिकाण हाय कूट आस तुमी ईचारणारच की? थांबा थांबा सांगतो. सांगली जिल्हा तसा आर्धा समृद्ध तर आर्धा दुष्काळी. याच खानापुर या दुष्काळी (आता बऱ्यापैकी पाणी फिरली या भागात) भागात आटपाडी खानापुर तालुक्याच्या सिमेवर सांगली जिल्ह्यातल्या पर्यटकाना खुणावतय डोळ्याला गारवा देणारं शुकाचार्य.
माणसं शुकाचार्यची आख्यायिका आशी सांगतात की शुकाचार्य म्हणजे महाभारतकार व्यासांचे चिरंजीव. त्यांनी तपश्चर्या करायसाठी या ठिकानाची निवड किली. शुकदेव हे विष्णुचा अवतार आहेत असा उल्लेख आहे.
त्यांची तपस्या भंग करण्यासाठी रंभा, मेनका या अप्सरासनी नृत्य आविष्कारासाठी पाठवण्यात आलं.अप्सरासनी वैतागुन मुनी गुहेत जाऊन बसले.
खोदकाम करताना पुरातन खात्यालाही त्याचे अवशेष आढळले आहेत. त्याची पुरातन खात्यानेही पाहणी केली आहे. मंदिराच्या डोंगराकडल्या बाजूच्या भिंतीत शुकाचार्यांची पाठमोरी प्रतिमा दिसते असे भक्त व स्थानिक सांगतात. त्याची पूजा केली जाते. मंदिराच्या बाजूच्या येका खडकात गुहा कोरलेली आहे.
या गुहेतही एक पिंड असून गुहे समोर समाधी व त्याव पिंड कोरलेली दिसते. मंदिराच्या समोर पारावर जून्या देवळाचे आवशेष व तुटलेल्या मुर्ती ठेवलेल्या आहेत. यात गणपती, विष्णु, व्याल, सर्पशिल्प, मंदिराच्या कळसाचा भाग आहे. पारासाठीच्या येका दगडावर ” श्री शुकदेव देवस्थान” अशी अक्षर कोरल्यात.
शुकाचार्य हे दरीत आसल्याने या आगोदार पायवाटेने धड़पडत जायाला लागायचं. मात्र आता विविध फंडातून प्रशासनाने तिथे व्यावस्थित पायऱ्या बसवून पर्यटकांची सोय केली आहे. दरीकडेला संरक्षक कठडे,वाहनतळ, करण्यात आलेत. प्राचीन काळची हत्यारे व वस्तू या ठिकाणी आजही जतन केल्याचे आढळते. या देवस्थानाला आता पर्यटन स्थळाचा दर्जा मिळाला आहे. पाचशे एकर क्षेत्रावर शुक्राचार्याचा विस्तार आहे.
आंबा ,वड, जांभूळ सह मोठ्मोठे डोलदार असे एकशे आठ विविध जातीचे वृक्ष या ठिकाणी आढळतात. अमाप वृक्षसंपदा असल्याने इथे उन्हाळा जाणवत नाही. शुकाचार्य जवळ आश्चर्य वाटनारा गोमुखातून बारा महीने २४ तास वाहणारा थंड पाण्याचा झरा उन्हातून आलेल्यांची तहाण भागवतो. पावसाळ्यात येथील नजारा काही वेगळाच असतो. हितली वनराई व कोसळणारे धबधबे पाहून पावसाळ्यात आपण कोकणात आल्याचा भास होतो.
दरित कोसळणारे धबधबे पर्यटकांच्या डोळ्याचे पारणे फेडतात. श्रावणात येथे नयनरम्य वातावरण असते. काही चित्रपटांचे, वेब सिरीज यांचे शूटिंगही या परिसरात होते. अशा या शुकाचार्याच्या रम्य व शांत निसर्गाच्या कुशीत असणाऱ्या पर्यटन स्थळाला एकदा भेट दयाच.
या पर्यटन स्थळाकडे बसने जाण्यासाठी तासगाव, विटे व सांगली आगारातून गाड्या आहेत. तासगाव येथून बानूरगड बस दररोज सकाळी तासगाव आगारातून आहे. एका दिवसाच्या सहलीसाठी योग्य असे हे ठिकाण मात्र अतिउत्साही पर्यटकांकडून बदनाम होतेय. दारु व पार्टया करण्यासाठी या ठिकाणाचा काही जणांकडून वापर होतोय.
या आवारात लफडेबाज तरुणांनी चुन्याने ठिकठिकाणी काढलेली घानेरडी वाक्ये येणाऱ्यांचे स्वागत करतात. आरडणे, ओरडणे, माकडांसोबत फोटोसाठी आगाऊपणा करणे व हुलल्डबाजांना आवर घालण्यासाठी येथे पोलीस बंदोबस्ताची गरज आहे. या आवारात असणारे पर्यटकांच विसावा घेण्यासाठी हॉलची गरज आहे. दुष्काळी भागातल हे पर्यटन स्थळ जपण्याची प्रशासनासह, तुमची आमची सर्वांचीच जबाबदारी आहे. मग कधी भेट देताय.. निसर्गरम्य शुकाचार्यला…