हिरीतली परडी : चांगलं पिकल्यान ध्यान लागायचं हिरीतल्या परडीच..!
हिरीतली परडी : चांगलं पिकल्यान ध्यान लागायचं हिरीतल्या परडीच..!
विनायक कदम:९६६५६५६७२३
चैताच ऊन फोडाय चालू केलं की रानात माणसं काम थांबवायची. घव, हारभर, शाळू, करड, मक, कांद, लसूण आसल सारच काढाय याच. मळणी करून ,कवा धान्य घरात आनतूय आस शेतकऱ्याला वाटायचं. चांगलं पिकल्यान त्यो बी खुशीत आसायचा. मग ध्यान लागायचं हिरीतल्या परडीच.
शेतातल येवढ ज्या पाण्याच्या जिवाव पिकलं त्या हिरीचं, आडाच, वड्याच, नदीच, तळ्याच, बोर च आभार मानायचा दिवस.
पाण्याची कृतज्ञता म्हणून परडी सोडत वटी भरत्यात. परडी उसाचा पाला नायतर कडब्याच्या ताटांपासन चौकोनी करत्यात. केळ्याच्या सोपटान येवस्थित बांधाय लागायचं.
घरातनी तवर पोळ्याचा घमघमाट सुटायचा. परडीचा ह्यो सारा खयोळ दिस मावळाय लागला की चालायचा. बारक्या बारक्या निवदाच्या निवरूंग्या, त्याव धय, भात, लिंबू ,हाळद, कुक्कु, कणकीच दिव, वाती, दोन तीन हिरी आसल्या तर कुठल्या ठिकाणी किती निवरुंग्या हेज गणित आसायच.
कडूस पडलं की परडी सोडाय शेजा पाजारची काय तरुणी पोर नायतर गडी बोलवायचं. त्यासनी जेवायचं आमंत्रण आसायच. मग सताट जण निवदाची परात, पाण्याची घागर, ब्याट्री, सामान, आणि परडी घिऊन हिरीकड कूच करायची. बिन पायऱ्याची हिर आसली की कासरा बी न्हयाय लागायचा. उन्हाळ्याची जुपी झाल्यानं पाण्यान बी तळ गाटल्याला आसायचा.
आमची हिर कायम बिन पायऱ्याची. आत उतरायचं मजी सर्कस करतच जायाला लागायचं. झाडाला कासरा बांधून बा आदी परडी घिऊन खाली हिरीत उतरायचा. मग दाव धरून आमी सामान दयाच. सामान देताना माती खाली पडायची बा शिव्या दयायचा. पाणी तळाला गेल्याला आसायच. बेडक, खेकड, इरुळ, मास ,कासव त्या पाण्यात बी तग धरून आसायची. येका कडला परडी ठिऊन त्याव निवद ठेवायचा.
निवदाव केळ, खारीक, खोबर, हाळकुंड, धय भात, दिव पिटवून ठेवायचं. परडीव निवरुंग्या चारी बाजूला चार आणि मदी बी ठेवत बुडणार न्हाय हेज ध्यान दयाय लागायचं. दिव्याच्या उजिडान हिर ,पाणी उजळून निगायचं. उतकाड्या लावून नाऱ्योळ फोडायचा. बगाय भारी वाटायचं. मग दोन मिंट बा परडीकड बगू नगा म्हणून सांगायचा. माणूस मेल्याव श्रद्धांजली पाळतू तसं पाट फिरवून ऊब राहयाच. कदी कदी काय हुतय म्हणून मी चुरून बगायचू. डोळ झाकायचंच न्हायत.
बा ची दोन मिंट झाली की परडीवल खायाच सामान केळ,खोबर,खारीक घ्याच. येक दोन निवरुंग्याबी घ्यायच्या आणि कृतज्ञता म्हणून हिर आणि पाण्याच्या पाया पडत आसच पाणी राहूदे आणि शिती पिकूदी आशी आपेक्षा बाळगायची.भायर आल्याव मैदानात बसून ती खाऊन संपवाय लागायचं. घरला न्हयायच नसतंय आस बा म्हणायचा.
खाऊन सार संपलं की मग घरात शेजारच गडी ,पोरं जेवाय घालत आनंदात सारा परडीचा कार्यक्रम चालायचा. रानातल्या काढल्याल्या नव्या गव्हाच्याच पोळ्या काय जण करायची. हिर दिव्यांन उजळून निगायची. भारी वाटायचं. परडी पाण्यात बरच दिवस तरंगत फिरायची. बेडक,कासव हेंच्यासाठी मग ही हुडी व्हायची.
कुणाकडन काय फुकट घ्यायचं न्हाय. घेटल तर उपकाराची जाण ठेवत तेजी उपकाराची जाणीव ठेवणारा ह्यो शेतकरी नावाचा भाबडा प्राणी. आज्या , पंज्या पासन पूर्वांपार चालत आलेली ही प्रथा आजबी माहिती तंत्रज्ञानाच्या युगात शेतकरी पोर जपत्यात.
विनायकराव तुमच्या लेखिनिन मला कुठं जरी असाल तर गावाकड असल्या सारखं वाटत… आणि ज्या गोष्टी शहरात राहिल्यामुळे मला कळू शकलं नाहीत त्या तुमच्या लेखणीतून कळतेत…
विहिरी तलाव आणि त्यातल्या पाण्या बद्दल आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचं हे शेतकऱ्याचा साधन या सण नक्कीच चागलं आहे आणि तो असाच जपला पाहिजे.
खराय ओ
मनापासून धन्यवाद🌿🙏